गौरी लंकेश खून आणि ट्रायल बाय मीडिया

    07-Sep-2017   
Total Views | 5

 

 

तीन दिवसांपूर्वी ‘गौरी लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादिका, डाव्या विचारसरणीच्या पत्रकार आणि नक्षलवादी हिंसेच्या खुल्या समर्थक असलेल्या गौरी लंकेश यांचा बंगळूरु मध्ये त्यांच्या घराच्या दारातच गोळ्या झाडून खून करण्यात आला. राजराजेश्वरी नगर ह्या बंगळुरू मधल्या उच्च मध्यमवर्गीय भागात त्यांचे घर होते. त्या त्यांच्या बंगल्याचे दार उघडत असतानाच मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गौरी लंकेश यांचा जागीच मृत्यू झाला, आणि देशभरात एका मोठ्या वादाला तोंड फुटले. खरे तर कुठल्याही व्यक्तीचा असा त्यांच्या राहत्या घरात, एका सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरात असा निर्घृण खून होणे ही पूर्ण देशासाठी, समाजासाठी अत्यंत शरमेची गोष्ट आहे. त्यांचा खुनाचा करावा तितका निषेध कमीच आहे, पण गौरी लंकेश ह्यांच्या मृत्यूनंतर जेमतेम अर्ध्या तासातच मीडिया आणि सोशल मीडिया मध्ये त्यांच्या खुनावरून जे राजकारण रंगायला सुरवात झाली ते अत्यंत किळसवाणे आणि घाणेरडे होते. 

 

गौरी लंकेश ह्या त्यांच्या कारकिर्दीत अत्यंत वादग्रस्त पत्रकार म्हणून प्रसिद्ध होत्या. हिंदूवादी विचारांचा त्यांनी उघड सतत तिरस्कार केलेला होता आणि नक्षलवादी हिंसेचे जाहीर समर्थन केले होते. मध्ये त्यांच्या सोशल मीडियावर त्यांनी 'भारत तेरे टुकडे होंगे, इन्शा अल्ला इन्शा अल्ला' अश्या  घोषणा देणाऱ्या आझादी गॅंगचे कन्हैया कुमार आणि जुनैद हे म्हणजे आपली दोन 'मुले' आहेत अश्या अर्थाचे ट्विट केले होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे त्यांच्या भावाशी 'गौरी लंकेश पत्रिका' ह्या त्यांच्या साप्ताहिकाच्या मालकीवरून मतभेद झाले होते आणि तेव्हा आपल्या भावाने आपल्याला रिव्हॉल्वर दाखवून धमकी दिली होती अशी त्यांनी पोलिसात तक्रारही केली होती. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी त्यांच्या साप्ताहिकात हिंदू धर्माबद्दल आणि भाजपबद्दल मानहानीकारक मजकूर लिहिल्याच्या आरोपावरून धारवाडचे खासदार प्रह्लाद जोशी ह्यांनी त्यांना कोर्टात खेचले होते व त्यांच्यावर मानहानीचा दावा लावला होता. ते आरोप सिद्ध होऊन कोर्टाने त्यांना सहा महिने तुरुंगवास आणि ५००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. त्या सध्या जामीनावर होत्या. जाहीर आहे की अश्या वादग्रस्त व्यक्तिमत्वाला शत्रू अनेक असतील. 

 

गौरी लंकेश ह्यांना कुणी संपवलं ह्याचा तपास करायला कर्नाटक सरकारने विशेष पोलीस पथक (एसआयटी) नेमले आहे, पण त्या पथकाचा तपास अजून सुरूही झालेला नसताना गौरी लंकेश ह्यांच्या खुनावरून जे राजकारण खेळले जात आहे ते अत्यंत किळसवाणे आहे. काही कडव्या हिंदुत्वसमर्थक म्हणवणाऱ्या लोकांनी त्यांच्या खुनावरून सोशल मीडियावरून जाहीर आनंद व्यक्त केला, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या बाबतीत अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा उपयोग केला गेला, हे अतिशय धक्कादायक आहे. लोकशाही असलेल्या देशात एखाद्या व्यक्तीचा निर्घृण खून होणे ही अत्यंत भीतीदायक आणि निषेधार्ह घटना आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचा आनंद साजरा करणे आपल्या संस्कृतीत निश्चितच बसत नाही, मग ती व्यक्ती तुमची कट्टर विरोधक का असेना. तिकडे डाव्या विचारांच्या लोकांनी तर गौरी लंकेश ह्यांच्या मृत्यूनंतर पाचच मिनिटांच्या आत त्यांचा खून कुणी केला हे जाहीरही करून टाकले होते. 

 

जळत्या चितेवर आपली पोळी भाजून घेण्यात काँग्रेस पक्ष नेहमीच पुढे असतो. राहुल गांधी केरळमध्ये संघाच्या लोकांवर प्राणघातक हल्ले होतात तेव्हा मूग गिळून गप्प बसतात पण गौरी लंकेश ह्यांच्या खुनानंतर थेट पंतप्रधान मोदींना ह्यात गोवून ते मोकळे झाले होते. गौरी लंकेश ह्यांचा खून ज्या बंगळूरमध्ये झाला त्या कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारवर असते हे एरवी पटकन आठवणारे सत्य राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते विसरले आहेत असे दिसते. तिथे केरळ काँग्रेसने तर कहरच केलाय. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गौरी लंकेश ह्यांच्या मृतदेहाभोवती भारताचा नकाशा काढून त्यांनी ट्विट केलंय हे 'काँग्रेसमुक्त भारताचे' खरे चित्र आहे! हे ट्विट करताना काँग्रेस पक्ष हे विसरलाय की गौरी लंकेश ह्यांचा खून काँग्रेसच्याच राजवटीत झालाय आणि इतकेच नव्हे तर ज्या दाभोलकर आणि कलबुर्गी ह्यांच्या खुनाशी गौरी लंकेश ह्यांच्या खुनाचा संबंध जोडला जातोय त्यांचे दोघांचेही खून काँग्रेसच्याच राजवटीत झाले होते आणि दोघांचेही खुनी अजून सापडलेले नाहीत, आणि आपण लोकशाही प्रक्रियेचे खंदे समर्थक आहोत असे शिरा ताणताणून सांगणारे हे लोक आता कुठल्याही साक्षीपुराव्या शिवाय, कुठल्याही चौकशीशिवाय गौरी लंकेश ह्यांचा खून हिंदुत्ववाद्यांनीच केला असे छातीठोकपणे सांगत आहेत. पुराव्याची ह्यांना गरजच नाही. 

 

 

खरे तर हे गौरी लंकेश प्रकरण वाटते तितके सोपे नाही. मंगळवारी रात्री आठ वाजता गौरी लंकेश ह्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच दिवशी रात्री बंगळूरमध्ये अक्षरशः तासाभराच्या आत निषेध सभा आयोजित केली गेली. त्यासाठी लोकांना इतक्या कमी वेळात कसं गोळा केलं गेलं? बुधवारी देशभर डाव्या संघटनांनी निषेध सभा आयोजित केल्या गेल्या, तेव्हा अत्यंत कलात्मक रित्या डिझाईन केलेले प्रोफेशनल पोस्टर्स लोकांच्या हातात होते. तसलं एक पोस्टर तयार करायला एका प्रोफेशनल एड एजन्सीला दोन - तीन दिवस लागतात. मग इतक्या कमी वेळात ही पोस्टर्स छापून कशी तयार होती? त्याचे पैसे कोणी दिले? कर्नाटकाच्या काँग्रेस सरकारने गौरी लंकेश ह्यांच्या मृतदेहावर पूर्ण सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार केला. नक्षलवादी हिंसेला उघड समर्थन देणाऱ्या, जेएनयू मधल्या आझादी गॅंगची जाहीर कौतुके करणाऱ्या, कारावासाची शिक्षा झालेल्या पण जामिनावर बाहेर असलेल्या गौरी लंकेश ह्यांच्यासारख्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार पूर्ण सरकारी इतमामाने होण्यासारखे त्यांनी नक्की काय कर्तृत्व गाजवले होते? 

 

 

गौरी लंकेश ह्यांचा खून झाला हे अत्यंत वाईट झाले, पण त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जे पोस्टर्स लावले गेले होते ते पोस्टर्स कारितास ह्या ख्रिस्ती संस्थेने पुरस्कृत केले होते. अंत्यसंस्काराचे असे इव्हेंट कधीपासून व्हायला लागले? कारितास ही संस्था स्वतःच असे मानते की ती केथॉलिक चर्चला पूरक असे काम करते.



मग ह्या संस्थेचे गौरी लंकेश ह्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी नक्की काय काम होते ? २०१३ पासून आत्तापर्यंत देशाच्या विविध भागात २२ पत्रकारांचे खून झाले. त्यातले २१ पत्रकार भारतीय भाषांमधून लिहीत होते, फक्त एकट्या गौरी लंकेश इंग्रजीमधून लिहीत होत्या.



इतके पत्रकार मारले गेले पण मीडियामधल्या कुणीही आजवर हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला आहे हो म्हणून भावनांचे उमाळे काढले नव्हते. पण गौरी लंकेशच्या खुनानंतर मीडियामधल्या तथाकथित पुरोगामी लोकांना एकदम जाग कशी काय आली? ऑल इंडिया कॆथॉलिक बिशप कॉन्फरन्स ही ख्रिस्ती लोकांची पूर्णपणे धार्मिक स्वरूपाची संस्था. ह्या संस्थेने आजवर कधी कुठल्या पत्रकाराच्या खुनाची दखल घेतली नाही, पण आता मात्र ह्या संस्थेने गौरी लंकेश ह्यांच्या खुनाच्या निषेधात जाहीर पत्रक काढलंय ज्यात त्यांचा अजेंडा साफ दिसून येतो. ह्या ख्रिस्ती संस्थेचा आणि कारितासचा गौरी लंकेश ह्यांच्या खुनात एव्हढा रस घ्यायचा हेतू काय? 

 

गौरी लंकेश ह्यांच्या मृत्यू होण्यापूर्वीचे त्यांचे शेवटचे ट्विट वाचले तर असं दिसतं की त्या त्यांच्याच विचारसरणीच्या म्हणजे डाव्या विचारांच्या लोकांच्या आपसातल्या भांडणामुळे त्रस्त होत्या.


त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीचे म्हणणे आहे की त्या सिद्दरामैया सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल चौकशी करत होत्या म्हणून त्यांना संपवण्यात आलं.

त्यांचा सख्खा भाऊ म्हणतो की त्यांच्या खुनामागे नक्षल अतिरेक्यांचा हात असू शकतो. पोलिस अधिक चौकशीशिवाय काहीही बोलायला तयार नाहीत मग तथाकथित पुरोगामी लोकांना ह्या प्रकरणाचा निकाल लावण्याचा हक्क कुणी दिला? गौरी लंकेश ह्यांच्या खुनामागचं खरं कारण आज ना उद्या उजेडात येईलच. पण ह्या खुनावरून जे घाणेरडे राजकारण खेळलं जातंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. 

 

- शेफाली वैद्य 

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121