इक बंगला बने न्यारा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018   
Total Views |
 
 
 
“सुम्या, हे बघ, तुला आधीच सांगून ठेवतो. कधीतरी प्रेमात पडशील. मग तुझ्या प्रेमिकेसाठी चंद्रावर बंगला वगैरे बांधायला घेशील. पण लक्षात ठेव, तो अशा ठिकाणी बांध की जिथून पृथ्वी दिसेल.”, आबा म्हणाले.
 
“आजी तसही माझ्यासाठी एक चंद्रमुखी वधू शोधणार आहे. तुम्ही मला चंद्रावर चांगलासा प्लॉट शोधून द्या! मग मी बांधतो की तिथे बंगला! हाय काय अन् नाय काय!”, सुमित हसत हसत म्हणाला, “पण आबा, पृथ्वीवरून कुठूनही चंद्र दिसतो, तसे चंद्रावरून पण कुठूनही पृथ्वी दिसणारच ना?”, सुमित म्हणाला.
 
“तसे नाही आहे ना! कसे आहे, चंद्र स्वत:भोवती फिरतो आणि त्याबरोबर पृथ्वी भोवती फिरतो. पण या दोन्हीसाठी लागणारा कालावधी एकच आहे. त्यामुळे सतत त्याची एकच बाजू पृथ्वीकडे असते.”, आबा म्हणाले.
 
सुमितच्या चेहऱ्यावरचे प्रश्न चिन्ह पाहून आबा म्हणाले, “थोडे सोपे करून सांगतो. कसे बघ? समजा एक दगड दोरीला बांधून जर तो आपल्या भोवती फिरवला, तर फिरवणाऱ्याला त्याची एकच बाजू दिसेल ना? अगदी तसेच पृथ्वीला चंद्राची सतत एकच बाजू दिसते.”, आबा म्हणाले.
 
“अच्छा! म्हणून चंद्राच्या एकाच बाजूच्या आकाशात पृथ्वी दिसते! आणि दुसऱ्या बाजूच्या आकाशात फक्त चांदणं!”, सुमित म्हणाला.
 
“Righto! दुसऱ्या बाजूला जर कुठला देश असता ना, तर तिथल्या माणसांना या विश्वात पृथ्वी नावाचा कुठला ग्रह आहे, आणि आपण तिच्या भोवती फिरतो वगैरे काहीच कळलं नसतं! आपण कसे नायगारा पाहायला अमेरिकेला जाऊ. तसे तिथले लोक पृथ्वीचे दर्शन घ्यायला अर्धा चंद्र ओलांडून आले असते!”, आबा म्हणाले, “असो. याचा दुसरा अर्थ असा आहे, की पृथ्वीवरून सुद्धा माणसाने चंद्राची पलीकडची बाजू कधीच पाहिली नाही! १९६० मध्ये रशियाच्या Luna-3 ने चंद्राच्या दुसऱ्या बाजूचे फोटो प्रसिद्ध केले. तेंव्हा मानवाने पहिल्यांदा चंद्राची दुसरी बाजू पाहली. ही पहा - ”
 

 
“अरे! चंद्राची पलीकडची बाजू तर अलीकडच्या बाजू पेक्षा फारच वेगळी दिसते! हे कसे?”, सुमितने विचारले.
 
“काय झाले, फार फार पूर्वी, चंद्रावर अनेक उल्का आदळल्या. चंद्राच्या आपल्याकडच्या बाजूवर उल्का आदळल्या तेंव्हा चंद्राच्या पोटातून लावा बाहेर पडून पाण्यासारखा पसरला. या लावामुळे त्या भागात आधी पडलेले खड्डे सहजच बुजवले गेले आणि मोठमोठे सपाट प्रदेश तयार झाले. या सपाट जागांना Latin मध्ये ‘mares’ म्हणजे ‘समुद्र’ असे नाव दिले. हा पहा Mare Crisium किंवा Sea of Crisis चा फोटो. चंद्रावरच्या सस्याच्या कानाजवळचा हा खोलगट भाग.
 

 
“पण, चंद्राच्या पलीकडच्या बाजूवर मात्र उल्का आदळल्यावर लावा बाहेर पडला नाही, फक्त गोल आणि खोल खड्डे मात्र पडत राहिले.”, आबा म्हणाले.
 
“आबा, पलीकडच्या बाजूला लावा का बाहेर न पडायचे कारण काय होते?”, सुमित.
 
“पलीकडच्या बाजूची crust जास्त जाड असल्याने त्यामधून लावा बाहेर पडला नाही, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. “, आबा म्हणाले, “आता पाणी पुरीच्या पुरी सारखी, चंद्राची एक बाजू टणक आणि एक मऊ का झाली आहे या बद्दल अनेकांची अनेक मते आहेत.”, आबा म्हणाले.
 
“आबा, ते काही का असेना! मी मात्र आता ठरवून टाकलं! चंद्रमुखीसाठी बंगला बांधायचा तो चंद्राच्या अलीकडच्याच बाजूला! कुठल्याशा Mare च्या किनाऱ्यावर एक छानसा टुमदार बंगला! रात्री समुद्राच्या काठावर बसून, रेतीत रेघोट्या मारत, चंद्रमुखी सोबत आकाशात नीलवर्णी पृथ्वी उगवतांना पाहेन. आणि तुमच्या आवडीचे गाणे म्हणेन – उगवली पृथ्वी पुनवेची!”, सुमित म्हणाला.
 
“थत्त वेड्या! अरे चंद्राच्या इकडच्या बाजूचे तोंड पूर्णवेळ पृथ्वीकडे आहे. त्यामुळे इथल्या आकाशात तिन्ही त्रिकाळ पृथ्वी दिसते! चंद्रावर पृथ्वी उगवतही नाही आणि मावळतही नाही! कायमचा निळ्या रंगाचा आकाशकंदील लावल्यासारखं. तो वाऱ्यावर हिंदोळल्या इतपत थोडाफार हलतो इतकेच. पण २४ तासात पृथ्वी स्वत:भोवती गोल फिरलेली दिसेल. पृथ्वीची अलीकडची, पलीकडची बाजू दिसेल. आणि महिनाभर तिच्या कला पण दिसतील.
 
“नाही म्हणायला चंद्राच्या दोन्ही बाजूंच्या मधल्या भागात थोड्या प्रमाणात पृथ्वीचा अतिशय संथ उदय आणि अस्त दिसू शकेल. पण तसे असले तरी तिथे पृथ्वी केवळ क्षितिजावरच दिसेल. एकूण काय, तर त्या देखाव्याला पृथ्वीवरच्या चंद्रोदयाची सर नाही!”, आबा म्हणाले.
 
“ओह हो! म्हणजे बंगला चंद्रावर बांधला तरी फिरायला इथेच यावे लागणार!”, सुमित खट्टू होऊन म्हणाला!
 
References - 
 
Earthrise over the Moon - Karen Masters
 
PC: The Secret of the Dark Side of the Moon
 
-  दिपाली पाटवदकर
@@AUTHORINFO_V1@@