संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून देवाची आरती केली जाते. अशी ही अग्नीच्या माध्यमातून देवाची पूजा निरंतर चालू राहिली. तसेच अग्निहोत्रात जसा पती-पत्नी दोघांचा सहभाग होता, तसा आजही दिसतो. सहसा, सकाळी पूजा करणे नवऱ्याकडे आणि संध्याकाळी देवाजवळ दिवा लावणे बायकोकडे अशी वाटणी झालेली दिसते. एकाच्या गैरहजेरीत दुसरा पूजा करतो किंवा दिवा लावतो. पण सकाळ-संध्याकाळ देवघरात दिवा लागतो.
वैदिक काळापासून सकाळ-संध्याकाळ अग्निहोत्र करण्याची पद्धत होती. अग्नी सदैव प्रज्वलित ठेवणे, सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला अग्नीमध्ये आहुती देणे ही नवरा-बायको दोघांची मिळून जबाबदारी असे. ज्या अग्नीच्या साक्षीने विवाह होत असे, तो अग्नी घरात स्थापन केला जात असे. दोघांपैकी कोणी एक आजारी असेल, कुठे गावाला गेला असेल, तर दुसऱ्याने अग्निहोत्र करायचे. दोघांनी मिळून जन्मभर त्या अग्नीची सेवा करायची. घरातील सर्व कार्ये, होमहवन, लहान-मोठे यज्ञ या अग्नीच्या साक्षीने होत असत. मृत्यूपश्चात हा अग्नी अंत्यसंस्कारासाठी नेला जात असे. मागे राहिलेल्या एकट्याला कोणतेही यज्ञ किंवा अग्निहोत्र करण्यास मान्यता नव्हती. अग्निहोत्राची परंपरा हजारो वर्षं रूढ होती. कालांतराने अग्नी सहज निर्माण करता येऊ लागला. मानवाला अग्नीवर नियंत्रण मिळवता आले, तसे घरोघरी अग्नी स्थापन करायची गरज राहिली नाही. त्यातच, नंतरच्या काळात यज्ञाची जागा हळूहळू मूर्तीपूजेने घेतली. मग अग्नीच्या माध्यमातून देवाला आहुती देण्याची गरज राहिली नाही, कारण तोच देव आता साक्षात मूर्ती रूपात अवतरला होता. थेट देवाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवणे शक्य होते.
हळूहळू घराघरांमधून होणारे अग्निहोत्र अगदी क्वचितच कुणाकडे दिसू लागले. असे झाले तरी, सकाळ-संध्याकाळ अग्निहोत्र करायचा वारसा रक्तात भिनला होता, तो कसा नष्ट होणार? मग तोच वारसा वेश बदलून आला. त्याचे नवीन रूप होते सकाळी देवाची पूजा करणे आणि संध्याकाळी देवाजवळ दिवा लावणे. सकाळी देवाची पूजा करताना-देवाजवळ दिवा लावणे, देवाला ओवाळणे हे सोपस्कार आहेत, तर संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून देवाची आरती करणे असे स्वरूप आहे. अग्नीच्या माध्यमातून देवाची पूजा निरंतर चालू राहिली. तसेच अग्निहोत्रात जसा पती-पत्नी दोघांचा सहभाग होता, तसा आताही दिसतो. सहसा, सकाळी पूजा करणे नवऱ्याकडे आणि संध्याकाळी देवाजवळ दिवा लावणे बायकोकडे अशी वाटणी झालेली दिसते. एकाच्या गैरहजेरीत, दुसरा पूजा करतो किंवा दिवा लावतो, पण सकाळ-संध्याकाळ देवघरात दिवा लागतो. अनेकांचा हा अनुभव असेल की, सूर्यास्तानंतरचा संध्या समय, एक अनामिक हुरहूर घेऊन येणारा असतो. दिवस संपलेला असतो. आसमंतातला उजेड संपत असतो. चहुबाजूने क्षितिजावर रेंगाळणारा अंधार लवकरच दाटून येणार असतो. यावेळी आकाशात ना सूर्यप्रकाश असतो, ना लख्ख चांदणे. सूर्य अस्ताला गेल्यावर कदाचित आता सूर्यदर्शन होणार नाही, या कल्पनेचेच एक सावट पसरत असावे. ज्या देशांमध्ये थंडीच्या मौसमात दिवस खूप छोटा होतो, तिथे अनेकांना हिवाळ्यात सूर्यदर्शन न झाल्याने नैराश्य येते. त्यावर उपाय म्हणून घरांमध्ये सूर्यप्रकाशाच्या रंगाचे दिवे लावतात. केवळ माणसचं नाही तर तिथले प्राणीसुद्धा कदाचित ही वेळ टाळायला दोन-चार महिने झोपी जात असावेत.
...तर न चुकता रोज संध्याकाळी येणारी निराशा घालवणारा संस्कार म्हणजे सांजवेळी देवाजवळ दिवा लावणे. दिवा स्वच्छ करून, वात करून, तेल घालून, दिवा लावला की देवघर उजळून जाते. ती मंद तेवणारी ज्योत पाहून मनावरची काजळी निघून जाते. त्यानंतर धुपाचा सुगंध दरवळला की, या लहानशा कृतीने त्या अंधाराबरोबरच ती हुरहूर पण कुठल्या कुठे पळून गेलेली असते. त्यावर रामरक्षा, गीतेचा एखादा अध्याय, विष्णुसहस्रनाम किंवा हरिपाठाचे अभंग किंवा देवाच्या आरतीने ही वेळ मंगल होऊन जाते. स्त्रियांनी चालवलेल्या या वारशाचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे - दिवेलागणीनंतर मुलांकडून देवाची स्तोत्रे म्हणून घेणे. पाढे म्हणून घेणे. पाठांतर करवून घेणे आणि गृहपाठ करवून घेणे. संध्याकाळी खेळून आल्यावर, हातपाय धुवून, देवासमोर बसून आधी स्तोत्र, कविता वगैरे म्हणून झाल्या की आजीच्या गोष्टींचा मेवा! कधी कधी सवय म्हणून, तर कधी कधी आई मारूनमुटकून हे करवून घेते म्हणून, पण या संस्काराने पाठांतराची सवय लागते. खेळून दमलेल्या शरीराला थोडी विश्रांती आणि एका जागी बसून मनाला एकाग्र करण्याची सवय लागते. ऑफिसमधून थकून आलेल्या मनालासुद्धा हा संस्कार शांत करतो. संध्याकाळी देवाजवळ किंवा तुळशीजवळ दिवा लावायचा हा वारसा चालवून, गृहिणी रोज संध्याकाळी लक्ष्मीचे घरात स्वागत करते आणि प्रत्येक संध्याकाळ प्रसन्न करते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/