मुंबई: समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी मागविण्यात आलेल्या निविदेत सात कंपन्या पात्र ठरल्या आहेत, तर ९० टक्के जमीन महामंडळाला मिळाली आहे. कंपन्याना प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी १०० टक्के जमिनीची आवश्यकता असताना भूसंपादनास अडचण ठरणारी उर्वरित १० टक्के जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून जर भूसंपदांसाठी सहकार्य न मिळाल्यास शासनाच्या निर्देशाने सक्तीने जमीन ताब्यात घेऊन दिवाळीनंतर प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळातील सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंबई-नागपूर शीघ्रसंचार द्रुतगती (महाराष्ट्र समृद्धी) महामार्गाच्या बांधणीसाठी ९० टक्के जमिनीचे भूसंपादन झाले असून, १० टक्के जमीन अजून बाकी आहे. या जमिनीची वाट न पाहता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे महामंडळातील सूत्रांनी सांगितले. मुंबई-नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’साठी ९० टक्के जमीन महामंडळाच्या ताब्यात आली आहे.
सरकारच्या धोरणानुसार कोणत्याही रस्ते प्रकल्पासाठी १०० टक्के जमीन ताब्यात आल्याशिवाय कामाचे कार्यादेश देऊन नयेत, अशी अट होती. आता फक्त १० टक्के जमीन बाकी असून समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास होणारा विरोध लक्षात घेऊन उर्वरित जमीन सक्तीने ताब्यात घेण्याचा हालचालीवर काम सुरू असून या महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात मात्र दिवाळीत करण्याचा महामंडळाचा प्रयत्न असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/