भारतीय समाजाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड क्षमता. आपल्या देशातल्या वैविध्यामुळे परंपरा, विचारपद्धती यांचे अनेक प्रवाह कधी समांतरपणे तर कधी मिळून मिसळून वाहत असतात. त्यामुळे साहजिकच आपल्या समाजाला कार्यक्षम होण्यासाठी प्रचंड मोठं इंधन उपलब्ध आहे. असं असूनही आपल्या क्षमतेचा वापर पुरेपूर होताना दिसत नाही. वैयक्तिक हितसंबंधांना प्राधान्य मिळत गेल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीचं भान असल्याचं चित्र दिसत नाही. त्यामुळे अनेकदा आपल्या देशाच्या प्रगतीचा गाडा कूर्मगतीने पुढे सरकताना दिसतो. सगळेच जण व्यवस्थेला दोष देत असताना काही जण मात्र व्यवस्थेच्या चौकटीत राहूनच कार्यरत असलेले दिसतात, एवढेच नाही तर त्यांच्या कामाचा झपाटा थक्क करणारा असतो. आपल्या अविरत कामाने ते बघता बघता एवढे तेजस्वी होत जातात की समाजासाठी ते एक दीपस्तंभच ठरतात. ई. श्रीधरन हे अशाच कर्मयोग्याचं झळाळतं नाव. भारतीय रेल्वे आणि त्यानंतर महानगरीय मेट्रो सेवा यांच्या माध्यमातून आपल्या वेगवान आणि पारदर्शी कारभाराने नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या या व्यक्तिमत्वाचं प्रस्तुत चरित्र म्हणजे कार्यक्षमतेची जवळून ओळख करून घेण्याची उत्तम संधी!
केरळच्या एका छोट्या गावातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात १९३२ साली श्रीधरन यांचा जन्म झाला. आपल्या परंपरांचा अभिमान असणाऱ्या या घरात आईकडून संस्कारांचा ठेवा अगदी अलगदपणे आपल्या मुलांकडे सुपूर्द करण्यात आला. शालेय जीवनात अभ्यास आणि फुटबॉल या दोन्ही क्षेत्रात चमक दाखवणाऱ्या श्रीधरन यांनी पुढे स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि मोठ्या भावाच्या सल्ल्यावरून रेल्वे अभियांत्रिकी सेवेची स्पर्धा दिली. या परीक्षेत सातवा क्रमांक पटकावून झळाळतं यश मिळवलं. १९५४ साली वयाच्या बाविसाव्या वर्षी ते रेल्वे सेवेत intern म्हणून रुजू झाले आणि आपल्या तडाखेबंद कामाच्या जोरावर केवळ वयाच्या २५व्या वर्षी विभागीय अभियंता पदावर झेप घेतली. हा विक्रम आजही अबाधित आहे.
अवघड कामगिरी सुकर
सार्वजनिक क्षेत्रामधली कामं ही खूप आव्हानात्मक असतात कारण त्यांच्यावर जनतेचे दैनंदिन व्यवहार आणि जीवनमरणाच्या गोष्टीही अवलंबून असतात. रेल्वेची कामंही अशीच जोखमीची गोष्ट. तशात ते पुन:उभारणीचं काम असेल तर एकाचवेळी वेळ आणि दर्जा या दोन्ही आघाड्यांवर परीक्षा असते. १९६४ सालच्या वादळात रामेश्वरम हे बेट भारताच्या मुख्य भूमीशी जोडणारा पूल उद्ध्वस्त झाला. सर्वप्रथम सहा महिने आणि त्यानंतर तीनच महिने एवढ्या छोट्या कालावधीचे उद्दिष्ट असताना श्रीधरन यांनी अतिशय वेगाने ते काम केवळ दीड महिन्यात पूर्ण केलं. स्वतःच्या मुलीच्या जन्माच्या वेळीही ते घरी गेले नाहीत. दर्जाशी तडजोड न करता केलेलं हे काम होतं म्हणूनच तो पूल आजही बिनधोकपणे उभा आहे.
या कामगिरीनंतर श्रीधरन यांचा सर्वत्र बोलबाला झाला. माध्यमं, राजकारणी, सामान्य जनता या सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं आणि ती लोकप्रियता उत्तरोत्तर एवढी वाढत गेली की त्यांना जणू जननायकपदच प्राप्त झालं.
श्रीधरन यांच्या निवृत्तीचा तपशील पुस्तकात येतो तेव्हा लक्षात येतं की अजून अर्धं पुस्तक बाकी आहे. त्यांच्या आयुष्याशी साधर्म्य सांगणारा हा गमतीदार योगायोग. कारण त्यांनी निवृत्तीपूर्वी जेवढ्या आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पडल्या तेवढ्याच त्यानंतरही पाडल्या. त्यांपैकी एक म्हणजे कोकणरेल्वे उभी करणं हे त्यांचं भगीरथ कार्य. घाट, नद्या, जंगल, दलदल या सगळ्यांतून वाट काढत गेलेली कोकणरेल्वे म्हणजे जगातल्या अभियांत्रिकीच्या आश्चर्यांपैकी एक आहे. अवघ्या साडेसात वर्षात हे काम पार पाडताना अडचणींचे अनेक डोंगर (अगदी शब्दशः!) वाटेत आले. ऐन मोक्याच्या क्षणी हेतुपुरस्सर विरोध, न्यायालयीन अडथळे, निसर्गाचा प्रकोप, तांत्रिक समस्या यांना श्रीधरन यांच्या हाताखालचा चमू धैर्याने सामोरा गेला आणि त्यामुळे देशाच्या प्रगतीतला महत्वाचा टप्पा पार झाला.
मेट्रोमॅन
कोकण रेल्वे धावू लागेपर्यंत श्रीधरन वयाच्या पासष्टीला आले होते. पण त्यांचे चोख काम पाहून त्यांच्यावर नवनव्या जाबदाऱ्या येतच गेल्या. १९७१ साली कोलकात्यामध्ये सुरू झालेल्या मेट्रोच्या कामासाठीही श्रीधरन यांनाच निवडलं गेलं होतं. भारतासाठी अत्यंत अपरिचित असं तंत्रज्ञान जपानकडून मिळवताना त्यांच्या कौशल्याचा कस लागला होता. पण त्याचाच फायदा पुढे देशाला झाला आणि अत्यंत गजबजलेल्या वस्तीतून जाणाऱ्या दिल्ली मेट्रोच्या कामाची धुरा त्यांच्याकडे आली. भ्रष्टाचाराचा एकही आरोप न होता मेट्रो काम वेळेआधी पूर्ण झालं आणि प्रदूषणाने गुदमरलेल्या दिल्लीने मोकळा श्वास घेतला. त्यानंतर वयाच्या ८० व्या वर्षीही श्रीधरन कोची मेट्रोमध्ये लक्ष घालत होते हे वाचून त्यांच्याविषयीचा आदर दुणावल्याशिवाय राहत नाही.
शिस्त आणि काटेकोरपणा
पन्नासहून अधिक वर्षे सार्वजनिक सेवेत असणाऱ्या श्रीधरन यांच्या यशाचं रहस्य म्हणजे त्यांची शिस्त आणि काटेकोरपणा. खूप वेळ काम म्हणजे खूप चांगलं काम या समजला त्यांनी फाटा दिला. स्वतः दिवसाचे फक्त साडेआठ तास काम करणाऱ्या श्रीधरन यांनी तेवढ्या वेळातल्या प्रत्येक सेकंदाचा सदुपयोग केला. लोकांना वेळेचं महत्व कळावं म्हणून त्यांनी दिल्ली मेट्रोच्या कार्यालयात उलट चालणारी घड्याळं (Reverse Clocks) लावली. त्या त्या दिवशीचा उरलेला वेळ ते घड्याळ दाखवायचं. त्यामुळे 'आपल्या हातात आता फक्त अमुक इतका वेळ आहे' या भावनेने अधिकारी अधिक कार्यक्षम व्हायचे. कुठल्याही कामापूर्वी त्याचं चोख नियोजन करत असल्यामुळे ऐनवेळच्या अडचणी कमी येतात. कोकण रेल्वेसारख्या जगड्व्याळ प्रकल्पात भूसंपादन आणि पुनर्वसन हा कळीचा मुद्दा असल्यामुळे ती कामं पटापट उरकली. एका वर्षात अर्धी जमीन ताब्यात सुद्धा आली होती. त्यामुळे भविष्यात प्रकल्प रखडण्याची शक्यता नाहीशी झाली. हे सर्व करताना मानवतेला, भावनेला कुठेही तिलांजली दिली नाही. रेल्वेमार्गामुळे तोडाव्या लागणाऱ्या प्रत्येक बागेतल्या प्रत्येक झाडाचा मोबदला देण्यात आला. एवढंच काय तर एके ठिकाणी मार्गात येणारं स्मशान तिथल्या मृतदेहांच्या अवशेषांसह स्थलांतरित करण्यास कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. मलिदा खाण्याची सवय असणाऱ्या सरकारी बाबूंनी, मंत्र्यांनी अतिशय सचोटीने व्यवहार करणाऱ्या श्रीधरन यांच्या मार्गात अनेकदा कोलदांडे घालण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी अशा कामामुळेच त्यांचे असंख्य चाहतेही निर्माण झाले. त्यांच्या कार्यशैलीची आणि मूल्यनिष्ठेची मोहिनी अनेकांवर पडली. कोकण रेल्वेसाठी काम करू इच्छिणाऱ्या अभियंत्यांचे अर्ज मागवले गेले तेव्हा खडतर कामाची कल्पना असूनही श्रीधरन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असलेल्या अनेकांचे अर्ज आले होते ही गोष्ट त्यांच्याविषयीचे आकर्षण दाखवून देते.
हिंदू जीवनमूल्यांवर श्रद्धा
लहानपणापासून धार्मिक वातावरणात वाढलेल्या श्रीधरन यांची हिंदू जीवनमूल्यांवर मनस्वी श्रद्धा आहे. गीतेचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव आहे. नव्याने रुजू होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना ते आवर्जून गीता भेट देतात. सुरुवातीलाच एवढं महान पुस्तक हाती पडल्याने आपोआपच आपल्या जाबदारीचं भान येतं असं त्यांचं निरीक्षण आहे. परंतु त्याचवेळी आपल्या श्रद्धा या वैयक्तिक असून कामाच्या ठिकाणी त्यांची ढवळाढवळ न करण्याचं भानही त्यांना आहे. स्वार्थाच्या वावटळीत मूल्यं ढासळण्याच्या आजच्या दिवसांत अब्दुल कलाम, श्रीधरन यांच्यासारखी माणसं झेंडा रोवून उभी असतात तेव्हा समाजाला त्यांच्यात खूप मोठा आधार दिसत असतो. याबद्दल पुस्तकात छोटासा पण अत्यंत बोलका प्रसंग आहे. पुस्तकाचे लेखक या चरित्रासंबंधात श्रीधरन यांना भेटून त्यांच्या दालनाबाहेर येत असताना बाहेर एक बापलेकाची जोडी श्रीधरन यांच्या भेटीची वाट पाहत असलेली दिसली. तो मुलगा पहिल्या नोकरीवर रुजू होत आहे म्हणून श्रीधरन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते वडील तिथे आले होते. श्रीधरन यांच्या जनमानसातील स्थानावर याहून अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही.
हे चरित्र अनुवादित करताना त्यात कुठलीही कृत्रिमता नाही आणि ते ओघवतं झालं आहे याबद्दल अनुवादक अवधूत डोंगरे यांचा विशेष उल्लेख करायला हवा. असेच आणखी श्रीधरन निर्माण करण्याची ताकद असणारं हे प्रेरणादायी पुस्तक अजिबात चुकवू नये.
पुस्तक : मेट्रोमॅन श्रीधरन
लेखक : एम.एस. अशोकन
अनुवाद :अवधूत डोंगरे
प्रकाशक: रोहन प्रकाशन
पाने : २०८
किंमत : २५०रू.
आवृत्ती : पहिली (११ ऑक्टोबर २०१६)
- प्रसाद फाटक