'सेक्रेड गेम्स'ची निर्मिती करणारी 'फँटम फिल्म्स'चे शटर डाउन

    06-Oct-2018
Total Views |


 

 

मुंबई: 'फँटम फिल्म्स'चे नाव येताच लक्षात येते ते त्यांनी निर्मिती केलेल्या दर्जेदार चित्रपटांची नावे. तरुण निर्माते, बोल्ड विषय आणि लक्षात राहतील अशा कलाकृती या सगळ्यांचा लेखाजोखा आपल्याला या कंपनीने दिला आहे. २०११ रोजी अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, विकास बहल आणि मधू मंटेना या चौघांनी भागीदारीमध्ये या कंपनीची सुरुवात केली होती. चर्चेत असलेल्या 'सेक्रेड गेम्स'ची निर्मिती सुद्धा याच कंपनीने केली होती. मात्र आता हे चौघे या बॅनरखाली एकत्र काम करणार नाहीत. कारण या चौघांनी आपापले मार्ग वेगळे केले असून फँटम कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रमादित्य मोटवानीने ट्विटवरून ही घोषणा केली. 

 

‘विकास, मधू, अनुराग आणि मी मिळून फँटमची पार्टनरशिप तोडण्याचा निर्णय घेतला आहे. फँटमचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत मजेशीर आणि अविस्मरणीय राहिला. माझे हे तीन पार्टनर माझ्या कुटुंबियांसारखे आहेत. सात वर्षांपर्यंत आम्ही एकमेकांची साथ दिली. त्या तिघांनाही मी भविष्यासाठी शुभेच्छा देतो,’ असं ट्विट मोटवानीने केले आहे.

 
 
 

अनुराग कश्यपनेही ट्विट करत फँटमविषयी सांगितले, ‘फँटम एक स्वप्न होते, एक अत्यंत सुंदर स्वप्न आणि प्रत्येक स्वप्नाचा अंत हा होतोच. आम्ही खूप मेहनत केली, यशस्वी ठरलो आणि फेलसुद्धा झालो. पण यापुढे आम्ही आणखी मजबूत होऊन पुढे येऊ आणि आपापल्या मार्गावर चालत स्वप्न पूर्ण करू.

 
 
 

फँटम कंपनीने निर्मिती केलेले काही चित्रपट म्हणजे 'लुटेरा', 'रमण राघव', 'अग्ली', 'ट्रॅप', 'क्वीन' आणि 'मुक्कबाज' असे आहेत. 'क्वीन'ला चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अनुराग, विकास, मधू आणि विक्रमादित्य हे गेल्या सातहून अधिक वर्षांपासून एकत्र काम करत होते. नुकत्याच या निर्मिती संस्थेने ‘मनमर्जियां’ चित्रपटाची निर्मिती केली होती. तर मकरंद माने दिग्दर्शित 'यंग्राड' हा मराठी चित्रपटांचीही निर्मिती केली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/