“आबा आज कोणती गोष्ट सांगणार? आकाशाची, चंद्राची की वेदातील देवतेची?”, सुमितने आल्या आल्या विचारले.
“सुमित, आजची गोष्ट आहे पुराणातली. आकाशाची, सूर्याची आणि चंद्राची! तुझ्या ओळखीची समुद्र मंथनाची गोष्ट आहे. पण आज त्या गोष्टीतला दुसरा प्रसंग पाहू.”, आबा म्हणाले.
सुमितचा आवाज ऐकून, दुर्गाबाई पण त्यांचे विणकाम घेऊन गोष्ट ऐकायला आल्या.
“फार पूर्वी, अमृत मिळवण्यासाठी देव आणि असुरांनी समुद्राचे मंथन करायचे ठरवले.”, आबा गोष्ट सांगू लागले, “त्यासाठी त्यांनी मंदार पर्वताची रवी केली आणि वासुकी नागाची दोरी. घुसळण्यासाठी पर्वत क्षीरसागरात ठेवला खरा, पण समुद्राची खोली जास्त असल्याने पर्वत त्यामध्ये बुडायला लागला. तेंव्हा विष्णूने कूर्मरूप धारण केले, आणि पर्वत आपल्या पाठीवर घेतला. मग असुरांनी वासुकीच्या फण्याची बाजू धरली. आणि देवांनी शेपटीची बाजू धरली. दोन्ही बाजूच्या मंडळींनी मंथन करण्यास सुरवात केली.
“या मंथनातून हलाहल विष आले, जे शंकराने आपल्या कंठात धारण केले. त्या नंतर पारिजातक, कल्पवृक्ष, ऐरावत, उच्चैश्रवा, कामधेनु असे दिव्य वृक्ष व प्राणी आले. धन्वंतरी, लक्ष्मी व चंद्र हे पण समुद्रातून उत्पन्न झाले. सगळ्यात शेवटी ज्यासाठी मंथन सुरु केले, ते अमृत प्रकटले! ते कसे वाटायचे यावरून देव आणि असुरांमध्ये भरपूर वाद झाले. त्यावेळी, विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन असुरांना भुलवले आणि देवांना अमृत वाटायला सुरुवात केली.
“स्वरभानू नावाच्या असुराला doubt आला. तेंव्हा अमृत मिळवण्यासाठी तो देवांच्या ओळीत सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये जाऊन बसला. मोहिनीरूपी विष्णू अमृत वाटप करत स्वरभानू पर्यंत पोचला. स्वरभानुला तो अमृत देणार इतक्यात सूर्य आणि चंद्राने खाणाखुणा करून ‘हा देव नाही!’ असे सांगितले. विष्णूने हात आखडता घेतला. आणि तत्काळ आपले सुदर्शन चक्र सोडून स्वरभानूचा शिरच्छेद केला. पण स्वरभानूने थोडे अमृत प्राशन केले असल्याने त्याला मृत्यू आला नाही. त्याचे शीर आणि धड वेगळे झाले तरी ते दोन्ही जिवंत राहिले. त्यांची नावे – राहू आणि केतू. त्याने सूर्य चंद्राला शाप दिला – ‘तुमच्या तक्रारीमुळे माझ्यावर असा प्रसंग आला ... आता मी तुम्हाला सोडणार नाही. मी तुम्हाला गिळंकृत करणार! तुम्हाला ग्रहण करणार! तुम्हा दोघांना कच्च खाणार! ही! ही! हा! हा! हा!’ असे राक्षसी हास्य करून राहू आणि केतू आकाशात निघून गेले.”, आबा सांगत होते.
दुर्गाबाई म्हणाल्या, “गोष्ट सांगताय ते ठीक आहे. पण असं मोठ्याने राक्षसी हसायला लागला तर शेजार पाजारचे काय म्हणतील?”
“शेजाऱ्यांचे काय घेऊन बसलात दुर्गाबाई? तिकडे राहू चंद्राला गिळायला निघाला आहे! ३१ तारखेला ग्रहण लागणार आहे. ते पाहायचे आहे बरे आपल्याला.”, आबा म्हणाले.
“आबा, या राहू केतूचा ग्रहणाशी काय संबंध?”, सुमितने विचारले.
“सुमित, आता आपण ग्रहणाविषयी वैज्ञानिक भाषेत बोलू, मग राहू-केतू सूर्य-चंद्राला कसे गिळतात ते कळेल.
“चंद्राची कक्षा Ecliptic ला ५ अंश कलली आहे. त्यामुळे पृथ्वी ज्या प्रतलात सूर्याभोवती फिरते; चंद्र काही दिवस त्या प्रतलाच्या वर असतो, आणि काही दिवस त्या प्रतलाच्या खाली असतो. चंद्र एका बिंदुला त्या प्रतलाच्या वर चढतो आणि एका बिंदुला खाली उतरतो. या बिंदूंना – Ascending Node व Descending Node असे म्हटले आहे.
“हेच बिंदू आपल्या गोष्टीतले राहू आणि केतू आहेत. तुझ्या लक्षात येईल, की हे दोन बिंदू एकमेकांना बांधलेले आहेत. ते नेहेमी आकाशात एकमेकांसमोर असतात. म्हणजे ते एकाच entity चे दोन भाग आहेत. एकाच असुराचे धड आणि शीर! पैकी ascending node म्हणजे शीर आहे राहू, तर descending node म्हणजे धड हा केतू आहे.“, आबा म्हणाले.
“आता हे राहू – केतू सूर्य-चंद्राला गिळतात कसे?”, सुमितने विचारले.
“पृथ्वी वरून पहिले असता, असे लक्षात येते की चंद्र आणि सूर्य हे वेगवेगळ्या प्रतलात आहेत. ते जो पर्यंत एक प्रतलात येत नाहीत तोपर्यंत पृथ्वीची किंवा चंद्राची सावली एकमेकांवर पडणार नाही! सूर्य, चंद्र, पृथ्वी, राहू आणि केतू एकाच प्रतलात आले की ते सगळे एका रेषेत येतात. तेंव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर किंवा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि आपण ग्रहणाचा अनुभव घेतो. म्हणजेच राहू – केतू सूर्याला किंवा चंद्राला खातात!
PC: ircamera.as.arizona.edu
“या चित्रावरून तुला आणखी काय लक्षात येते सांग?”, आबा म्हणाले.
“उम्मम ... यातून असे दिसते की बऱ्याच वेळा पृथ्वी चंद्राच्या सावली वरून किंवा खालून निघून जाते. तसेच चंद्राचे पण होते. मात्र वर्षातून दोनदा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते, किंवा चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. त्यामुळे दर वर्षी सहा महिन्यांच्या अंतराने दोनदा ग्रहण होत असणार.”, सुमित म्हणाला.
“अगदी बरोबर आहे तुझा निष्कर्ष सुमित. साधारणपणे ६ महिन्यांच्या अंतराने ग्रहण पाहायला मिळते. ही सगळी मंडळी एका प्रतलात असतात, त्या महिनाभरात २ किंवा ३ ग्रहणे सुद्धा दिसू शकतात. जसे – ३१ जानेवारीच्या पौर्णिमेला चंद्र ग्रहण आहे, आणि त्या नंतरच्या अमावस्येला, १५ फेब्रुवारीला सूर्य ग्रहण आहे.
“तर ६ महिन्यांनी १३ जुलैच्या अमावस्येला सूर्य ग्रहण आहे, त्यानंतरच्या पौर्णिमेला २७ जुलैला चंद्र ग्रहण आहे. आणि त्यानंतरच्या अमावास्येला ११ ऑगस्टला परत एक सूर्य ग्रहण पाहायला मिळणार आहे!”, आबा म्हणाले.
“वाह! मग तुमच्यासाठी मेजवानीच आहे की! इतकी सगळी ग्रहणे पाहायला मिळणार ते!”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“Sadly, भारतातून एकही सूर्य ग्रहण दिसणार नाही आहे. दोन खग्रास चंद्र ग्रहणे मात्र दिसतील. पण त्यातही दुसरे चंद्रग्रहण पावसाळ्यात असल्याने ढगा मधून कितपत दिसेल, दिसेल की नाही ही शंका! त्यामुळे, या वर्षभरात भारतातून दिसणारे best ग्रहण म्हणजे ३१ जानेवारीचे चंद्र ग्रहण!”, आबा म्हणाले.
“म्हणून ३१ तारखेचे ग्रहण चुकवू नकोस!”, सुमित आबांची नक्कल करत म्हणाला.
- दिपाली पाटवदकर