‘सज्जन शक्ती सर्वत्र’ हे मध्यवर्ती सूत्र डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतात ‘हिंदू चेतना संगम’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची रचना रविवार दि. ७ जानेवारी २०१८ रोजी करण्यात आली होती. हा कार्यक्रमअभूतपूर्व उत्साहात आणि स्वयंसेवकांच्या उपस्थितीत पार पडला. तेव्हा, एकूणच ‘हिंदू चेतना संगम’च्या आयोजनामागील उद्देश, त्याचे स्वरुप आणि समाजात संघाविषयी गेलेला एक सकारात्मक संघटनाचा संदेश याचा आढावा घेणारा हा लेख...
रा. स्व. संघाच्या संघटनात्मक रचनेत शासकीय महाराष्ट्रातील कोकण हा स्वतंत्र प्रांत आहे. ‘हिंदू चेतना संगम’ या उपक्रमांतर्गत कोकण प्रांतात एकाच दिवशी २५५ ठिकाणी कार्यक्रम झाले.त्यात २,३७२ वस्त्या, ५६६ मंडले व १,७४१ गावांचा प्रातिनिधिक सहभाग होता. ३५ हजार संपूर्ण गणवेषधारी स्वयंसेवक या कार्यक्रमात उपस्थित होते. तसेच सुमारे ७५ हजार स्त्री-पुरुष नागरिक यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील सर्व म्हणजे २५५ वक्त्यांनी एक समान सूत्र डोळ्यासमोर ठेवून ‘संघमंत्र व शाखातंत्र’ या विषयाची मांडणी आपापल्या भाषणांत केली. संघकार्याचे स्वरूप तसेच हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी आवश्यक असलेले विचार व व्यवहार यांची मांडणी केली. त्याचबरोबर समाजातील सज्जन शक्तीकडून संघाला अपेक्षित असलेल्या सहकार्याची व सहभागाची चर्चा केली. प्रत्येक ठिकाणी रा. स्व. संघाच्या ९२ वर्षांच्या इतिहासातील उपलब्धीसंबंधी एक प्रदर्शनीही मांडण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रांतभर ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे झालेले प्रवास, वस्त्या-वस्त्यातून जनसंपर्क, वैयक्तिक भेटीगाठी, समाजमाध्यमातून तरुणाईशी संवाद, ’Join RSS' सारखा उपक्रम, अशा माध्यमातून या उपक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यात आला. हा कार्यक्रम म्हणजे पूर्व नियोजन (Planning in Advance) आणि पूर्ण नियोजन(Planning in detail) या संघटनसूत्राचा उत्कृष्ट नमुना होता. वक्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागशः व जिल्हाशः अभ्यासवर्ग घेण्यात आले. त्यामुळे वक्त्यांच्या मांडणीत सर्वत्र सुसूत्रता होती. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला जातीजातीत संघर्ष पेटवून समाजजीवन दुभंगून टाकण्याच्या कुटील हेतूने अनेक घटना कोणाच्या चिथावणीने जाणीवपूर्वक घडवून आणल्या गेल्या, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. या संघर्षाला जातीय विद्वेषाचे स्वरूप देण्याचा त्यांचा समाजघातकी उद्देशही स्पष्ट झाला. ‘दलित विरुद्ध मराठा,’ ‘दलित विरुद्ध सवर्ण,’ ‘मराठा व दलित विरुद्ध ब्राह्मण’ असा सामाजिक संघर्ष पेटविण्याचाही प्रयत्न झाला. दुर्दैवाने या घटनाक्रमाला नक्षलवाद्यांची व ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशी राष्ट्रविरोधी दर्पोक्ती करणार्या जेएनयुप्रणीत राष्ट्रद्रोह्यांची साथ मिळाली, हे सर्वाधिक धोकादायक आहे. याचे दूरगामी परिणाम समाज शतभंग होण्यात होईल, हे या आंदोलनाला चिथावणी देणार्यांना समजत नाही असे नाही. या घटनाक्रमावर संघातर्ङ्गे या कार्यक्रमांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होतील अशी तथाकथित पुरोगाम्यांची व डाव्या पक्षांची अपेक्षा होती. त्यासाठी ते देव पाण्यात घालून बसले होते. परंतु, या कार्यक्रमातील एकाही वक्त्याने समाजमन दुभंगेल, असा कोणताही विचार मांडला नाही वा या घटनाक्रमावर भाष्यही केले नाही. कारण, असे करणे अंतिमतः हिंदू संघटनेच्या हिताचे नाही, अशी त्यांची समाजहितैषी भूमिका होती. स्वाभाविकपणे सर्व वक्त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देण्याचा मोह टाळून संयम बाळगला, हे सर्व हिंदू समाजाने लक्षात घेतले पाहिजे.
आजपर्यंत संघरचनेत प्रांतस्तरावर जे मोठे कायर्र्क्रम होत ते प्रायः एककेंद्री स्वरूपाचे होते. त्या त्या प्रांतातून स्वयंसेवक एका ठिकाणी एकत्र जमत व एकच भव्य कार्यक्रम होत असे. या पार्श्र्वभूमीवर कोकण प्रांताने प्रथमच पूर्णतः विकेंद्रित स्वरूपात २५५ ठिकाणी कायर्र्क्रमांची योजना केली. या स्वरूपाचा हा पहिलाच प्रयोग म्हणता येईल. यातून समाजात खोलवर संपर्क करून संघविचार पोहोचविणे शक्य झाले. अशा कार्यक्रमाची तपशीलवार योजना करणे हे संघटनेसमोर मोठेच आव्हान होते. या निमित्ताने, संघाने विकसित केलेल्या संघटनशास्त्रात एक नवा अध्याय जोडला गेला, असेच म्हणावे लागेल.
‘हिंदू चेतना संगम’ या उपक्रमाच्या भावात्मक व उत्साहवर्धक बाजूचा आपण येथवर आढावा घेतला. पण, त्याचबरोबर त्यातील त्रुटीचाही विचार व्हायला हवा. संघाचे आद्य सरसंघचालक पू. डॉ. हेडगेवार यांनी संघाच्या संख्यात्मक वाढीचे कार्यकर्त्यांसमोर एक उद्दिष्ट ठेवले होते. त्याचा भावार्थ असा - संघमंत्र व शाखातंत्र यांचा हिंदू समाजावर प्रभाव पडून तो संघटित व्हावयाचा असेल, तर शहरी भागात किमान तीन टक्के व ग्रामीण भागात एक टक्का जनसंख्येपर्यंत संघ पोहोचला पाहिजे व ते सर्वजण संघरचनेत स्वयंसेवक म्हणून समाविष्ट झाले पाहिजेत. असे संस्कारित स्वयंसेवक हाच हिंदू संघटनेचा पाया असणार आहे. डॉ. हेडगेवारांनी सांगितलेली ही मोजपट्टी डोळ्यासमोर ठेवली तर संघ स्थापनेला ९० वर्षे होऊन गेली असूनही त्या उद्दिष्टाच्या ५० टक्केही आपण कोकण प्रांतातील हिंदू समाजापर्यंत पोहोचू शकलेलो नाही, हे जमिनीवरील वास्तव लक्षात घ्यायला हवे. खर्या अर्थाने समरसतायुक्त व तुच्छतामुक्त हिंदू समाजनिर्मितीसाठी डॉक्टरजींनी आपल्यासमोर ठेवलेले लक्ष्य पूर्ण करणे, हे सर्व कार्यकर्त्यांसमोर मोठे आव्हान आहे. हिंदू समाज संघटन हा प्रवास कठीण आहे. तसेच तो दीर्घ पल्ल्याचा व लांबवरचा रस्ता आहे, पण राष्ट्रहितार्थ तो जर एकमेव रस्ता असेल तर तो सर्वात जवळचा रस्ता आहे, हे लक्षात ठेवायला हवे. (No doubt, it is the longest way. But if it is the only way, it is the shortest way.) परंतु, आज समाजमानस संघकार्याला अतिशय अनुकूल आहे, हे लक्षात घेता नजीकच्या भविष्यकाळात हे लक्ष्य पूर्ण होईल, असा विश्वास वाटतो. या संदर्भात प्रत्येक कार्यकर्त्याची मानसिकता कशी असावी, हे रॉबर्ट ङ्ग्रॉस्ट या आंग्ल कवीने आपल्या ’Stopping by the Woods on a Snowy Evening' या कवितेत चपखल शब्दांत लिहून ठेवले आहे. तो म्हणतो,
The woods are lovely,
dark and deep
But I have promises to keep,
And miles to go before I sleep
And miles to go before I sleep...
या कवितेतील ’I’च्या जागी ’We’ शब्दाची योजना केली, तर संघ कायर्र्कर्त्यासमोरील आव्हानांचा अन्वयार्थ लक्षात येईल. तोपर्यंत त्याला विश्रांती (Sleep) नाही.
-२-
‘सज्जन शक्ती सर्वत्र’ हा संघाचा सार्वकालिक विश्र्वास आहे. मात्र, दुर्दैैवाने ती शक्ती विस्कळीत आणि असंघटित आहे. सज्जनांमध्ये जागृती निर्माण करणे, त्यांना त्यांच्यातील अंतःशक्तीचे भान उत्पन्न करून देणे, हे अशा कार्यक्रमातून संघाला साध्य करावयाचे असते. ‘स्वयंसेवक’ ही एक वृत्ती आहे, जीवनदृष्टी आहे. ही वृत्तीच स्वयंसेवकाला कार्यरत ठेवते आणि तो आपल्या आवडीच्या क्षेत्रात वा संघ सुचवेल त्या क्षेत्रात तन-मन-धनपूर्वक स्वतःला झोकून देऊन समाजहिताचे कार्य करीत असतो.संघ परिवाराच्या बाहेरही असंख्य नागरिक स्वयंसेवकवृत्तीने कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात समर्पित भावनेने समाजकार्य करीत असतात. अनेकांना काम करण्याची इच्छा असते, पण मार्ग सापडत नाही. अशांना आत्मभान देऊन स्वतःच्या शक्तीची जाणीव करून देणे, हे संघाचे काम आहे. प्रत्यक्ष संघशाखेत न जाणारे, परंतु स्वयंसेवक वृत्तीने समाजात रचनात्मक काम करणारे नागरिक म्हणजे सज्जनशक्ती. अशा नागरिकांना संघकार्यात वा संघपरिवाराच्या विविध उपक्रमांत जोडणे हे ‘हिंदू चेतना संगमा‘चे उद्दिष्ट. या अर्थाने त्यांच्यापर्यंत संघविचार पोहोचणे आवश्क असते. त्यासाठी हा प्रांतव्यापी जनजागरणाचा व सज्जनशक्ती कार्यरत करणयासाठीचा कार्यक्रम.
दुसरे म्हणजे, १० हजार वस्तीपर्यंत संघ पोहोचविणे ही संघसंस्थापकांना अपेक्षित असणार्या लक्ष्यापर्यंत जाण्याची पूर्व अट आहे. त्यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी ठरतात. लक्ष्यपूर्ती समीप येते. संघाचे लक्ष्य हिंदू समाजाचे संघटन हे आहे. ‘मी हिंदू आहे आणि या हिंदू राष्ट्राचा मी पुत्ररूप घटक आहे,’ या भावनेने ओतप्रोत भरलेला हिंदू समाज. या समाजाचे सुखदुःख आपले आहे, असे मानून जीवनव्यवहार करणारा हिंदू समाज. त्या आधारे एका विशाल कुटुंबाप्रमाणे आत्मीयतेने जीवन जगणारा हिंदू समाज. ही संघटित हिंदू समाजाची खरीखुरी ओळख आहे. त्यातूनच राष्ट्रीय भावनेने भारलेला व सामाजिक जाणीवेने सक्रिय, अशा हिंदू समाजाची व हिंदू संघटनेची निर्मिती होऊ शकेल. या अर्थाने प्रत्येक हिंदू हा उद्याचा स्वयंसेवक आहे, असा संघाचा विश्र्वास आहे. अशी वृत्ती व मानसिकता निर्माण होण्यासाठी संस्कारसाखळीची आवश्यकता असते. म्हणून दररोजची संघशाखा. त्या माध्यमातून प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात सांघिक वृत्ती व राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण केली जाते. त्यासाठी त्याच्या स्वभाव घडणीवर भर दिला जातो. संघ हा समाजव्याप्त झाला पाहिजे, या संकल्पनेचा एवढा व्यापक अर्थ आहे. म्हणूनच संघाचे लक्ष्य केवळ शाखांचे जाळे देशभर उभे करणे हे नाही, तर ‘राष्ट्र उभारणीसाठी मनुष्य निर्माण (Man-making for Nation-building) हे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न साकार करणारा हिंदू समाज निर्माण करणे, हे संघाचे ध्येय आहे. संघमंत्र व शाखातंत्र स्थायी स्वरूपात समाजात रुजविणे हा संघाचा जीवनोद्देश (Life Mission Hasten slowly) आहे. संघ समाजमय झाला की संघाच्या वेगळ्या अस्तित्वाची गरजच उरणार नाही, अशी संघाची धारणा आहे. त्या दृष्टीने व समाजपरिवर्तनाचे गतिशास्त्र लक्षात घेऊन या सूत्रानुसार संघाची वाटचाल सुरू आहे.
-३-
या लेखाच्या शेवटच्या टप्प्यात संघाविषयी समाजाची धारणा कशाप्रकारे निकोप व स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे, याची आपण चर्चा करणार आहोत. संघमंत्र समजावून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे संघशाखेत मनःपूर्वक सहभागी होऊन स्वतःच अनुभव घेणे. नदीच्या काठावर उभे राहणार्याला तिच्या प्रवाहाचा वेग व तिची खोली याचा अंदाज बांधता येत नाही. तसेच संघमंत्राच्या आकलनाचेही आहे.संघाचे विरोधक व तथाकथित पुरोगाम्यांचे संघाविषयीचे आकलन ‘एक हत्ती व सात आंधळे’ या गोष्टीतील दृष्टीहीनांसारखे असते. हत्तीच्या एखाद्या अवयवाला स्पर्श करून तो अवयव म्हणजेच संपूर्ण हत्ती असा समज ते करून घेतात आणि तेथेच त्यांची गङ्गलत होते. संघाच्या विचारांची व कार्यप्रणालीची प्रत्यक्ष अनुभूती न घेतलेल्या हिंदू समाजातील सामान्य माणसाचीही अशी चूक वा गैरसमजूत होऊ शकते. त्याची काही उदाहरणे पाहू. जीवनाच्या अनेक क्षेत्रात संघाच्या माध्यमातून सुमारे दीड लाख सेवाकार्ये देशभरात चालू आहेत. याचा अर्थ असा नव्हे की, संघ म्हणजे सेवाकार्य करणारी एक विशाल स्वयंसेवी संस्था आहे. देशात जेव्हा जेव्हा नैसर्गिक किंवा अन्य आपत्ती येतात, तेव्हा संघाचे स्वयंसेवक आत्मप्रेरणेने व स्वाभाविकपणे घटनास्थळी धावून जातात. मग तो किल्लारी भूकंप असो वा नदीला आलेल्या महापुराने माजलेला हाहा:कार असो. याचा अर्थ असा नव्हे की, संघ म्हणजे आपत्ती व्यवस्थापन दल आहे. संघाच्या माध्यमातून प्रसंगोपात एखाद्या विषयाचा प्रचार देशभर केला जातो किंवा जनमत प्रभावित करण्यासाठी उपक्रम हाती घेतले जातात. विवेकानंद शिलास्मारक निधी, गोरक्षा अभियान, रामजन्मभूमी आंदोलन वा आणीबाणीनंतरच्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीच्या पुनःप्रतिष्ठापनेसाठी संपूर्ण सहभाग ही त्याची काही उदाहरणे. याचा अर्थ असा नाही की, संघ ही एक देशव्यापी प्रचारयंत्रणा आहे. देशात हिंदूहिताच्या वा राष्ट्रहिताच्या दृष्टीने काही नवीन विषय रुजविण्याचे काम संघ करतो. ‘न्यू मिलेनियम’ (इ. स. २०००) च्या प्रचाराला चोख उत्तर देण्यासाठी संघाने हिंदू नववर्ष यात्रेची नवी संकल्पना या देशात रुजवली. पण, याचा अर्थ हिंदू संघटन म्हणजे समाजात नवीन विषय प्रस्थपित करणारी यंत्रणा असा होत नाही.
हे किंवा यासारखे अनेक विषय म्हणजे संघ विचार, सशक्त हिंदू संघटनेचा विचार, समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात रुजविण्याचे व समाजमन प्रभावित करण्याचे केवळ साधन मात्र होत. संघाचे अंतिम लक्ष्य वा साध्य हिंदू संघटन उभे करणे हेच आहे. हा साध्य-साधन विवेक आपण नीट समजून घेतला पाहिजे, तरच संघाचे यथायोग्य आकलन होऊ शकेल. संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. श्री गोळवलकर गुरुजी आपल्या एका मुलाखतीत म्हणाले होते, ‘‘Yes, We want to conquer all walks of life.’’ हिंदू संघटन कशासाठी, याचा सुस्पष्ट निर्देश श्रीगुरुजींनी या मुलाखतीत केलेला दिसतो. म्हणून त्यांच्या या उद्गाराचा आशय (import ) आपण योग्य रीतीने समजून घेतला पाहिजे. आजकाल ‘हिंदू धर्म’ आणि ‘हिंदुत्व’ तसेच ‘कडवे हिंदुत्व’ ( Radical Hindutva) आणि ‘सौम्य हिंदुत्व’ (Soft Hindutva ) असे सोयीस्कर शब्दच्छल करून हिंदू समाजात चुकीचे संकेत वा गैरसमज रुजविण्याची टूम निघाली आहे. कथित धर्मनिरपेक्षतावादी, समाजवादी मंडळींचे हा भ्रम समाजात निर्माण करून बुद्धिभेद करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. ही मंडळी या उपक्रमात अग्रेसर व आक्रमक आहेत. त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. त्यांच्या या चुकीच्या मांडणीचा प्रतिवाद न करता संघविचाराची स्वच्छ धारणा हिंदू समाजात उत्पन्न करून या उचापतींना शह देणे, ही काळाची गरज आहे. छोटी रेषा पुसण्यापेक्षा तिच्या शेजारी मोठी रेषा काढणे महत्त्वाचे. सुदैवाने आज जनमानस त्यासाठी अनुकूल आहे. ’’होय, हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, हिंदू समाज हा या मातृभूमीचा पुत्ररूप समाज आहे,’’या राष्ट्रीय भावनेने रसरसलेला व सामाजिक जाणीवेने सक्रिय असलेला प्रत्येक हिंदू हा संघाचा भावी स्वयंसेवक आहे. अशा वृत्तीच्या व मानसिकतेच्या हिंदूंचे संघटन म्हणजे हिंदू संघटन, अशी संघाची धारणा आहे. असा विजीगिषू वृत्तीचा व आत्मभान असलेला हिंदू समाज हा या राष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याचा कणा आहे, या विचाराने संघ समाजव्याप्त होण्याचा व हिंदू संघटन करण्याचा प्रयत्न करीत आहे. समाजात सर्वत्र असलेल्या सज्जनशक्तीचे संघटन व त्याचे राष्ट्रउभारणीसाठी उपयोजन हा ‘हिंदू चेतना संगम’ सारख्या उपक्रमाचा उद्देश असतो. संघाची ही भूमिका हिंदू समाज ओळखेल व समजावून घेईल, अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो.