अवंती : नमस्कार.... मेधाकाकू ! अगं कित्ती दिवस झाले. आपण भेटलोच नाही. डिसेंबर महिन्यात. कशी झाली तुमची मध्यप्रदेश सहल. मला फार उत्सुकता आहे बघ ऐकायची. कारण तू नेहमी निश्चित धोरणाने काही अभ्यास करून तुमची पर्यटन सहल आखतेस आणि त्या त्या ठिकाणांचे फोटोही काढतेस. सांग सगळं केंव्हातरी. मात्र आता उत्सुकता आपल्या अभ्यासाची.
मेधाकाकू : व्वा... अवंती... मस्तच झाली आमची मध्यप्रदेश पर्यटन सहल आणि माझी उत्सुकता पूर्ण झाली ती भोपाळ शहराजवळचे भीमबेटका पाहिल्यावर ह्या सगळ्या गमती जमती सांगेन मुद्दाम वेळ काढून. या पर्यटनावरून आठवलं, आपल्या लोकश्रुतींमधे अशा धार्मिक पर्यटन स्थळांचा उल्लेख जाणीवपूर्वक केला गेला आहे. काशी-बनारस, नाशिक, त्र्यंबकेश्वर ही आणि अशी अनेक ठिकाणे, मराठी समाजाची श्रद्धास्थाने, यांचा उल्लेख अनेक म्हणी-वाकप्रचारांमधे केलेला दिसतो. यातली गंम्मत अशी की, माणसांच्या काही चांगल्या अथवा वाईट प्रवृत्तींचा संदर्भ घेऊन या धर्मस्थळांचा अथवा काही वैशिष्ट्य असलेल्या शहरांचा उल्लेख आपल्याला पहायला मिळतो !!
काशी केली वाराणशी केली तरी कपाळाची कटकट नाही गेली.
मेधाकाकू : लोकमानसात एक धारणा अशी की, तीर्थयात्रा केली की धार्मिक स्थळांना भेट देऊन देवदर्शन घेतले की पुण्य प्राप्त होते, मन:शांती मिळते. अशा तीर्थयात्रा करून सुद्धा कधी कोणाला अपेक्षित मन:शांती मिळत नाही, संसारातले ताण-तणाव कमी होत नाहीत. या अशा असमाधानी मंडळींसाठी या वाकप्रचारात आपल्या चतुर पूर्वजांनी दिलेला सल्ला इतकाच की संसारात पूर्ण लक्ष द्यावे, तिथल्या समस्यांची पूर्ती घरी राहूनच होणार आहे. देवदर्शन हा त्या समस्या सोडविण्याचा मार्ग नाही.
अवंती : अरेच्या... मेधाकाकू... पर्यटन-धार्मिक स्थळांवरून कुठे घेऊन जातात या म्हणी-वाकप्रचार आपल्याला एकदम सही यार !!
मेधाकाकू : अवंती... मी आधी उल्लेख केला होता. तशाच प्रकारची मांडणी, या लोकश्रुतींमधे केलेली मला सतत जाणवते. ती मांडणी म्हणजे मनोविज्ञानाचा छोटासा अविष्कार, संसार आणि दैनंदिन जीवन सुखी करण्याचा सूक्ष्म सल्ला आणि देव-श्रद्धा-भक्ती या धारणांकडे बघण्याची योग्य जाणीव...
आधी शिदोरी मग जेजुरी.
मेधाकाकू : हे कुटुंब आता जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला निघालयं आणि त्या घरातली माऊली सगळ्यांना समजावून सांगत्ये त्या देवदर्शनाची तयारी आणि त्यासाठी आवश्यक तरतूद. या चार शब्दांच्या वाक्यात माऊली सांगते, शेतीची सर्व कामे नीट पूर्ण करा. घर आवारा. प्रवासातील समान बांधा. प्रवास खर्चाची तजवीज करा. शेजाऱ्यांचा निरोप घ्या आणि सरते शेवटी प्रवासात लागणारी शिदोरी तिची तयारी करा. ‘शिदोरी’ या एका शब्दांत सामावलेला असा सूक्ष्म अर्थ, मौखिक परंपरेने कुटुंबातील स्त्रियांच्या माध्यमातून एका पिढीतून पुढच्या पिढीकडे प्रसारित होत राहिला. समर्थ रामदासांनी सांगितलेल्या प्रपंच विज्ञानातील हा एक उत्तम धडा. आता तुला पटेल या लोकश्रुती म्हणजे निखळ विज्ञान, बुद्धिमत्ता, तत्वज्ञानाचे miniature म्हणजे सूक्ष्म सल्ले.
अवंती : आहा... आहा.. मेधाकाकू... आता मला नक्की पटलय आई, आजी, पणजी या कुटुंबातील मोठ्या स्त्रियांचे संवाद नीट-लक्षपूर्वक ऐकायला हवे प्रत्येकाने... त्यांच्या अशा चार-सहा शब्दांमधे किती मोठा खजिना नक्की सापडतो एखाद्या दिवशी.
मेधाकाकू : अगदी बरोबर समजूत आहे तुझी, माझ्या आई, आजीने सुद्धा मला खूप समृद्ध केले. लहानपणी मी त्यांच्याबरोबर स्वयंपाकघरात मी कायम लुडबुड करत राहायचे. आज त्याचे फायदे स्पष्ट दिसतात मला ते असे. आता असाच एक परीक्षा घेणारा वाकप्रचार फारच गमतीचा आहे. माझ्या आजीचे माहेर जुन्नरचे, त्यामुळे तिच्या बोलण्यात हा वाकप्रचार नेहमी ऐकलाय मी...!!..
एक बोलेना बंदर तर काय ओस पडेल जुन्नर.
मेधाकाकू : ती सांगत असे... काही शतकांपासून जुन्नर ही व्यापाराची मोठी बाजारपेठ होती. Silk rout of ancient Hindustan असा अभिमानाने उल्लेख करतो तोच हा प्राचीन भारताचा परदेशांबरोबर होणाऱ्या व्यापारासाठी वापरला जाणारा मार्ग. यात जुन्नर हे मध्यवर्ती ठिकाण होते कारण जहाजातून कल्याण बंदरात उतरणारा व्यापारी माल नाणेघाटातून जुन्नरच्या बाजारपेठेत येत असे. काही शतकांपूर्वी म्हणे, बंदराचा रस्ता कुठला असे कोणा पांथस्थ अथवा प्रवाशाने विचारले की जुन्नरचा नागरिक कल्याण कडे बोट दाखवत असे. कालांतराने असा व्यापार बंद झाला आणि काही पिढ्यानंतर जुन्नर मधले नागरिक कल्याण बंदर आणि त्याचा रस्ता विसरले आणि हा वाकप्रचार प्रचलित झाला. ’बंदर’ हा शब्द विस्मृतीत गेला तरी जुन्नर शहर राहणारच आहे. याचा गूढार्थ असा की कोणी तुम्हाला काही माहिती द्यायचे नाकारले किंवा काम करायचे नाकारले तरी अन्य कोणी ते काम करायला उपलब्ध होतेच. मुख्य म्हणजे काम अडत नाही तेंव्हा एक नकार मिळाला म्हणून संभ्रमित अथवा नाराज होऊ नका... प्रयत्न करत राहा...!
अवंती : व्वा... मेधाकाकू... अफलातून चेंडू एकदम हरभजनचा ‘दुसरा’. आज काय गंम्मत आलीये या शहरांच्या नावाची एकदम सही !
- अरुण फडके