दसरा दिवाळी आणि पर्यावरण रक्षणाची दांभिकता

Total Views | 185


दसरा दिवाळी आली की अलीकडे पर्यावरण प्रेमाच भरती येत सगळीकडे. पेपरमध्ये मोठ मोठे लेख येतात. whats app, Facebook वर तर धुमाकुळच चालू होतो. मग आपट्याची पान, फटाके, धूर, ध्वनी एवढेच शब्द दिसायला लागतात. जोडीला गेल्या वर्षीची आकडेवारी, फोटो, गेला बाजार जखमी कुत्रे वगैरे सगळ येत शिस्तीत, ठरवून दिल्या सारख. गणपती नुकतेच गेलेले असतात. त्यावेळी गरम झालेला पर्यावरण रक्षणाचा फुगा मग आकाशात उंच उडायला लागतो. यांना ‘दसरा दिवाळी पर्यावरण रक्षक’ अस नाव द्याव वाटत मला.


औद्योगिक विकास नीती स्वीकारून आता ७० वर्षे होत आली आहेत. सरकार कुणाच पण असो विकासाच्या मूळ विचारात फार बदल झाला नाहीये. त्यातून एक सुबत्ता तयार झालीय त्याच चित्र मुंबई, पुण्यात दिसत. पण दुसऱ्या बाजूला जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मूलभूत गोष्टी प्रदुषित झाल्या आहेत.

 

हे सगळ प्रदूषण कश्यामुळे होतय ? सगळीकडे पाणी प्रदूषण मुख्यतः नागरी वस्तीतील सांडपाणी जसेच्या तसे नद्यात सोडल्यामुळे होत आहे. हवा प्रदूषणाचे मुख्य स्त्रोत आहेत वाहने, कचरा जाळणे (शेतात, शहरात), अति प्रमाणात रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापराने माती खराब होतीय. पृथ्वीच्या पोटात खोल जाऊन पाणी उपसताना त्यातले क्षार पण वर येऊन सगळी जमीन ‘क्षारपड’ बनवत आहेत. आणि रक्षणाच्या नावाखाली सरकार आणि काही संस्था सोडल्या तर इतरांचे प्रयत्न काय आहेत तर म्हणे रंगपंचमीला पाणी कमी खेळा, दसऱ्याला सोने वाटू नका, दिवाळीला फटाके उडवू नका. वर्षभर प्रत्येक गोष्टीत भरमसाठ प्रदूषण करणारे हे सांगायला मात्र सगळ्यात पुढे असतात.



देशातील स्थिती

- गेल्या ३० वर्षात १४००० वर्ग किमी एवढ जंगल खाणी, धरणे, औद्योगिक वसाहती यापायी नष्ट झाल आहे.
- देशातील प्रत्येक नदी आज प्रदूषणाच्या सर्वोच्च पातळीच्या आस आस आहे.
- हवा प्रदुषणामुळे निर्माण झालेले वेगवेगळे श्वसनाचे आजार वाढतच आहे. काही शहरे बंद ठेवावी लागत आहेत.

दसरा दिवाळीलाच सल्ले देणाऱ्यांच एक म्हणण असते की किमान एवढ करू. पण अश्या १-२ गोष्टीवर आरडाओरडा झाला की पूर्ण वर्षभर काय करायचं यांवर मात्र हे गप बसतात. पर्यावरण रक्षणाच्या गोष्टी वर्षभर किंवा जीवनव्रत म्हणून करणारे किती आहेत ? वाहतूक सुरळीत होण्यासाठी BRT सारख्या सार्वजनिक प्रकल्पांच्या नावाने बोट मोडणारे किती तरी असतात या स्वतः ला रक्षणकर्ते म्हणविणार्‍यात. आणि विरोध का तर यांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना उशीर होतो म्हणून.

पुण्यासारख्या शहरात दरडोई दरदिवशी १०० लिटर पाणी मिळत. सरासरी माणसांच घर ५०० लिटर पाणी वापरतात. यातलं जवळजवळ ८०% म्हणजे ५०० लिटर पाणी रोज ‘सांडपाणी’ बनत. आता या वापराच प्रमाण कमी करण्याच प्रयत्न करणारे किती आहेत? अगदी ५-१० % जरी कमी करू शकलो तरी केवढ पाणी वाचेल. पण आपल्याला फक्त रंगपंचमीच्या दिवशीच पाणी वाचवा आठवत का ? त्या दिवशी घरातल २०% पाणी तरी ‘उधळतात’ का मुल ? तरी ओरड त्यांचीच होते, का ?


आपट्याच्या पानाचं ओरबाडण चुकीचच आहे. पण रोज होणाऱ्या गोष्टी कडे मात्र दुर्लक्ष करतो आपण. वर्षभर कोणत्याही कार्यक्रमाला मोठे मोठे फुलांचे गुच्छ मात्र विनासायास देतात. या पुष्प गुच्छात सह्याद्रीच्या जंगलात सापडणाऱ्या एका ‘पाम’ जातीच्या वृक्षाची पान, झावळ्या वापरतात. त्यासाठी हजारो झाडे तोडली जातात दरवर्षी. कधी लक्षात तरी आली का ही गोष्ट आपल्याला? याच ‘दसरा दिवाळी पर्यावरण रक्षकांनी’ कास च्या पठाराची काय अवस्था केलीय हे बघतोच आपण टी व्ही वर.


पुण्यातील टेकडी वाचवा मोहिमेत एक जेष्ठ कार्यकर्ते आघाडीवर होते. त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. तर महाशयांचा बंगला टेकडी सपाट करूनच बनवला होता. असच एकदा United Nation मध्ये काम करणाऱ्या पर्यावरण शास्त्रज्ञाच्या घरी जाण्याचा योग आला. पर्यावरणाला हानिकारक रसायने कमी करण्यासाठी हे गृहस्थ जगभर फिरत होते. मात्र त्यांच्या घरात अश्या रासायनिक पदार्थ आधारित सौंदर्यप्रसाधनांची रेलचेल होती . पर्यावरण रक्षणाच्या कामाला असे नेतृत्व मिळणार असेल तर कोण ऐकेल यांच ?


पर्यावरण रक्षण व्हाव वाटत असेल तर प्रत्येकाला त्यासाठी काम कराव लागेल. एका बाजूला सरकारी नीती नियम करण्यासाठी दबाव आणावा लागेल तर दुसरीकडे आपल रोजच आयुष्य जास्तीत जास्त पर्यावरण पूरक बनवाव लागेल. यासाठी भरपूर काही करता येण्यासारख आहे.


⦁ घरातील पाणी वापरावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणे ,
⦁ सौर उर्जाचा वापर करण्यासाठी ज्या नवीन यंत्रणा आहेत त्या घरोघरी बसविणे ,
⦁ ओला कचरा घरातच जिरवणे ,
⦁ सार्वजनिक वाहतुकीचा वापर मुद्दाम करणे (कितीही त्रास झाला तरी )
⦁ वातानुकुल यंत्रांचा वापर टाळणे / कमी करणे ,

अस बरच काही करता येण शक्य आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील तितकी लोक हे करत पण आहेत. ज्या पुण्यातली वरची उदाहरणे आहेत त्याच पुण्यात ‘जीवित नदी’ सारखे उपक्रम पण सुरु आहेत. इथूनच स्मृती वन सारखी कल्पना भारतभर गेली, रुजली. पण हे पुरेस नाहीये. काही बदल व्हायचा असेल तर वरच सगळ आणि अजून बरच सगळ्यांना, नियमित, काटेकोर पणे करावे लागेल. एखाद्या व्रतासारख त्याला स्वीकाराव लागेल.


‘संघ शक्ती कलियुगे’ अस म्हटलंय. म्हणजे कलीयुगात आपले प्रश्न सोडविण्यासाठी कोणी अवतार घेणार नाहीये. तर आपल्यालाच एकत्र येऊन सांघिक शक्तीचा अवतार दाखवावा लागेल. पं. दीनदयाळ उपाध्यांनी आपल्या ‘एकात्म मानवतावादाच्या’ संकल्पनेत ‘समाजाला स्वतःच्या उदाहरणातून सरकारला दिशा दाखवून काम करायला लावणे’ या विचाराचा पुरस्कार केला आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपल्याला हा विचार आणि त्या सुसंगत आचार स्वीकारावा लागेल.


जो पर्यंत आपण हे करत नाही, तोपर्यंत दसरा दिवाळीलाच फक्त जाग होणार आपल पर्यावरण प्रेम हे त्या ATM सारख आहे, जिथे 2 AC आणि ४ दिवे २४ तास चालू असताना ATM मशीन सांगते ‘पर्यावरण रक्षणासाठी रिसीट प्रिंट करू नका’.

 

- कपिल सहस्त्रबुध्दे

कपिल रमेश सहस्रबुद्धे

कपिल सहस्रबुद्धे यांचे पर्यावरण शास्त्र पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. तसेच पत्रकारीतेचा डिप्लोमादेखील त्यांनी केला आहे. ते धारणाक्षम विकास विषयाचे अध्ययन करतात. त्याचप्रमाणे योजक संस्थेच्या माध्यमातून भारतीय विकास चिंतनाचा प्रसार करणे व त्यासाठी स्वयंसेवी संस्थांबरोबर एकत्रित कार्यक्रम राबविण्यामधे त्यांचा सहभाग असतो.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121