मागील भागात वाहतूक पोलिसांना भेडसावणाऱ्या काही आरोग्यविषयक समस्यांची आपण माहिती जाणून घेतली. आजच्या भागातही वाहतूक पोलिसांना आहारापासून ते झोपेपर्यंत भेडसावणाऱ्या विविध समस्या व त्यावरील आयुर्देदिक औषधोपचार, पथ्य यांची माहिती करुन घेऊया....
वाहतूककोंडीत आपण ३० मिनिटे जरी अडकलो तरी, आपण अस्वस्थ होतो. आपली चिडचिड वाढते. तगमग होते. घाम फुटतो. गरम होतं. उकडायला लागतं. आपली गाडी इतर गाड्यांमधून काढण्याचा प्रयत्न (कधी यशस्वी, तर कधी अयशस्वी) केला जातो. जेणेकरून धुरळ्यातून गर्दीतून लवकर निघता येईल. पण, वाहतूक पोलिसांची ड्युटी, तर अशाच वातावरणात असते, ज्यामध्ये शरीराला अपायकारक धुरळा, कर्णकर्कश हॉर्न, तापलेलं ऊन किंवा पावसाचा तडाखा सहन करावा लागतो. सध्या वाहतूक पोलीस मास्क (nose mask) बांधतात. हा एक उत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे हानिकारक प्रदूषणात थोडे संरक्षण मिळते. श्वसन संस्थेशी निगडीत तक्रारी आटोक्यात ठेवण्यास मदत होते. या बरोबरच ड्युटीवर येण्यापूर्वी रोज चार-चार थेंब गाईच्या तुपाचे किंवा औषधी तेलाचे नाकात घालावेत. यामुळे जे धुलिकण आत शिरतात, ते या तैलीयस्तरावर चिकटून राहतात आणि श्वसन संस्थेत थेट प्रवेश त्या धुलिकणांना करता येत नाही. त्याचबरोबर दीर्घ श्वसनाचे व्यायाम नित्य करावेत. दीर्घ श्वास आत घेऊन थोडावेळ रोखून नंतर हळूहळू श्वास सोडावा. श्वसनाचे व्यायाम तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली करावेत. व्हिडिओ बघून, पुस्तके वाचून व्यायामाचा अभ्यास करू नये. प्रत्यक्ष शिकावे म्हणजेच बघावे, समजून घ्यावे, प्रात्यक्षिक बघावे आणि तज्ज्ञांसमोर आधी करावे, एकदा नीट व्यायाम येतो आहे, याची खात्री झाली की स्वत: घरी केला तरी चालेल.
मास्क असल्यामुळे काही अंशी शिट्ट्या वाजविणे कमी होते. त्या ऐवजी लाईट बटणाचा सुयोग्य वापर होतो. पण, काही पोलीस जुन्या पद्धतीत इतके रुळलेले असतात की, शिटी वाजवूनच वाहतूककोंडीवर नियंत्रण करायला त्यांना जमते. त्यांना धुळीबरोबरच अतिकर्णकर्कश आवाजांना सामोरे जाते लागते. सततच्या अतिआवाजाचाही शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. हलके, हळू आवाज ऐकणे थोड्या थोड्या प्रमाणात कमी होऊ लागते. क्वचितप्रसंगी बधीरत्व येते. याबरोबरच सततच्या ताणामुळे व आवाजामुळे vertigo आजार जडतो. सततच्या तीव्र ध्वनिप्रदूषणाने रक्तदाब वाढू शकतो. हे टाळण्यासाठी कर्णेन्द्रियांची क्षमता वाढविणे व टिकविणे महत्त्वाचे. यासाठी कर्णपूरणाचा फायदा होतो. काही विशिष्ट व्यायामांचाही vertigo सारख्या तक्रारींवर औषधांबरोबर चांगला गुण येतो. सतत प्रदूषणात, कर्णकर्कश आवाजामध्ये, तळपत्या उन्हात उभे राहून काम करणे सोपे नाही. शारीरिक कष्ट आणि मानसिक ताण दोन्ही सतत असतात. उन्हात राहिल्याने त्वचा काळवंडते. घामाचे प्रमाण अधिक असल्यास त्यावर धुलिकण जमून, त्वचेवर पुरळ येतात. त्वचा तेलकट असल्यास खाज खूप वाढते, तारुण्यपीटिका येऊ शकतात. घाम आणि धूळ-धूर याने त्वचेवर fungal infection होण्याची शक्यता बळावते. सूर्याच्या अतितीव्र किरणांमुळे early ageing signs जसे केस गळणे, पिकणे, त्वचा सुरुकतणे इ. विकार उत्पन्न होतात. उन्हापासून काळजी घेणे गरजेचे आहे. uv radiationचा त्रास अधिक झाल्यास चिघळणारे त्वचाविकारही होतात म्हणून संपूर्ण सुती कपडे आणि सर्व शरीरभर कपडे असावेत. हलक्या रंगाचे कपडे सूर्यकिरणे कमी खेचतात. म्हणूनच वाहतूक पोलिसांचा पूर्ण हातांचा पांढरा शर्ट हा गणवेश असतो. त्वचेची प्रतिकार क्षमता ही अभ्यंग आणि उद्वर्तनाने उत्तम टिकते. डोक्यावर टोपी असणे अत्यंत गरजेचे आहे. टोपीच्या आत सुती रुमाल घालावा. टोपी जर घामाने भिजली, तर ती धुता येत नाही आणि घाम टोपीत वाळला की टोपीला दुर्गंधी तर येतेच, पण वारंवार असे झाल्याने खाजही येऊ लागते. डोक्यात छोटेछोटे पुरळ उठतात. इथेही क्वचित इनफेक्शन होऊन लस वाहते. सुती रुमाल रोजच्या रोज बदलावा. रुमाल ओला झाल्यावर दुसरा घ्यावा.
बदलत्या ड्युटीमुळे नियमित जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. त्यामुळे झोपेचे आणि जेवणाचे तारतम्य राहत नाही. बहुतांशी पोलिसांचा ड्युटी करून आल्यावर, जेवून झोपणे हाच दिनक्रम असतो. असा क्रम ठेवू नये. रात्रीची झोप ही खरी झोप. रात्रीदेखील जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान दोन-अडीच तासांचे अंतर असावे. असे नसल्यास पचन नीट होत नाही. मेदाची (चरबीची) साठवण शरीरात होऊ लागते. तसेच अनेक इतर त्रास बळावतात. रात्री जेवढे तास जागरण झाले असेल, त्याच्या निम्मा वेळ दिवसा झोपावे आणि तेही उपाशी पोटी, असे शास्त्रवचन आहे. असे न पाळल्यास आम्लपित्ताचा त्रास, मलबद्धता, वारंवार सर्दी-पडसं, अंगदुखी, टाचदुखी, वजन वाढणे इ. सगळे त्रास बळावतात. औषधसेवनाने तात्पुरता आराम मिळतो. जोपर्यंत आहाराचे आणि झोपेचे नियम पाळले जात नाहीत, तोपर्यंत संपूर्ण स्वास्थ्य लाभत नाही. आहार आणि निद्रा यांना आयुर्वेदात ‘उपस्तंभ’ म्हटले आहे; म्हणजेच, इमारत उभी राहण्यासाठी खांबांची गरज असते, तसेच निरोगी आणि स्वस्थ आयुष्यासाठीचे आहार आणि निद्रा शास्त्रबद्धच असावी, कारण त्यावर आपले निरोगी आयुष्य उभे राहते. अधिक काळ ड्युटी असली तरी, सतत सतर्क राहणे गरजेचे असते. आळस, थकवा, कंटाळा, मरगळ यांना वावच नसतो. ताजेतवाने राहण्यासाठी, वेळ घालविण्यासाठी मग व्यसनांची जोड दिली जाते; ज्यामध्ये विडी, सिगारेट, तंबाखू, मावा वगैरे यांचा समावेश असतो. तसेच अभ्यासाअंती असे ही निदर्शनास आले आहे की, जेव्हा स्वत:बद्दल मन साशंक असते, आत्मविश्वास कमी असतो, तेव्हा व्यसने लागण्याची शक्यता अधिक असते आणि एका गटातील सर्वच व्यसने करीत असतील, तर त्यातील एखाद्या निर्व्यसनी किंवा व्यसनमुक्त झालेल्याला पुन्हा मित्रमंडळी व्यसनाच्या दुष्ट चक्रात ओढून घेतात. यामुळे आरोग्य बिघडते.
त्यामुळे मानसिक ताण वाहतूक पोलिसांमध्ये खूप प्रमाणात दिसून येतो. या ताणासाठी विविध कारणे कारणीभूत ठरतात, जसा अपुरा विश्रांतीचा अवधी इ. काही वेळेस डबल ड्युटी, २४ तास ड्युटी असते सणासुदीला (गणपती, नवरात्री उत्सव, ईद, ३१ डिसेंबर इ.) निवडणुकीच्या वेळेस बंदोबस्त लागतो, म्हणून त्यांच्या सुट्ट्याही रद्द केल्या जातात आणि ड्युटीचे तासही वाढविले जातात. या सगळ्यामुळे घरातील माणसांशी संवाद अपुरा होतो. नातेवाईकांना भेटणे शक्य होत नाही. घरातील मंडळी नाराज होतात. त्यातच उष्णतापमान, धूळ-धूर, आवाज याने अधिक त्रस्त व्हायला होते. जमाव अधिक झाला की त्याला नियंत्रित करणेही खूप जिकरीचे असते. दगडफेक, लाठीमार यांमध्ये दुखापतही होते. या सर्वांचे ताण, दडपण मनावर येणे स्वाभाविकच आहे. कामानिमित्त बाहेर असताना घरातील अडीअडचणीला धावून जाणे नेहमीच शक्य होत नाही. यामुळे आपल्याच मनाला अपराधी वाटू लागते. ज्या ठिकाणी एकत्र काम केले जाते तेथील आपापसातील बंधने तणावमुक्त नसल्यास, रिपोर्ट चांगला नसल्यास ताण वाढतो. रस्त्यांवरील अपघातात जीवांची हानी बघितल्यानेही अस्वस्थ व्हायला होते आणि हा ताण घालविण्यासाठी व्यसनांची मदत घेतली जाते, जी सर्वेतोपरी चुकीची आहे. त्यामुळे व्यसनाने प्रश्न सुटत नाही, केवळ संवेदना बोथट होतात, हे या आणि इतरही व्यवसायात कार्यरत नोकरदार मंडळींनी स्मरणात ठेवले पाहिजे. शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असल्यास कुठल्याही आव्हानांना सामोरे जाणे, त्यांच्याशी दोन हात करणे शक्य आहे. यासाठी चांगल्या सवयी अंगिकारणे गरजेचे आहे. (क्रमश:)
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/