अवंती : मेधाकाकू, तुला नमस्कार आणि तू, काका आणि आजींसह सर्वांना मकरसंक्रांतीच्या अनेकानेक शुभेच्छा ! आमच्या आजीने यावर्षी तिळाच्या वड्या केल्या कारण आता लाडू चावायला जमत नाही तिला. आणि काल मी तिला आपल्या अभ्यासातील गंमत-जंमती सांगत होते तेव्हा त्यातल्या सौम्य विनोदाच्या स्वादावर काय खुश झाली आजी आणि तिनेही पटकन तिच्या आठवणीतल्या चार-सहा म्हणी मला सांगितल्या !!
मेधाकाकू : अरे व्वा अवंती... सांग सांग पटकन... आता माझी उत्सुकता वाढली आहे. आपल्याला अभ्यासाने जाणवते आहे. थोड्या हलक्या-फुलक्या विनोदाचा स्वाद या लोकश्रुतींमधे किती सहजतेने आला आहे.
अवंती : आजीने सांगितलेली पहिली म्हण, ऐकायला फारच गंमतीची आहे, पण मेधाकाकू अर्थाचा काहीच अंदाज करता येत नाहीये बघ...!
नाशिक त्रिंबकास गेले, नाशिक परगणा ओसाड.
मेधाकाकू : अरेच्या... अवंती, फारच रंजक आणि महत्वाची टिप्पणी करणारी म्हण आहे ही. आता प्रथम ही ‘म्हण’ का आहे ते समजून घेऊया. म्हण म्हणजे बोधकथा, दृष्टांतकथा, कहावत, नीतीकथा किंवा उपमा. एखाद्या व्यक्तीची गुणवैशिष्ठ्ये किंवा वैगुण्य आणि त्यातील साधर्म्य किंवा विरोधाभास दाखवण्यासाठी म्हणींचा वापर केला जातो. प्रत्यक्ष शब्दार्थापेक्षा म्हणीचा भावार्थ आणि गूढार्थ समजून घेणे आवश्यक असते...! म्हण, एखाद्या परिस्थितिचे किंवा प्रसंगाचे किंवा व्यक्ती विशेषाचे वर्णन सोप्या उपमा आणि दृष्टान्त देऊन करतो. आता या म्हणीत आपण, शेजारी-शेजारी असलेल्या दोन शहरांची नावे वाचतो आहोत. नाशिक जवळच त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थस्थान वसलेले आहे. नाशिक शहराच्या नावाची आख्यायिका फार गमतीशीर आहे. श्रीरामाने, पंचवटीमध्ये, शूर्पणखा या राक्षसीचे नाक कापले होते त्यावरूनच या शहराला नाशिक हे नामाभिधान प्राप्त झाले. थोडक्यात सांगायचे तर आपल्या आजच्या म्हणीच्या संदर्भात नाशिक म्हणजे व्यक्तीचे ‘नाक’.! आता म्हणीतली गम्मत अशी की एक लग्नाळू उमेदवार मुलगी पहायला आलेला आहे आणि कांदे पोह्यांचा कार्यक्रम सुरु आहे. या उमेदवाराचे नकटे-अपरे नाक पाहून मुलीची आत्या स्वयंपाकघरात कुजबुजते आहे. नाशिक त्रिंबकास गेले, नाशिक परगणा ओसाड. या मुलाचे नकटे नाक (म्हणजे नाशिक) जणू जवळच कुठे तरी सरकले आहे (त्र्यंबकेश्वरला) आणि म्हणून नाकासह याचा चेहेरा जणू सपाट झाला आहे, अशी नापसंतीदर्शक गमतीने-उपरोधाने केलेली टिप्पणी.
अवंती : अरेच्या... मेधाकाकू... आत्याने एकदम मस्त टिप्पणी केली की मुलगा नापसंत करताना. म्हणजे इतकी प्रत्यक्ष टिप्पणी, जरी मुलाकडच्यांनी ऐकली तरी भांडण नक्की होणार नाही याची खात्रीच की.! आजीची दुसरी म्हण अशी आहे. पुणतांब्याच्या म्हशी आणि ढोणगाव साजरा. मेधाकाकू, परत एकदा माझ्या डोक्यावरून गेलेला चेंडू आहे बघ हा. काय अर्थ असावा या म्हणीचा...!!
मेधाकाकू : अवंती... कम्माल आहे तुझ्या आजीची आणि तिच्या स्मरणशक्तीची. काय मस्त म्हणी आणि पुन्हा एक मस्त उपहासाचा स्वाद. हा एक वेगळाच पण महत्वाचा अवगुण या म्हणीत मांडला गेलाय. दुसऱ्याचे कोणाचे यश, गुणवत्ता किंवा वैभव आपलेच म्हणून मिरवायची काही मंडळीना सवय असते. पुणतांबे नावाचे शेतीप्रधान तालुक्याचे शहर अहमदनगर जिल्ह्यात आहे. नावाव्यतिरिक्त या शहराचा, अर्थाअर्थी या म्हणीशी काही संबंध जोडता येणार नाही कारण शेतीप्रधान असले तरी उत्तम म्हशींच्या पैदाईशीसाठी या शहराचा परिचय नाही. शतकांपासून एक लोकोक्ती असावा की, पुणतांब्याच्या बाजूलाच ढोणगाव नावाचे कपोलकल्पित गाव आहे आणि पुणतांब्याच्या हद्दीत चरणारी गुरे आमचीच आहेत असा दुराभिमान ढोणगावातील लोक मिरवतात. थोडक्यात समाजातील अशा दुराभिमानावर उपहासाने टिप्पणी करणारी हि एक प्रत्ययकारी म्हण, असा आणि इतकाच याचा मथितार्थ...!!
अवंती : मेधाकाकू... आता मी तुला फक्त आजीने सांगितलेली पुढची म्हण सांगते, कारण मी आता फक्त तुझे ऐकायचे काम करतीये आहे. आजी म्हणाली.
म्हैस विते तें पारडयाकरितां, मालकाकरितां नाहीं.
मेधाकाकू : आपल्या पूर्वजांनी फारच अर्थपूर्ण टिप्पणी केली आहे या म्हणीत. बघ किती चतुर होते त्या काळातील नागरिक आणि नेमके लक्षणं शोधण्याचे काम. या म्हणीत चार-सहा शब्दांत बांधून त्यांनी किती कसबाने केले आहे. गायी-म्हशीच्या विणीनंतर क्षणांत निर्माण होणारा मालकाचा दुराभिमान आणि त्यावरचा उतारा इतका विलक्षण परिणामकारक असावा याचेच मला आश्चर्य वाटतंय. मात्र हळूच चिमटा काढणारा हा उपहास फक्त म्हशीच्या मालाकापुरता उरत नाही तर प्रत्येक प्रसंगातील दुराभिमानावर हा चिमटा लागू पडतो. म्हशीला पारडू होणे ही निसर्ग नेमाने होणारी प्रक्रिया आहे. म्हशीला तिचे पारडू प्राणाहून प्रिय आहे. आपल्या म्हशीला पारडू झाल्याचा मालकाचा आनंद, म्हशीच्या खिजगणतीत सुद्धा नसतो. तो फक्त मालकापुरता मर्यादित असतो. तेंव्हा अशा घटना आपल्यामुळेच घडतात असा दुराभिमान कोणी बाळगू नये असा या म्हणीचा भावार्थ घ्यायला हवा आपण. म्हणीतील बोली भाषेचा अर्थ आणि त्यातील भावार्थाची योग्य दखल त्याकाळात घेतली जात असावी. अशी खात्री आता मला वाटायला लागली आहे कारण आज ऐकलेल्या शब्दांचा योग्य भावार्थ समजण्याची आपली क्षमता कमी झालेली आहे !
अवंती : मेधाकाकू... अगदी सुरुवातीला तू मला सांगितलेले आजही मला आठवतंय की, या म्हणी आणि हे वाकप्रचार म्हणजे चिन्ह आणि चिन्हसंकेताची-चिन्हार्थाची उत्तम उदाहरणे आहेत त्याचा अनुभव आज पुन्हा एकदा घेतलाय मी.
- अरुण फडके