गाणी, म्हणी,
कहाणी: स्त्रीजीवन सुंदर व समृद्ध करणारा सांस्कृतिक वारसा
थोडं मोठं बाळ आईकडून बडबडगीतं शिकतं. मातृभाषेतील गीतांमधून त्याची परिसराशी, पशु-पक्ष्यांशी, गायी-गुरांशी, सूर्य-चंद्राशी ओळख होते. त्याच्या इवल्याशा जगात चांदोमामा घरी येऊन तूप-रोटी खाऊन जातो, मोर जिथे बैस म्हणलंय तिथे बसून बाळाकडून चारा खातो, चिऊ-काऊ-माऊ त्याच्याशी गप्पा मारतात, गोठ्यातली हम्मा बाळाला दूध देते, पावसाशी तर अश्शी मैत्री होते की, बाळाने त्याला हाक मारून बोलवावे, छोटासा बाळ पावसात भिजायला धावतो... या सगळ्या गाण्यांतून बाळ निसर्गावर, मुक्या जनावरांवर प्रेम करायला शिकतं. इथल्या मातीवर, पावसावर प्रेम करायला शिकतो. इंग्रजीतल्या – ‘Rain rain go away’, ‘Twinkle twinkle’ किंवा ‘Jack and Jill’ या गाण्यांमधून असे स्थानिक संस्कार कसे होणार? असे संस्कार केवळ मातृभाषाच देऊ शकते.
आईकडून, आजीकडून येणारा आणखी एक मोठा खजिना आहे कथा-कहाण्यांचा. त्यामध्ये सुद्धा खूप विविधता आहे. रामायण, महाभारत, पुराणातील कथांचे एक मोठ्ठे कपाट आहे! ध्रुवबाळाचे ध्येय आणि ते मिळवण्यासाठी त्याने केलेली तपश्चर्या. यमाने दाखवलेल्या कोणत्याही मोहाला बळी न पडणाऱ्या नचिकेताची कथा. रामाने केलेले पितृ आज्ञापालन. हनुमानाची झेप. कृष्णाच्या सतराशे साठ करामती... या गोष्टींशिवाय बालपणच नाही. या कथा कहाण्यांच्या खजिन्यात - पंचतंत्र, हितोपदेश आणि जातक कथांची एक स्वतंत्र पेटी आहे. त्यामध्ये अगदी सहज चातुर्याच्या, नीतीच्या, मैत्रीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. इथे बोलणाऱ्या प्राण्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून एकीचा किती मोठा धडा दिला आहे-
अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका।
तृणैर्गुणत्वमापन्नैः बध्यन्ते मत्तदन्तिनः॥
अर्थात, एकत्र येऊन मोठी कामे करता येतात. पाहा ना, अनेक गवताच्या काड्या एकत्र आल्या तर त्यांची दोरी मत्त हत्तीलासुद्धा बांधून ठेवू शकते.
आजीच्या अगदी खास ठेवणीतल्या गोष्टी म्हणजे-श्रावणातील कहाण्या. नागपंचमीची कहाणी. सोमवारची खुलभर दुधाची कहाणी, आदितवारची सूर्यनारायणाची कहाणी, शुक्रवारची कहाणी इत्यादी. काळानुरूप बदल करत, आता सोमवारी CERNच्या नटराजाची कहाणीसुद्धा करायला काही हरकत नसावी! पण कहाणी सांगावी जरूर. कारण आठवड्याच्या वारांना जगभर जरी ग्रह-देवतांची नावे असली, तरी भारत सोडून इतरत्र कुठेही वाराच्या कथा नाहीत! हा केवळ आपला नाही तर संपूर्ण मानवजातीचा वारसा आहे. स्त्रीचे जीवन समृद्ध करणारा भाषेचा आणखी एक वारसा म्हणजे म्हणी! मोजक्या शब्दांत खोल अर्थ सांगणाऱ्या, शहाणपण शिकवणाऱ्या, समाजातील तत्त्कालीन पद्धती दर्शविणाऱ्या म्हणी. काही म्हणी स्त्रियांनीच तयार केल्या असाव्यात, असे वाटते. ‘जसे-नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाळा’, किंवा ‘हाताच्या कंकणाला आरसा कशाला’, किंवा ‘नाकापेक्षा मोती जड’, किंवा ‘लेकी बोले सुने लागे...’ या सगळ्या म्हणींमधून स्त्रीच्या जगात डोकावता येते. आजसुद्धा एखादी जुनीजाणती बाई, कोणती ठेवणीतली म्हण काढून मोठमोठ्या तत्त्वज्ञानाच्या गप्पा करणार्यांना गप्प बसवेल ते सांगता येणार नाही! स्त्रीजीवन सुंदर करणारी पारंपरिक गाणी तर अनंत आहेत. पाळणे, बडबडगीते, भोंडल्याची गाणी, नागपंचमीची गाणी, मंगळागौरीची गाणी, डोहाळ जेवणाची गाणी, लग्नातली गाणी या सर्व प्रसंगी एकत्र मिळून म्हणायची खूप गाणी आहेत. एकत्रितपणे मुक्तकंठाने पारंपरिक गाणी गाणे हा एक Stress Buster तर आहेच, पण जीवनातील वेगवेगळे प्रसंग साजरे करून आनंद लुटायचा मार्गसुद्धा दाखवतात.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/