बालमानसशास्त्रात दोन पायाभूत तत्त्वे महत्त्वाची असतात. पहिले तत्त्व म्हणजे काहीही सांगत असताना मुलाच्या आत्मविश्वासावर विपरीत परिणाम होईल, असे काही सांगायचे नसते. त्यामुळे कोणताही मानसशास्त्रज्ञ सांगेल की, एका मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करू नका. त्यामुळे त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. परंतु, त्याचा आत्मविश्वास जागवत असताना तो आत्मअहंकारी बनणार नाही याचीही दक्षता घ्या. तो एकदा अहंकारी बनला की त्याची नवे शिकण्याची प्रवृत्तीच नष्ट होऊन जाईल. या दोन्हीचे संतुलन साधणे खूप महत्त्वाचे व कौशल्याचे कामअसते. जी गोष्ट बालमनाची तीच समाजाची असते. एकदा कोणतीही व्यक्ती गर्दीचा भाग बनली की तीही बालबुद्धीचीच बनते. कारण, गर्दीची बुद्धी बालबुद्धीप्रमाणेच असते, असे मानसशास्त्र सांगते. गर्दीला समाज म्हणून स्थैर्य आणायचे असेल, तर त्या समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याकरिता पूर्व गौरव जागरुक करावा लागतो व त्याच्यात काळानुसार परिवर्तन करण्यासाठी नव्या गोष्टी आत्मसात करायलाही प्रवृत्त करावे लागते.
भारतावर इंग्रजांचे राज्य आल्यानंतर भारतीयांपुढे सांस्कृतिक आव्हान पुढे ठाकले. इंग्रजांचा लष्करीदृष्ट्या पराभव करणे अशक्य आहे, याची जाणीव १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात झाली. त्यामुळे या सांस्कृतिक आव्हानाला कसे उत्तर द्यायचे, असा प्रश्न समोर उभा राहिला. यामध्ये सुधारकांनी इथल्या चालीरिती, परंपरा या भारताच्या अधोगतीला जबाबदार आहेत असे सांगत त्यावर टीकेची झोड उठवली. युरोपमधले देश कसे सुधारून प्रगतिपथावर गेले व आपण मात्र जुन्या चालीरिती व परंपरांना कवटाळून बसल्याने आपली किती अवनती झाली आहे असे प्रतिपादन ते करू लागले. त्याची प्रतिक्रिया समाजात उमटली व पूर्वीचेच सर्व कसे बरोबर आहे, असे सांगणारा दुसरा प्रवाह निर्माण झाला. पहिल्या प्रवाहातून सामाजिक न्यूनगंड निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला, तर दुसऱ्या प्रवाहातून आपणाला दुसरीकडून शिकण्यासारखे काही नाहीच, असा अहंकार निर्माण झाला. या दोन्हीचे संतुलन करण्याची आवश्यकता होती. असे संतुलन निर्माण करणारे अनेक प्रवाह निर्माण झाले. पण, ही परंपरा स्वातंत्र्योत्तर काळात खंडित झाली. म. गांधी व पटेल यांच्या मृत्यूनंतर पं. नेहरूंच्या हाती सत्तेची सर्व सूत्रे आली. त्यांच्या मनात सनातन्यांच्याबद्दल तिरस्कार होता. त्यांच्या डोळ्यासमोर जो आधुनिक भारत होता, त्यात त्यांना सनातन्यांचा अडसर वाटत होता. त्याचा लाभ डाव्या विचारसरणीने घेतला व भारतातील सर्व परंपरा, चालीरिती, इतिहास, तत्त्वज्ञाने, ग्रंथ यासंबंधी कुत्सित भाव निर्माण केला. कोणालाही सार्वजनिक ठिकाणी ‘हिंदू’ म्हणवून घेणे लज्जास्पद वाटू लागले. हिंदू धर्मावर टीका करणे पुरोगामीपणाचे लक्षण बनले. जेवढी टीका अधिक कुत्सित, विखारी तेवढा तो अधिक पुरोगामी. या गाडीला मुस्लीमतुष्टीकरणाचे घोडे जोडले गेले. हिंदूंचा तिरस्कार व मुस्लिमांचे समर्थन म्हणजे ’भारतीय सेक्युलॅरिझम’ असे समीकरण तयार झाले.
याची प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. त्याला तीन प्रमुख कारणे घडली. ज्या आधुनिक विचारसरणीचा हवाला देऊन हिंदू धर्मावर हल्ले केले जात होते, त्या विचारसरणीतील पोकळपणा अधिकाधिक स्पष्ट होत गेला, हे पहिले कारण. देश-विदेशातील अभ्यासकांनी हिंदू संस्कृती, परंपरांचा व इतर सामाजिक परंपरांचा तुलनात्मक अभ्यास सुरू केला, तेव्हा जे हिंदू समाजातील दोष म्हणून सांगितले जात होते ते थोड्याफार फरकाने सर्वच परंपरांत आहेत, असे त्यांच्या लक्षात आले. एवढेच नव्हे तर मध्ययुगापर्यंत अनेक क्षेत्रांत अन्य देशांच्या तुलनेत हिंदूंनी कितीतरी पुढे झेप घेतली होती, असे त्यांच्या लक्षात आले व त्यातून बौद्धिक न्यूनगंड कमी व्हायला सुरुवात झाली, हे दुसरे कारण. याच वेळी ज्या मुस्लीम जातीयवादाचे समर्थन केले जात होते त्याचा भयानक परिणाम भारतात व भारताबाहेरील जगात दिसू लागला, हे तिसरे कारण. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात जे बौद्धिक व सांस्कृतिक क्षेत्रात नेतृत्व निर्माण झाले होते, त्याचा प्रभाव कमी झाला. त्याची जागा भरून काढण्याकरिता अनेक संधिसाधू, प्रतिक्रियावादी प्रयत्न करीत आहेत व हा नवा धोका निर्माण झाला आहे.
आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जे यश मिळाले याचे कारण संघ संस्थापक डॉ. हेडगेवारांनी पूर्व गौरव व परिवर्तन यात साधलेला समन्वय. त्यांनी हिंदू समाजाला आपल्या प्राचीन गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देत असतानाच; व्यक्तिनिष्ठ, मोक्षवादी, कर्मकांडी, आपल्या वागण्यासाठी इतिहासाकडे नजर लावून बसलेल्या हिंदू मानसिकतेला आधुनिक व जीवनाभिमुख बनविले. संघाच्या माध्यमातून झालेले हे परिवर्तन केवळ पुस्तकी नव्हते, तर ती मूल्ये त्यांनी देश-विदेशातील स्वयंसेवकांच्या जीवनात संस्कारित करून विचारांची दिशा बदलली. याची अनेक उदाहरणे देता येतील. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूरमधील संघाचे ९८ वर्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा ठाकूर यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी मुलांसाठी ज्या सूचना लिहिल्या त्या पुरेशा बोलक्या आहेत. त्या अशा -
१) मृत्यूनंतर शरीरावर हार- फुले इत्यादींचा वापर करू नये. आपण शवपूजक नाही, शिवपूजक आहोत.
२) स्मशानात मंत्राग्नी देणाऱ्या ब्राह्मणांची वाट पाहात आलेल्या लोकांना ताटकळत ठेवू नये. गीतेतील चार दोन श्लोक म्हणून काम पूर्ण करावे, तेही जमले नाही तर तसाच अग्नी द्यावा.
३) नेत्रदान केले आहे. माधव नेत्रपेढी.
४) अग्नी दिल्यानंतर स्मशानात आलेल्या मंडळींमध्ये बोलण्याची इच्छा असते. हे आत्मियतेच्या पोटी होत असते, पण तसा प्रसंग आल्यास अशी भाषणे होऊ देऊ नयेत. आपण हळूवारपणे सर्वांना समजावून सांगावे.
५) तिसऱ्या दिवशी ज्याला राख सावरणे म्हटले जाते तो काही धार्मिक विधी नाही. म्हणायचेच तर स्वच्छता विधी म्हणता येईल. राख नदीत न टाकता नगरपालिकेने जिथे टाकण्याची व्यवस्था केली असेल तिथे टाकावी, अस्थी कोणत्याही गंगेत (नदीत) टाकण्याची आवश्यकता नाही.
६) कोणतेही धार्मिक विधी करण्याची आवश्यकता नाही, पण तुम्हाला तुमच्या समाधानासाठी करायचे असतील तर त्याला माझी आडकाठी नाही. मात्र, जमले तर सर्व स्नेही, कार्यकर्ते, नातेवाईक, आप्त यांना बोलावून स्नेहभोजन द्यावे. समाजाचा विचार करुन कर्मकांडाचा आग्रह न धरता नद्यांना प्रदूषणमुक्त राखण्यासाठी त्यांनी केलेल्या या सूचना संघाच्या स्वाभाविक संस्कारांतून घडल्या आहेत. आज हिंदुत्वाला जे यश मिळते आहे ते पूर्व गौरवाच्या भावनेतून नसून त्यात संघाच्या लक्षावधी कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनाभिमुख व परिवर्तनशील परिश्रमाने जो सामाजिक विश्वास निर्माण केला आहे, त्याचा मोठा वाटा आहे. संघ ग्रंथ वाचून समजणारी गोष्ट नाही. त्याकरिता अशी जीवने वाचावी लागतात. त्याकरिता हिंदुत्वाचे समर्थक व विरोधक या दोघांनाही ती कशी वाचायची हे समजून घ्यावे लागेल.