काळ्या कोटातील न्याय ‘चांडी’

Total Views | 14
 

 
देशाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हटल्या तर डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे न्यायमूर्ती अन्ना चांडी यांचे. चांडी यांच्याबाबत सांगण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे त्या देशातील पहिल्या महिला न्यायाधीश तर होत्याच, परंतु जगभरात असलेल्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशपदी पोहोचणार्‍या त्या दुसर्‍याच महिला होत्या. ४ जुलै १९०५ रोजी तत्कालीन त्रावणकोर म्हणजेच सध्याच्या केरळमध्ये त्यांचा जन्म झाला. १९२६ साली त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. वकिली पेशात येणार्‍या तसेच याचे शिक्षण घेणार्‍या राज्यातील त्या पहिल्या महिला ठरल्या. ९ फेब्रुवारी १९५९ ते ५ एप्रिल १९६७ या कालावधीत त्या केरळ न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. या क्षेत्रात येण्याची इच्छा असलेल्या महिलांसमोर त्यांनी एक आदर्श प्रस्थापित केला.
 
१९२९ साली चांडी यांनी ‘बॅरिस्टर’ म्हणून सरावास सुरुवात केली. तसेच या कालावधीत त्यांनी महिलांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्याचे कार्य हाती घेतले. तसेच त्यांनी ’श्रीमती’ नावाच्या एका मासिकाची सुरुवात केली. या मासिकाची सुरुवात आणि संपादनाचे महत्त्वपूर्ण कामदेखील त्यांनी केले. चांडी यांनी १९३१ साली ‘श्री मुलम पॉप्युलर असेंब्ली’च्या निवडणुकीदरम्यान प्रचारदेखील केला होता. त्यांना निवडणुकीदरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. मात्र, सर्व परिस्थितीवर मात करून त्या १९३२ ते १९३४ या कालावधीसाठी निवडून आल्या होत्या. १९३७ साली त्रावणकोरचे दीवाण सर सी.पी. रामस्वामी अय्यर यांनी चांडी यांची त्रावणकोरमध्ये सर सी. पी. यांच्याद्वारे ‘मुनिसिफ’ म्हणून नियुक्ती केली. यामुळेच देशातील पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांची ओळख झाली.
 
१९४८ साली स्वातंत्र्यानंतर चांडी यांची जिल्हा न्यायाधीशपदी बढती करण्यात आली. ९ फेब्रुवारी १९५९ साली त्यांची केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर देशातील उच्च न्यायालयात नियुक्ती झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. ९ फेब्रुवारी १९५९ ते ५ एप्रिल १९६७ या कालावधीत त्यांनी केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला होता. सेवानिवृत्तीनंतर चांडी यांनी काही काळासाठी भारतीय विधी आयोगाचे सदस्य म्हणून मोलाचे कार्य केले. यादरम्यान १९७३ साली त्यांनी ‘आत्मकथा’ या नावाने आत्मचरित्रदेखील लिहिले. १९९६ साली वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी समाजातील सर्व अडथळ्यांना पार करत आपली गुणवत्ता सिद्ध करत मैलाचा दगड गाठला. त्या कालावधीत सर्व अडचणींना आणि अडथळ्यांना पार करत त्यांनी अशक्यप्राय गोष्टींना शक्य करून दाखविण्याचे धाडसदेखील केले. पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि स्वीकारलेली जबाबदारी कायमच आपल्या स्मरणात राहील.
 
 
- जयदीप दाभोळकर 
 

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121