तिचा सांस्कृतिक वारसा भाग ९

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2018   
Total Views |


 

चला, या वारशाचे जतन करूया!


आपला वारसा जपण्यासाठी व संस्कृतीलक्ष्मीचे संवर्धन करण्यासाठी पुन्हा एकदा प्रतिज्ञा घेऊ- माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.

 

घटस्थापनेपासून आपण स्त्रीजीवन सुंदर व समृद्ध करणारा सांस्कृतिक वारशाचा एक ओझरता मागोवा घेतला. पूर्वापार चालत आलेल्या काही परंपरा पाहिल्या. काळाप्रमाणे परंपरा आपोआप बदलत जातात. काही वाईट परंपरा समाजप्रबोधनाने गळून पडतात. काही प्रयत्नाने मोडून काढाव्या लागतात पण, मानवी जीवन समृद्ध करणार्‍या परंपरा ‘वारसा’ म्हणून जतन केल्या जातात. हा वारसा आपल्याला सहज मिळत असल्याने, त्याच्या अस्तित्वाची जाणीव नसते. उदाहरणार्थ, आजकाल अगदी सहज, ‘माय लाईफ, माय रूल्स’ असे म्हणलेले ऐकतो. जिथे आपली भाषा, आपले शिक्षण, आपली वेशभूषा, आपले खाद्यपदार्थ, आपला धर्म, आपली ओळख इतकेच काय, आपले नावसुद्धा एका सांस्कृतिक परंपरेतून येते, तिथे आपलं जगणं हे खरोखर स्वत:चे किती आणि वारशाने मिळालेले किती? भाषेशिवाय जिथे विचारही खुंटतो, तिथे ‘माय लाईफ, माय रूल्स’ हे शब्द तरी कुठून येणार? एखादी परंपरा मोडताना आपण हजारो वर्षांच्या विचारांवर, शेकडो पिढ्यांच्या कष्टांवर, पूर्वजांच्या शहाणपणावर पाणी सोडत असतो, हे लक्षात घ्यायला हवे. त्यावर एकदा नाही हजार वेळा विचार करायला हवा. त्या परंपरेचा नक्की उद्देश काय, आणि ती परंपरा मोडून काय साध्य होणार आहे, हा विचार निश्चित हवा.

 

मराठी शाळा? No way! असे म्हणून, आपण सावत्र आईच्या, छे! सावत्र आई कसली, शेजारिणीच्या, छे! छे! ती तर शेजारीण पण नाही, कुठल्या तरी दुसर्‍याच बाईच्या भाषेतून मुलाला शिकायला धाडतो. ती भाषा मातृभाषेच्या प्रेमाने शिकवेल काय? मुलाच्या मनात ती भाषा स्थानिक गोष्टींविषयी प्रेम उत्पन्न करणे राहू दे, त्यांची ओळख तरी करून देईल काय? याने मराठी भाषेचे नुकसान तर होतेच पण आपल्या पाल्याचे किती मोठे नुकसान झाले, याची गणतीच नाही. एकीकडे भोंडल्याला विरोध करायचा. पण मुलीच्या ‘बर्थडे पार्टीला’ तिच्या मित्र-मैत्रिणींना बोलावून गाणी लावून नाच करायचा! यात काय वेगळे केले? किंवा होळीत पाणी वाया घालवू नका, असे म्हणून मुलांना एकमेकांवर पाणी उडवून मजा करायला आडकाठी करायची आणि दुसरीकडे प्रत्येक उन्हाळ्यात स्विमिंग क्लबचे सदस्यत्व घेऊन रोज पोहायला जायचे. यामध्ये कुठे पाणी वाचवले? किंवा दिवाळीत फटाके उडवू नका म्हणायचे. आणि दुसरीकडे पायी जाता येईल, इतक्या अंतरासाठीसुद्धा गाडी काढायची. यामध्ये कुठे प्रदूषण कमी केले? एकीकडे ‘डोहाळ जेवण? मला नाही आवडत बाई!’ म्हणायचं आणि ऑफीसच्या मैत्रिणींकडून ‘बेबी शॉवर’ची पार्टी घ्यायची! तसेच आवळी भोजनाची प्रथा तर आपण कधीच बंद पाडली. पण आता आरोग्याला चांगला असतो म्हणून आवळा ज्यूस विकत घेऊन पितो. पूर्वी आवळी भोजनासाठी आवळ्याचे झाड मुद्दाम लावले जायचे. आजही आवारात आवळ्याचे झाड लावायला जागा आहे, पण आवळी भोजनाचा वारसा गमावल्यामुळे, त्या झाडाची आठवण न होता, शोभेची परदेशी झाडे लावली जातात. आवळ्याचे झाड आवारात असेतोवर त्या झाडाखाली फिरणे, त्याची ताजी फळे खाणे होत असे. फळे देणार्‍या झाडाबद्दल कृतज्ञतेचे नाते निर्माण होत असे. आता आवळ्याचे झाड लावणारा, त्या झाडाकडे कच्चा माल म्हणून बघतो आणि आपण कोरडेपणाने preservatives घातलेला, प्लास्टिकच्या डब्यातला आवळ्याचा ज्यूस पितो. आवळी भोजनाची प्रथा मोडून आपण खरोखर काय मिळवले आणि काय गमावले याचा विचार करायला हवा. एक समज असाही आहे की, परंपरा मोडणे म्हणजे आपण ‘वैज्ञानिक’/’पुरोगामी’ विचारांचे आहोत. त्या ‘समजण्याचा’ पुनर्विचार आवश्यक आहे. आपण जसे हिरीरीने आजोबांच्या घरावर अधिकार सांगतो, तसा त्यांचा पोशाख पण आपली जहागीर आहे. त्यांच्यासारखी पगडी बांधता येत नसेल, त्यांच्यासारखे दुटांगी धोतर नेसता येत नसेल तर आपण आपला वारसा गमावला आहे. आजीसारखी भाकरी करता येत नसेल, तिची ठेवणीतली नऊवारी नेसता येत नसेल तर तिच्या दागिन्यांवर तरी अधिकार कसा सांगायचा?

 

बदलत्या काळात, सांस्कृतिक वारसा जपणे निश्चित कठीण आहे. बाहेरच्या देशांमध्ये आपला वारसा टिकवण्यासाठी केलेली खटपट पहिली की, आपण कुठे आहोत हे कळते. उदाहरणार्थ, लंडनमध्ये केवळ पारंपरिक पद्धतीनेच घर बांधायला परवानगी मिळते. तिथे रस्त्याच्या दुतर्फा वसलेली त्यांची टुमदार घरे आपल्या मनात घर करून बसतात किंवा फ्रान्सने तिथे झालेला फास्टफूडचा सुळसुळाट पाहून, त्यांच्या पौष्टिक खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि ती टिकावी या करिता ‘फ्रेंच कूझीन’ला जागतिक वारशाचा दर्जा मिळवून दिला. तसेच, त्यांना स्वत:च्या वारशाबद्दल आदर व आपलेपणा दिसतो. लंडनमधील Westminister Abbey चर्च किंवा कंबोडिया येथील अंगकोरवट मंदिर, या जागतिक वारसा असलेल्या प्रार्थनास्थळांची सभ्यता राखण्यासाठी ड्रेसकोड लागू आहे. तसेच पुढारलेल्या देशातील लोकांचा सांस्कृतिक वारशाबद्दलचा आदर यातच दिसतो की, एकतर ते वारसा स्थळांवर आपली नावं कोरून ठेवत नाहीत. त्या-त्या स्थळाचे नियम पाळून तिथली परंपरा जपतात आणि रस्त्यात लाल सिग्नलला थांबतात! एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याचे/वास्तूचे नुकसान करणे, हा जसा गुन्हा आहे. तसेच चालत आलेला सांस्कृतिक वारसा विनाकारण मोडणे हा सुद्धा गुन्हा आहे. सांस्कृतिक परंपरेला केवळ विरोधासाठी विरोध करणे, आपल्या मुलांना त्यांच्या हक्काच्या वारशाची ओळख करून न देणे, हा पण गुन्हा आहे. किल्ल्याचे/वास्तूचे नुकसान केले, तर एकवेळ नुकसानीचे मोजमाप करता येईल, पण सांस्कृतिक परंपरेचे नुकसान मोजमापाच्या पलीकडचे आहे. आपला वारसा जपण्यासाठी व संस्कृतीलक्ष्मीचे संवर्धन करण्यासाठी पुन्हा एकदा प्रतिज्ञा घेऊ- ‘माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.’

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@