स्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018   
Total Views |


 


मागच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी देशातील पहिल्यास्मार्ट फेन्सिंग’ प्रणालीचे उद्घाटन केले. पाच किलोमीटरच्या या पथदर्शी प्रकल्पाच्या सफलतेनंतर भारत-पाकदरम्यान असलेली सीमा या प्रणालीने सुरक्षित करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांना घुसखोरी करणे अशक्य होणार आहे. आगामी काळात भारताच्या सर्व सीमा अशाच प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभेद्य होतील, अशी आशा आहे.

 
 

कार्यक्षम व प्रभावी सीमा

 

भारताच्या बांगलादेशच्या - चार हजार ३५१ किमी व पाकिस्तानच्या तीन हजार २४४ किमी सीमेचे रक्षण बीएसएफ करत आहे. बांगलादेश सीमा पार करून आतापर्यंत पाच कोटी बांगलादेशींनी भारतात घुसखोरी केली आहे. त्यामुळे सीमेचे रक्षण करण्यास बीएसएफ कशी अकार्यक्षम ठरली आहे, त्याचे हे जीवंत उदाहरण आहे. शेजारी राष्ट्रांशी संबंध फारसे सलोख्याचे नसल्यामुळेभारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हानाचा सीमा व्यवस्थापनाशी संबंध जोडला गेला आहे. पाकिस्तानशी असलेले वाद व अन्य सीमाप्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेता, सीमा व्यवस्थापन अतिशय कार्यक्षम व प्रभावी असणे गरजेचे आहे. सशस्त्र दहशतवाद्यांची घुसखोरी व शस्त्रांची तस्करी, नार्को टेरोरिझम व शस्त्रांच्या तस्करांचे असलेले लागेबांधे, घुसखोर, फुटीरतावादी चळवळींना मदत पुरविणारे व पोसणारी बाह्यकेंद्री सत्तावर्तुळे, सीमेलगत मदरशांची वाढणारी संख्या यामुळे सीमा व्यवस्थापनासमोर अनेक आव्हाने आहेत. अमली पदार्थांचे तस्कर व भरपूर पैसा हाती असलेले दहशतवादी यांनी निम्नस्तरातील काही राजकीय नेते, पोलीस, स्थानिक लोकांशी सूत जुळविलेले आहे. त्यामुळे सीमासंरक्षणाचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो. म्हणूनच सीमारक्षणासाठीच्या उत्तम व्यवस्थापनाला आता व भविष्यात नेहमीच प्राधान्य मिळायला हवे.

 

पाकिस्तानातील सरकार बदल

 

इमरान खान यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या काळातही या धोरणात बदल अपेक्षित नाही. इमरान यांचे सरकार लष्कराची कठपुतळी आहे. पाकिस्तानमधून प्रशिक्षित दहशतवादी सातत्याने घुसखोरी करून सीमावर्ती भागात दहशत माजवत आहेत. पाकिस्तानात सरकार बदलल्यामुळे परिस्थितीत फारसा फरक पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे भारताला सीमेवर अधिक जागरूक राहणे आणि त्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर उभारण्यात येत असलेली अदृश्य भिंत दहशतवाद्यांच्या हालचाली टिपण्यासाठी आणि त्यांचा खात्मा करण्यासाठी उपयुक्त ठरेल. खुल्या युद्धात भारताकडून चार वेळा पराभव पत्करावा लागलेला असूनही पाकिस्तानने कोणताही धडा घेतलेला नाही. शांततेची भाषा पाकिस्तानला समजत नाही.

 

सध्याची परिस्थिती

 

बीएसएफला घुसखोरी, तस्करी, अवैध व्यापार आणि अमली पदार्थांचा व्यापार रोखण्यात वारंवार अपयश येत आहे. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय सीमेवर एक तारेचे कुंपण तयार करण्यात आले आहे. ठराविक अंतरावर सीमा सुरक्षादलाच्या चौक्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. चौक्यांच्यामधील अंतर पेट्रोलिंग करून त्यावर लक्ष ठेवले जाते. मात्र, ते सक्षम नाही. सीमा भागात अनेक ठिकाणी नदी आणि नाले वाहतात. वाहत्या पाण्यात तारेचे कुंपण उभे करणे खूप अवघड असते. भारत-बांगलादेश सीमेचेच उदाहरण घेतल्यास, या सीमेवरील १२ ते २० टक्के भाग नदीमय असल्याने तिथेही तारेचे कुंपण लावणे अशक्य आहे. सद्यपरिस्थितीत या जागी हेलिकॉप्टरने पेट्रोलिंग केले जाते. मात्र, कायमस्वरुपी लक्ष ठेवण्यासाठी कोणीही नसल्याने हा भाग कमकुवत समजला जातो. म्हणून आपण ‘स्मार्ट फेन्सिंग’ तयार केले, तर तिथे होणारी घुसखोरी तसेच अवैध व्यापार/तस्करी रोखण्यात यश मिळेल. नदी-नाल्यांनी वेढलेल्या या भागाच्या सुरक्षिततेसाठी ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम’ अस्तित्वात आली आहे.

 

बॉर्डर मॅनेजमेन्ट सिस्टीम

 

भारत-पाक सीमेवर ‘स्मार्ट फेन्सिंग’ ही सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली सुरुवात आहे. ‘स्मार्टफेन्सिंग’च्या योजनेवर भारत सरकार प्रदीर्घ कालावधीपासून काम करीत आहे. आता प्रायोगिक तत्त्वावर पाच किलोमीटरच्या सीमेवरकॉम्प्रेहेन्सिव्ह इन्टिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेन्ट सिस्टीम’ (सीआयबीएमएस) उभारण्यात आली आहे. यानुसार या सीमाभागात विविध प्रकारची साधने लावण्यात येतील. यातील सोनार सिस्टीमच्या माध्यमातूनदुसऱ्या बाजूने होणाऱ्या आवाजावरून शत्रू येतो आहे, याची सूचना मिळेल. थर्मल इमेजिंगच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या दुर्बिणीतून रात्रीच्या वेळी येणाऱ्या शत्रूवरती लक्ष ठेवता येईल. याखेरीज ‘अनअटेंडेट ग्राऊंड सेन्सर’ म्हणजे जमिनीच्या आत काही साधने लपवलेली असल्याने त्यावरून कोणी गेल्यास त्याची सूचना मिळेल. त्याशिवाय तारेच्या कुंपणावर कॅमेरे लावले जातील. त्यावरून समोरच्या भागाचे चित्रण सातत्याने होत राहील. विविध साधनांनी दिलेली सर्व माहिती एका नियंत्रण कक्षात येईल. तिथे ती एकत्रित करून कोणत्या भागात गडबड होते आहे हे कळेल.

 

ही एक अदृश्य भिंतच असून, ही प्रणाली जमिनीवर, पाण्यात आणि हवेतही कार्यरत राहू शकते. ‘सीआयबीएमएस’ अंतर्गत जमिनीवर ऑप्टिकल फायबर प्रणाली, पाण्यात सेन्सरयुक्त सोनार सिस्टीम आणि हवेत हाय रिझोल्यूशन कॅमेरे आणि एअरोस्टॅट कॅमेऱ्याच्या माध्यमातूनशत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची सुविधा आहे. हायटेक प्रणालीने युक्त सीआयबीएमएस प्रणालीच्या माध्यमातूनसीमेवरील हालचालींची खबर तातडीने कंट्रोल रूमला देता येते. कोणत्याही आणीबाणीच्या क्षणी जलद कृती पथक तातडीने घटनास्थळी पोहोचेल. अशा प्रकारची एक किलोमीटर हायटेक भिंत उभी करण्यासाठी किमान दीड कोटी रुपयांचा खर्च येतो. सर्व बांगलादेश व पाकिस्तान सीमेवर हे अभेद्य कवच उभारण्याचे उद्दिष्ट आहे. प्राधान्याने सीमेवरील १३० धोक्याच्या ठिकाणांवर ही अभेद्य, अदृश्य भिंत उभारण्यात येणार आहे. दर सहा किलोमीटरवर नियंत्रण कक्ष असणार आहे. भारत-पाक दरम्यानची सीमा अभेद्य करण्याचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. इन्फ्रारेड लेसर बेस्ड इन्ट्रूजन डिटेक्टर, सोनार सिस्टीम आणि एअरोस्टेट तंत्रज्ञानाने युक्त असलेली ही प्रणाली सीमेवर घुसखोरांना शोधून काढण्याचे काम करेल. भारत आणि बांगलादेशदरम्यान असणाऱ्या ४,३५१ किलोमीटर लांबीच्या सीमेवरही भविष्यात ही प्रणाली तैनात करण्यात येणार आहे.

 

अंमलबजावणीमध्ये येणारी आव्हाने

 

ही संकल्पना खूप चांगली आणि उपयोगी असली तरीही तिच्या अंमलबजावणीमध्ये येणारी आव्हानेही भरपूर आहेत. या सर्वच साधनांना विजेची आवश्यकता आहे, मात्र विजेची उपलब्धता नाही. त्याशिवाय नेटवर्कसाठी लागणारे फायबर केबलचे जाळे तिथे पसरलेले नाही. त्यामुळे सीमाभागात विशेष नेटवर्किंग जाळे निर्माण करावे लागेल. या भागामध्ये अनेक ठिकाणी जंगले आहेत. खूप ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. ढग खाली येतात. या हवामान बदलांमध्ये अनअटेंडेट सेन्सर, रात्रीच्या दुर्बिणी या पुरेशा सक्षमपणे काम करू शकणार नाहीत. एवढेच नव्हे, तर आवाज ओळखणारी सोनार सिस्टीमदेखील काम करत नाही. तसेच पलीकडील बाजूने चित्ता किंवा लांडगा येत असेल, तर त्यामुळे दिशाभूल होऊ शकते. वाऱ्याची दिशा बदलली तर आवाज कमी होतो. त्यामुळे आवाजाने शत्रूला ओळखण्याच्या प्रयत्नात अनेक प्रकारचे अडथळे निर्माणहोतील. ढग खाली उतरल्यास थर्मल इमेजिंग हे चांगल्या प्रकारे काम करत नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वीज कापली गेली, तर ते काम करू शकत नाहीत. या सर्वच गोष्टींची आपल्याला तयारी ठेवावी लागणार आहे.

 

स्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंट’ आणि तंत्रज्ञान

 

असुरक्षित सीमांमुळे केवळ सीमावर्ती भागांमध्येच तणाव निर्माण होतात असे नाही, तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेलाही त्यामुळे धोका उत्पन्न होतो. ‘स्मार्ट फेन्सिंग’ योजना सेन्सर, ग्राऊंड रडार, थर्मल इमेजर, लेसर अशा तंत्रज्ञानांच्या मदतीने सीमा अधिक सुरक्षित होणार आहेत. जवानांना कमी जोखीम पत्करावी लागेल आणि लपूनछपून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना लक्ष्य करणे जवानांना सोपे जाईल. सर्व बाबींचा विचार करता, ही अदृश्य भिंत पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांचे मनसुबेउधळून लावेल, यात शंकाच नाही. ‘स्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंट’मध्ये तंत्रज्ञानाची आवश्यकता नक्कीच आहे. मात्र, त्याशिवाय हुशार आणि जागरूक सैनिकांची गरज आहे. तंत्रज्ञान आणि सैनिक यांचे मिलनहोईल. त्यावेळी आपल्या सीमा या अधिक सुरक्षित होतील. संपूर्ण सीमेवर अशा प्रकारची अदृश्य भिंत उभारण्यास आणखी काही वर्षांचा कालावधी लागेल. तथापि, घुसखोरीच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या क्षेत्रांमध्ये हे काम तातडीने पूर्णत्वास नेले जावे.

 


 
 
 
स्मार्ट फेन्सिंग’ बसवलेले देश

 

* इस्रायलने जॉर्डनच्या सीमेवरून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी ‘स्मार्ट फेन्सिंग’ची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

 

* अमेरिकेने मेक्सिकोलगतच्या सीमेवरून होणारी घुसखोरी रोखण्याकरिता २०१७ मध्ये इस्रायलमधील ‘एलबिट सिस्टीम’ या कंपनीशी ‘स्मार्ट फेन्सिंग’बाबत करार केला. या हायटेक कुंपणामध्ये टेहळणी टॉवरव्यतिरिक्त अत्याधुनिक सेन्सर, रडार, सेन्सर टॉवर, मॉनिटर युनिट आणि हायटेक संवादप्रणाली असणार आहे.

 

* सौदी अरेबियाने इराकशी जोडलेल्या सीमेवर २०१४ मध्ये ‘स्मार्ट कुंपण’ घातले होते. पाचस्तरीय फेन्सिंगमध्येनाईट व्हिजन कॅमेरा, टेहळणी टॉवर, रडार युनिट आणि फायबर ऑप्टिक नेटवर्क होते.

 

* बुल्गारिया आणि हंगेरी या देशांनीही बेकायदेशीर घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर २०१५ मध्येइस्रायलमधील मेग्ना बीएसपी या कंपनीशी ‘स्मार्ट फेन्सिंग’बाबत करार केला.

 

* मोरक्कोने अल्जेरियामधून होणाऱ्या घुसखोरीला चाप लावण्यासाठीच याच मार्गाचा अवलंब केला आहे.

 

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@