मुंबई : राममंदिराचा प्रश्न हा हिंदू-मुस्लिम किंवा मंदिर-मशीद यांमधील प्रश्नच नाही. न्यायालय उगाच मंदिराबाबतचा निर्णय लांबवत आहे. आता सरकारने जमीन अधिग्रहित करून रामजन्मभूमीवर राम मंदिर बांधावे, एवढीच साधी गोष्ट आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी मंडळ बैठकीला भाईंदरजवळील केशवसृष्टी येथे प्रारंभ झाला, त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनमोहन वैद्य बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी मंडळ बैठक कित्येक वर्षांनंतर प्रथमच मुंबईत होत आहे. दि. २ नोव्हेंबरपर्यंत ही बैठक चालेल. बुधवारी सकाळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत बैठकीला प्रारंभ झाला. या बैठकीला रा. स्व. संघाचे सर्व अखिल भारतीय पदाधिकारी, क्षेत्र व प्रांत स्तरांवरील संघचालक, कार्यवाह आणि प्रचारक आदी उपस्थित आहेत. बैठकीला प्रारंभ झाल्यानंतर सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर बैठकीविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच, यावेळी पत्रकारांकडून पुन्हा एकदा राममंदिराचा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता वैद्य यांनी राममंदिराविषयी विस्तृतपणे भूमिका स्पष्ट केली. संघाचे अ. भा. संपर्क प्रमुख अरूण कुमार व सहसंपर्क प्रमुख नरेंद्र कुमार ठाकूर हेही यावेळी उपस्थित होते.
वैद्य म्हणाले की, राममंदिर हा प्रश्न हिंदू-मुस्लिम किंवा मंदिर-मशीद असा नाहीच. बाबराच्या सैन्याने भूभाग काबीज केला तेव्हा त्याला नमाजासाठी खूप जागा उपलब्ध होती. न्यायालयानेही म्हटले आहे की, मशीद कुठेही बांधता येईल, त्यासाठी अनेक जागा उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर, मुस्लिम विचारवंतांनीही हेच म्हटले आहे की, मंदिर तोडून मशीद बांधणे योग्य नाही, आणि हे सर्वांचे म्हणणे हेच असल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले. सोमनाथ मंदिराचीही अशीच पुनर्स्थापना केली गेली, याचेही स्मरण त्यांनी करून दिले. राममंदिराच्या विषयात अकारण राजकारण आणले जात असून न्यायालयात वारंवार सिध्द झाले आहे की त्या जागेवर पूर्वी मंदिर होते ते तोडून मशीद बांधली गेली. त्यामुळे आता सर्व काही स्पष्ट आणि सिद्ध झालेले असून केवळ ती जमीन अधिग्रहित करून तेथे मंदिर बांधायचे शिल्लक असल्याचे ते म्हणाले. तसेच, न्यायालय उगाच निर्णय लांबवत असल्याचे सांगत सरकारनेही जमीन अधिग्रहित करून आपले वचन पाळावे, असे आवाहन मनमोहन वैद्य यांनी केले. तसेच, राममंदिर बांधणे म्हणजे देशाचा अभिमान पुनर्स्थापित करणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरणीय समस्यांवर राष्ट्रीय स्तरावर काम करणार
मनमोहन वैद्य यावेळी म्हणाले की, पर्यावरणविषयक विविध प्रश्नांवर संघाच्या कामातील एक 'गतिविधी' म्हणून अखिल भारतीय स्तरावर काही काम करण्याचे संघाने ठरवले आहे. सदर बैठकीतही याबाबत विस्ताराने चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ग्रामविकास, गोसंवर्धन, कुटुंब प्रबोधन व सामाजिक समरसता आदी गतिविधींद्वारे संघाने गेल्या काही वर्षांत केलेल्या कामाचाही वैद्य यांनी यावेळी उल्लेख केला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखा व संपर्काच्या माध्यमातून देशभरात झालेल्या व दिवसागणिक होत असलेल्या विस्ताराबाबतही त्यांनी माहिती दिली.
स्वयंसेवकांना आता आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीदरम्यान संघ स्वयंसेवक ठिकठिकाणी सेवाकार्य करतात. त्याबाबत त्यांना कोणतेही प्रशिक्षण नसते. ते केवळ समाजाबद्दलची आपलेपणाची भावना म्हणून हे कार्य करतात. परंतु, जर स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत काही प्रशिक्षण दिले, तर ते अधिक चांगल्या प्रकारे सेवाकार्य करू शकतील. त्यामुळे असे काही प्रशिक्षण देण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती मनमोहन वैद्य यांनी यावेळी दिली. तसेच, देशातील युवकांमध्ये राष्ट्रव्यापी सर्वेक्षण करून त्यांना सामाजिक कार्यात कसे जोडता येईल, याबाबतही बैठकीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निराधार आरोप ही काँग्रेसची सवयच !
सरदार पटेलांच्या विषयावरून व इत अनेक विषयावरून काँग्रेस पक्षाने रा. स्व. संघावर केलेल्या टीकेविषयी मनमोहन वैद्य यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, निराधार आरोप ही काँग्रेसची सवयच आहे. त्यांनी बोलत रहावे, संघ वाढतच राहील, असाही टोला वैद्य यांनी यावेळी लगावला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/