कोणत्याही युवकास जर पाण्याच्या या व्यवसायात उतरायचं असेल तर त्यास अगदी आर्थिक गुंतवणुकीपासून ते यंत्र स्थापित करण्यापर्यंत सर्वतोपरी सहकार्य करण्याची अभिजीत सूर्यवंशी यांची तयारी आहे.
इथून पुढचं महायुद्ध हे जमिनीसाठी नव्हे तर पाण्यासाठी होईल, हे कुण्या तत्ववेत्त्याचं कथन नाही तर ती वस्तुस्थिती आहे. कुवैतसारख्या देशात तर पेट्रोलपेक्षा पाणी महाग विकलं जातं, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये पाण्यावरून यादवी माजण्याइतपत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या पाण्याचं हे भविष्यकालीन चित्र पाहून त्या तरुणाला एक कल्पना सुचली. त्या कल्पनेमुळे शुद्ध आणि थंड पाणी तर मिळणारच होतं पण सोबत रोजगारही उपलब्ध होणार होता. ही कल्पना होती पाण्याच्या एटीएम मशीनची. पाण्याच्या एटीएमद्वारे सर्वसामान्यांना पाणी उपलब्ध करून देणारा तो तरुण म्हणजे ऍक्वाड्यूचे अभिजीत सूर्यवंशी. चाळीसगावच्या नगरपालिकेत क्लार्क असणारे एकनाथ सूर्यवंशी म्हणजे शिस्तीने एकदम कडक. तेवढ्याच मायाळू लताबाई. अशा या दाम्पत्याच्या पोटी अभिजीतचा जन्म झाला. अभिजीत आजी-आजोबा, काका-काकी, आत्या अशा २२ जणांच्या संयुक्त कुटुंब पद्धतीत मोठा होत होता. १० एकर जमिनीव्यतिरिक्त दुधाची डेअरी हा या कुटुंबाचा अजून एक व्यवसाय. गाईंसाठी चारा विकत आणणे, दुधाचे पैसे आणणे ही सगळी कामे अभिजीत वयाच्या ११ व्या वर्षी शिकला. एकदा अभिजीत पैसे आणायला गेला. समोरच्या व्यक्तीने पैसे दिले. अभिजीतने पैसे न मोजता सरळ खिशात टाकले. घरी आल्यावर पैसे तपासले तर ३८० रुपयांऐवजी ३५० रुपयेच होते. ३० रुपये कमी दिले होते. पण बाबांना कसं सांगणार? हा मोठाच प्रश्न होता. अभिजीत रडू लागला. थोड्या वेळाने ती व्यक्ती अभिजीतच्या बाबांना म्हणाली, “अहो साहेब, लेकरू लईच रडू लागलंय. सांगतो खरं काय ते. बाळा तुझ्या बाबानंच सांगितलेलं ३० रुपये कमी दे म्हणून. हे घे राहिलेलं पैसं.” ती व्यक्ती गेल्यावर एकनाथरावांनी अभिजीतला जवळ घेऊन सांगितले की, व्यवहार करताना न मोजता कधीही पैसे घ्यायचे नाही आणि कधीही पैसे द्यायचे नाही. ११ वर्षांच्या लहानग्या अभिजीतसाठी हा मोठाच धडा होता.
इलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेलिकॉम विषयात अभिजीतने डिप्लोमा केला. कॉलेजमध्ये शिकत असतानाच पाण्याच्या शुद्धीकरणाची मशीन विकण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कंपनीत १९९९ साली अभिजीत नोकरीस लागला. एका घराला भेट देण्यासाठी २० रुपये मिळत. जळगाव-औरंगाबाद एवढा मोठा विभाग फिरावा लागे. घरोघरी जाऊन मशीन विकावी लागे. पहिली मशीनची ऑर्डर दीड महिन्यांनी मिळाली. कॉल ऑफ रिजेक्शन किती वाईट असतो, पण तो तुम्हाला परिपूर्ण बनवतो, हा दुसरा धडा अभिजीतला शिकायला मिळाला. आयुष्यातला पहिलाच पगार हा ३१०० रुपये इतका मिळाला. पहिल्या पगाराची किंमतच वेगळी होती. सगळा पगार अभिजीतने आईकडे पाठवून दिला. अशीच नोकरी करीत असताना एक दिवस कामासाठी बाहेर जायचं होतं. त्यासाठी अभिजीतने बॉसकडे त्यांची यामाहा गाडी मागितली. “यामाहा अशीच मिळत नाही. ती कमवायला जिगर लागते,” बॉसचं हे वाक्य जिव्हारी लागलं. अभिजीतने ती नोकरी सोडली आणि त्याच कंपनीची फ्रँचाईझी घेतली. २००१ मध्ये सुरू झालेल्या फ्रँचाईझीसाठी अभिजीतला भागीदारीचा प्रस्ताव होता. भागीदारी करू इच्छिणारे मार्केटिंग करू देणार होते. ते सुद्धा परगावात राहायचे. त्यामुळे भागीदारीला न्याय देऊ शकणार नव्हते, हे स्पष्ट होतं. फक्त मार्केटिंगसाठी भागीदारी करणं कितपत योग्य, हे ज्ञान तर आपणसुद्धा आत्मसात करू. त्यानंतर ही भागीदारी टिकेल का? असे अनेक प्रश्न अभिजीतच्या मनात डोकावले. शेवटी भागीदारी करायची नाही, असं अभिजीतने ठरवलं. बँकेत जमा असलेले ६० हजार रुपये आणि नातेवाईक, मित्रांच्या माध्यमातून जमा केलेले १ लाख, ८० हजार अशा २ लाख, ४० हजार रुपयांची गुंतवणूक केली. फ्रँचाईझीचा ४ वर्ष व्यवसाय केला. आता स्वत:चंच काहीतरी सुरू करावं, हे अभिजीतने मनाशी पक्कं केलं.
पाण्याच्या शुद्धीकरणासाठी लागणाऱ्यां मशीन अभिजीत स्वत: तयार करू लागले. या व्यवसायात आत्याचा मुलगा, ज्या वसतिगृहात राहत होते तिथल्या कॅन्टीनमधला वेटर, ज्या एकलव्य फाऊंडेशनमध्ये शिकवलं तेथील मुलं अशा अनेक तरुणांना रोजगार दिला. १० बाय १० च्या छोट्या खोलीतून सुरू झालेला हा प्रवास १३०० चौरस फूट पर्यंत स्थिरावला. दर महिन्याला ९०-१०० मशीन्स विकल्या गेल्या. एका गावात जमिनीतून कडू पाणी येत होतं. तिथल्या पाण्याचं शुद्धीकरण करून पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी अभिजीत यांनी दर्शवली. मात्र, त्यांना इतर सुविधांसाठीसुद्धा पाणी पाहिजे होतं. त्यामुळे त्या प्रकल्पाचं पुढे काही झालं नाही. मात्र, यातूनच पाण्याच्या एटीएमचा उगम झाला. त्यांनी पहिलं पाण्याचं एटीएम बाबजी इस्पितळ, चाळीसगाव येथे उभारलं. सुरुवातीला लोक येत आणि शुद्ध व थंडगार २० लीटर पाण्याचा जार घरी घेऊन जात. एवढंच पाणी इतर दुकानदार २५ रुपयांना विकत. खान्देश तसा दुष्काळग्रस्त भाग. त्यामुळे शहरी भागातील लोक शुद्ध आणि थंड पाण्यासाठी एवढे पैसे आरामात मोजत. पुढे अभिजीत यांनी दररोज पाणी नेणाऱ्या ग्राहकांना पाण्याचे एटीएम कार्ड्स दिले. १०० रुपयांचे रिफिल केले. आता लोक २० लीटर रुपये पाण्यासाठी ५ रुपये स्वाईप करून पाणी घेऊन जाऊ लागले. ४ व्यक्तींच्या कुटुंबासाठी हे पाणी मुबलक होतं. अशा प्रकारच्या २०० हून अधिक मशीन्स अभिजीतच्या ऍक्वाड्यूने बसविलेल्या आहेत. सध्या या कंपनीत २२ कर्मचारी कार्यरत असून ५ कोटी रुपयांच्या आसपास त्याची उलाढाल आहे. कोणत्याही युवकास जर या व्यवसायात उतरायचं असेल तर त्यास अगदी आर्थिक गुंतवणुकीपासून ते यंत्र स्थापित करण्यापर्यंत सर्वतोपरी सहकार्य करण्याची अभिजीत सूर्यवंशी यांची तयारी आहे. मात्र त्यासाठी त्या युवकाकडे दोन गोष्टी आवश्यक आहेत. पहिलं म्हणजे योग्य स्थान आणि दुसरं म्हणजे त्या युवकाची जिद्द. सन २०२१ पर्यंत ४० लाख लोकांना या माध्यमातून पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं, हा अभिजीत सूर्यवंशी यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आतापर्यंत आपण पैशांचं एटीएम पाहिलं होतं. पण पाण्याचं हे एटीएम भविष्यात क्रांतिकारक ठरेल, हे मात्र निश्चित.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/