हॉरर कथा म्हणजेच भयकथा अनेकांना वाचायला आवडतात, तसेच भय चित्रपट आणि लघुपट देखील आवडतात. हा लघुपट साधारण त्याच श्रेणीतला आहे. ही कथा आहे एका जोडप्याची. नवरा बायकोमध्ये घरातील एका कार्यक्रमाला जाण्याविषयी वाद होत असतो, नवऱ्याला जायचे असते आणि बायकोला नाही. सुरुवात जरी इथून झाली तरी हा लघुपट काही इतका साधा आणि सरळ नाही.
ही सगळी कथा 'मळलेल्या कणकेल्या गोळ्याच्या' अवती भवती फिरते. आहे ना गम्मतशीर? तर नवरा बायको मध्ये सततची भांडणं होत असतात. याचे प्रमुख कारण म्हणजे, ही बायको रेज कणिक मळून ठेवते आणि सकाळी उठल्यावर बघते तर फ्रिजमध्ये कणिक नसते. तिला वाटतं की तिचा नवरा ही कणिक फेकून देतो, पण सत्य तसं नसतं.
कुठं जाते ही कणिक? कोण नेतं? घरात तर दोघेच असतात, दोघेही कामावर जाणारे मग ती कणिक कुठे जाते? जाणून घेण्यासाठी एकदा तरी नक्कीच बघा हा लघुपट..
सीसीटीव्ही कॅमेरा लावून सुद्धा या हरवणाऱ्या कणकेच्या गोळ्याचे रहस्य काही उलगडत नाही. तसेच बायकोला सतत असं वाटायला लागतं की आपल्याला भास होतायेत? मग पुढे काय होतं? नवरा आपल्या बायकोची कशी मदत करतो? शशशश!!!!!! आताच नाही सांगत...
या लघुपटाचं दिग्दर्शन केले आहे अविनाश पिंगळे यांनी, तर दीप्ती देवी आणि अमोल निखारे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटाला यूट्यूबवर १ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. गोवा लघुपट महोत्सवात हा लघुपट चौथ्या स्थानावर आहे. कणकेचं रहस्य शोधण्यासाठी नक्की बघा हा लघुपट.
- निहारिका पोळ