‘कासवांचे बेट’ : डार्विनची नोंदवही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2018   
Total Views |


 


अमेझॉनचं खोरं आणि जंगल, पेरू देशातील इन्का संस्कृती, दक्षिण अमेरिकेतील पक्षीसृष्टी यांच्याबद्दल असलेल्या प्रचंड कुतूहलातून डॉ. संदीप श्रोत्री यांनी तिथली सफर करायचं ठरवलं आणि त्या संदर्भात माहिती मिळवत असताना गालापगोसनावाच्या द्वीपसमूहाविषयी आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टीबद्दल त्यांना माहिती मिळाली. त्यातूनच हे पुस्तक जन्माला आलं...

 

प्राचीन काळी एका महाकाय गोळ्याच्या बिग बँग स्फोटातून अगणित तुकडे होऊन ते ब्रह्माण्डभर पसरले (खरंतर ब्रह्माण्डही तेव्हाच निर्माण झालं), असं आजचं विज्ञान मानतं. यातून अनेक आकाशगंगा, तारे, ग्रह, अशनी, धूमकेतू जन्माला आले, तसाच आपला सूर्य आणि आपली पृथ्वीही अस्तित्वात आले. पृथ्वीचं वय साधारणपणे साडेचारशे कोटी वर्ष आहे. तिचा एका तप्त गोळ्यापासून ते एक निश्चित, ठोस अशा स्वरूपापर्यंतचा प्रवास खूप मोठा कालखंड उलटेपर्यंत चालूच राहिला. जमिनीचे प्रचंड तुकडे - म्हणजेच आजचे खंड, जलस्त्रोत, ज्वालामुखी अशा अनेक नैसर्गिक घटकांची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या चक्रातून पृथ्वीला आजचं स्वरूप प्राप्त झालं. त्यातूनच पृथ्वीवरील जीवसृष्टीला एक निश्चित दिशा मिळत गेली. एकीकडे दीर्घकाळ अस्तित्वात असलेल्या भूभागावर सजीवसृष्टीच्या उत्क्रांतीचे अधिकाधिक गुंतागुंतीचे, प्रगत टप्पे विकसित होत असताना दुसरीकडे सृष्टीच्या अव्याहत अस्तिस्तोत्रात नवनवीन कडव्यांची भर पडतच राहिली. त्यापैकीच सर्वात अलीकडचं कडवं म्हणजे प्रशांत महासागरातील गालापगोस बेटम्हणजेच कासवांचे बेट’. प्रस्तुत पुस्तक आपल्याला या द्वीपसमूहावरच्या अपरिचित जगाची खिडकी उघडून देतं.

 

अभ्यासकांना खुणावणारं विश्व

 

अमेझॉनचं खोरं आणि जंगल, पेरू देशातील इन्का संस्कृती, दक्षिण अमेरिकेतील पक्षीसृष्टी यांच्याबद्दल असलेल्या प्रचंड कुतूहलातून डॉ. संदीप श्रोत्री यांनी तिथली सफर करायचं ठरवलं आणि त्या संदर्भात माहिती मिळवत असताना गालापगोसनावाच्या द्वीपसमूहाविषयी आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टीबद्दल त्यांना माहिती मिळाली. त्यांनी दक्षिण अमेरिका सफरीत या बेटांना भेट दिली. या भेटीतून एवढे अनुभव आणि माहिती जमा झाली की, त्यातून एक वेगळं पुस्तकंच साकार झालं. गालापगोस द्वीपसमूहातल्या बेटांवरचा फेरफटका, कुठे काय बघायला मिळेल, याचे तपशील, तिथल्या जीवसृष्टीचा इतिहास, तिथल्या पशुपक्ष्यांबद्दलची शास्त्रीय महिती, त्यांची छायाचित्रं अशा अनेक गोष्टी या पुस्तकात मांडल्या आहेत. केवळ एक पर्यटन केंद्रयापेक्षा अधिक असणारं या बेटांचं महत्व आहे, हे पुस्तक अधोरेखित करतं.

 

गालापगोस द्वीपसमूह पृथ्वीवर अगदी अलीकडे म्हणजेच फक्त तीस ते चाळीस लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाला. त्यातही त्यात जीवसृष्टीचा चंचुप्रवेश पाच ते दहा लाख वर्षांपूर्वीच झाला असावा. ही बेटं एवढी महत्वाची का आहेत, हे विशद करताना डॉ. श्रोत्री लिहितात हा पृथ्वीवरचा सगळ्यात तरुण भूभाग आहे. त्यामुळे या भूभागावरची सजीवसृष्टी ही पृथ्वीवरच्या इतर प्राचीन भूभागावर विकसित झालेल्या जीवसृष्टीच्या तुलनेत अजूनही उत्क्रांतीच्या प्राथमिक अवस्थेत आहे. इतर खंडांवर पर्यावरणाच्या जीवनसाखळ्या अतिशय गुंतागुंतीच्या बनलेल्या आहेत. त्या सहजसोप्या पद्धतीने उलगडणे, हे आजही कोणा उत्क्रांतिशास्राच्या संशोधकाला शक्य नाही. या बेटांवर मोजक्याच पशुपक्ष्यांच्या अन्नसाखळ्या विकसित झालेल्या बघायला मिळतात.गालापगोस द्वीपसमूहाच्या अभ्यासाचे वर्णन करण्यासाठी डॉ. श्रोत्री यांनी अगदी चपखल उपमा वापरली आहे. ते म्हणतात, “पर्यावरण आणि उत्क्रांतिशास्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बेटे म्हणजे बालक मंदिरातील साधी, सोपी, सुबोध अशी अंकलिपी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

डार्विनच्या अभ्यासातलं योगदान

 

या बेटांची महती जगाला कळण्यास कारणीभूत ठरला तो डार्विन. जगाचा नकाशा करणे आणि त्यावरील जैववैविध्याचे खंडशः वर्गीकरण करणे, या हेतूने १८३० च्या दशकात डार्विन जगप्रवासाला निघाला. विविध भूभागावरचे अनेक प्राणी-पक्षी मारून त्याने इंग्लंडला परत नेऊन जतन केले आणि त्यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यापैकी फक्त गालापगोस बेटांवर आढळणाऱ्या चिमण्यांचा त्यातही विशेषत्वाने त्यांच्या चोचींच्या विशिष्ट रचनेचा- अभ्यास करून डार्विनने काही महत्वाचे निष्कर्ष काढले आणि त्यातूनच डार्विनचा सिद्धांत जन्माला आला. आज आपण सर्व त्याला डार्विनचा उत्क्रांतिवादम्हणून ओळखतो. एका अर्थाने गालापगोस बेटं म्हणजे डार्विनची टिपणवही ठरली. ही घटना इतकी महत्वपूर्ण होती की, त्यातूनच पुढे प्रेरणा घेऊन या बेटांवर डार्विनच्या नावाने संशोधन केंद्र उभारले गेले. त्या केंद्राचे महत्व तिथे या बेटांवर आढळणाऱ्या महाकाय कासवांवर केले जाणारे संशोधन, त्यांचे संवर्धन अशा अनेक गोष्टी पुस्तकामध्ये तपशीलवार दिल्या आहेत.

 

पुस्तक वाचत असताना निसर्ग आणि प्राणी-पक्षी, माणसांचे त्यांच्याशी असणारे कडूगोड संबंध या गोष्टींचे अनेक पैलू बघायला मिळतात. नवनवीन भूभाग ताब्यात घेण्याची पाश्चात्य देशांची लालसा, नव्या बेटांवर वसाहती स्थापन करण्याच्या नादात तिथल्या पर्यावरणात झालेली ढवळाढवळ, या भेसळीमुळे कासवांच्या तसंच अन्य जीवांच्या जमाती कायमच्या नष्ट होणे आणि या सगळ्यातून त्या देशांनी धडे घेऊन पुन्हा एकदा आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी चालवलेली धडपड, पर्यटकांसाठी कडक नियम घालून, डोळ्यात तेल घालून केले जात असणारे बेटांवरच्या सजीवसृष्टीचे संरक्षण याबद्दल वाचताना आपल्या देशात पर्यावरणरक्षण, पर्यावरणसंवर्धन आणि पर्यावरणसंशोधन यासाठी केले जाणारे प्रयत्न किती तोकडे आहेत, याची जाणीव अस्वस्थ करते.

 

वाचनीय आणि प्रेक्षणीय

 

गालापगोस बेटं दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर देशाचा भाग असली तरी तशी आडवाटेवरचीच. मराठीत या बेटांवर प्रथमच एवढ्या विस्तृतपणे लिहिलं गेलं आहे. पुस्तकाच्या शेवटी येणारी परिशिष्ट्ये पर्यटकांसाठी उपयुक्त आणि वाचकांना या संदर्भात अधिक वाचन करण्यासाठी उदयुक्त करणारी आहेत. कासवांचे बेटहे पुस्तक वाचनीय तर आहेच पण डॉ. श्रोत्रींच्या कॅमेऱ्याने टिपलेल्या (आणि आर्टपेपरवर छापलेल्या) प्राणीपक्ष्यांच्या मोहक रंगसंगतीमुळे प्रेक्षणीयही झालं आहे. फक्त पुस्तकातल्या कृष्णधवल छायाचित्रांच्या छपाईचा दर्जा मात्र नीट राखता आलेला नाही, असं म्हणायला वाव आहे. ती छायाचित्रं बरीच काळवंडलेली दिसतात. कदाचित संपूर्ण पुस्तक आर्टपेपरवर रंगीत छापलं गेलं असतं तर अजून योग्य ठरलं असतं.

 

अनेक अर्थांनी अनोख्या असणाऱ्या या बेटांच्या भटकंतीचं वर्णन आणि सोबतच दिलेली शास्त्रीय माहिती अशा दोन्ही गोष्टी कासवांचे बेटया पुस्तकात असल्याने मनोरंजन आणि ज्ञान या हे दोन्ही उद्देश यातून साध्य झाले आहेत.

 

पुस्तक : कासवांचे बेट

लेखक : डॉ. संदीप श्रोत्री

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठसंख्या : १०० + रंगीत छायाचित्रं

किंमत : १८० रू.

आवृत्ती : पहिली (ऑगस्ट २०१८)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@