मेधाकाकू : अवंती... आता नवरात्र संपन्न झाल की. आणि उद्या दसरा. मग गोडाचा काय बेत काय केलाय आजी+आईने उद्यासाठी...?
अवंती : मेधाकाकू.. अगं खरंच नाही माहीत मला. मी आहे अभ्यासाच्या नादात. आता तुझ्या अभ्यासात आज काय शिजणारे त्याची उत्सुकता आहे...!!
मेधाकाकू : आज काही खास शिजणार असे नाही. मात्र सजणार आहे असे नक्की म्हणूया...!! सजणार आहे म्हणजे असे की, वस्त्र-परिधान याच्या गमती-जमती सांगून आज मी, म्हणी आणि वाकप्रचारांच्या माध्यमातून झालेले, प्राथमिक गरजांचे अर्थनिरुपण पूर्ण करणार आहे. गेल्या काही महिन्याच्या अभ्यासात आपण प्रेम, संताप, मोह, लोभी वृत्ती, लालसा, तिरस्कार, अनादर, अपमान, पूर्वग्रह, कृतज्ञता, कृतघ्नता अशा अनेक मानवी धारणा-भावना-स्वभावधर्म यांचे या लोकश्रुतींमधे झालेले उल्लेख पहिले. या निव्वळ वस्त्र-परीधानांचा वापर करणाऱ्या आपल्या समाजातील स्त्री-पुरुषांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आपल्या चाणाक्ष पूर्वजांनी किती सूक्ष्म निरीक्षणाने मांडलाय ते आता बघ.
नाकापर्यंत पदर वेशीपर्यंत नजर
या वाकप्रचारातील ही गृहिणी, प्रथेप्रमाणे डोक्यावरून पदर घेऊन लज्जा भावनेने तो उजव्या हाताने नाकापर्यंत ओढून घेऊन, खालील नजरेने घरात वावरत असते. ती सतत घरकामात व्यस्त आहे, सहसा घराच्या उंबरठ्यापलीकडे तीचा प्रवास होत नसवा. तरीही तिची चाणाक्ष – व्यवहारी वृत्ती आणि निरीक्षण यामुळे घरातील गोष्टींबरोबरच गावांत काय घडते आहे याची जाणीव सुद्धा तिला असते. तिची तीक्ष्ण नजर, गावाच्या वेशीपर्यंत असते असे म्हणणे म्हणजे अशा गृहिणींच्या विवेक-चातुर्य-बुद्धिमत्तेचा केलेला गौरव आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
अवंती : मेधाकाकू... आता प्रत्येक वेळेला मी फक्त चकीत होऊन तुझ्याकडे बघणार आहे, यापलीकडे मी काही करू शकत नाहीये...!!
मेधाकाकू : आता असाच एक अतीउत्साही गृहस्थ कसा पकडलाय बघ या वाकप्रचारात...!!...
आपले पागोटे काखेत मारून मग दुसऱ्यास हात घालावा
मेधाकाकू : आता या पागोट्यातली गंम्मत अशी की, हे पागोटे खूप मोठे असे आणि ते बांधायला काही वार कापड लागत असे आणि त्याला फार वेळ लागत असे. पागोटे काखेत मारणे म्हणजे ते काही काळ सांभाळणे. डोक्यावर घातलेले पागोटे, जोराच्या धक्क्याने खाली पडत असे. असे दुसऱ्याचे पडलेले पागोटे पकडण्यासाठी घाई करू नये, प्रथम स्वत: च्या डोक्यावरचे सांभाळावे. थोडक्यात, आपल्या पागोट्यासारखेच आपले व्यवहार योग्य रीतीने हाताळावे, दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नये असा सुज्ञ सल्ला या अती उत्साही नागरिकाला या वाकप्रचारात दिलेला दिसतो.
अवंती : अरेच्या काकू... किती मस्त तुलना केलीये बघ या पागोट्याची, माणसांच्या सहज प्रवृत्तीशी...!! हे फार चातुर्याचे काम आहे, आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले.
मेधाकाकू : अवंती... तुला माहित असेलच की त्या काळांत, अंगडे, बडी किंवा अंगरखा, खांद्यावर घोंगड्याची घडी, कमरेला धोतर आणि पायात वहाणा असा वेष, पुरुषांचे परिधान असे. आता हा वाकप्रचार बघूया काय सल्ला देतोय.
अंगडयाला सोडून घोंगड्याला धरणार
मेधाकाकू : अवंती... प्रत्यक्षात हा सल्ला नाहीये, प्रत्यक्षात एका बावळ्या शेतकऱ्याच्या मूर्खपणाचे वर्णन आहे. कसे ते बघ... या शेतकऱ्याने, बाहेर गावातून आलेल्या एका अनोळखी व्यापाऱ्याला त्याचे खूप सारे धन्य विकलेले असते, त्याचे पैसे येणे बाकी असते. बरेच दिवस गायब झालेला हा व्यापारी, बाजारात फिरताना अचानक शेतकऱ्याला दिसतो. हा बावरलेला शेतकरी धावत जाऊन व्यापाऱ्याच्या घोंगड्याला धरतो. मात्र हाच त्याचा मूर्खपणा ठरतो, कारण एक हिसका देऊन तो व्यापारी खांद्यावरचे घोंगडे झटकून टाकतो आणि पळून जातो. अंगात घातलेल्या अंगरख्याला धरले असते तर शेतकऱ्याच्या मजबूत हातातून व्यापारी निसटू शकला नसता. अशाच एखाद्या प्रसंगावरून हा वाकप्रचार प्रचलित झाला असावा. यात मिळणारा धडा असा की, आपल्या जीवनात घडणाऱ्या कुठल्याही परिस्थितीवर जाणीवपूर्वक मजबूत पकड असावी अन्यथा समोरून चालत आलेली संधी हातातून निसटू शकते.
अवंती : मेधाकाकू, आता हा व्यापारी निसटला हे नक्की पण कोणा हुशार व्यक्तीचे वर्णन नाही ऐकले आज...!!
मेधाकाकू : तथास्तु.. अवंती. हा बघ रसिक-सत्शील घरधनी कसा ओळखला जात असे...!!
धनी फाकडा नथीचा आकडा.
मेधाकाकू : या वाकप्रचारात नथीचे रूपक किती चपखल वापरलाय बघ. स्त्री चा नथ हा दागिना आपल्याला प्रथम नजरेत भरतो. मोठी नथ म्हणजे घरधनी फाकडा. बायकोच्या दागिन्यांनी ओळखला जाणारा हा फाकडा म्हणजे तालेवार, धनवान नवरा, कौतुकाने आपल्या बायकोला दागिन्यांनी नटवत असे म्हणून हा वाकप्रचार प्रचलित झाला असावा.. आता तुलाही समाधान होईल की परिधान-अलंकारांनी माणसातील फक्त अवगुणच दिसले नाहीत तर त्याचा अभिमान सुद्धा यातून स्पष्ट झाला. आता आपला अभ्यासाचा विषय बदलणार आहे, तेंव्हा तू तयार राहा पुढच्या आठवड्यातील नव्या लोकश्रुतीसाठी. विजया दशमीच्या तुला आणि आजी+आई+बाबा सर्वाना अनेकानेक शुभेच्छा...!!
- अरुण फडके