वाल्मिकी रामायण केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि राम नुसताच प्रसिद्ध नाही तर अतिशय लाडका आहे! हृदयस्थ प्रभू आहे!
थायलंडचे राजे स्वत:ला रामाचे वंशज म्हणवत. त्यांची जुनी राजधानी होती – आयुथ्या. रामाची अयोध्या! तर त्यांचा राष्ट्रीय ग्रंथ आहे – रामाकीअन (Ramakien), अर्थात रामायण. ब्रह्मदेश, बर्मा आणि आताचा म्यानमार - इथे रामायणाला “यामायाना” म्हणतात. रामाला “याम” आणि सीतेला “मी थिदा” म्हणतात. कॅम्बोडिया मध्ये “रामकेर्ती” म्हणजे रामकीर्ती या नावाने रामायण ओळखले जाते. “हिकायत सेरी राम” हे मलेशिया मधील रामायण. चीन मध्ये बौद्ध ग्रंथात रामकथा आहे. जपान मध्ये “रामाएन्षु” नावाचे रामायण आहे. फिलिपाईन मध्ये “महारादिया लवना”. तर, लाओस मध्ये “फ्रा लक फ्रा लाम” (लक्ष्मण आणि राम) या नावाचे रामायण आहे. “लाओस” चा अर्थ सुद्धा “रामपुत्र लवची नगरी” असा सांगतात.
दक्षिण कोरीया मध्ये पहिल्या शतकातील राणी सुरो ही अयोध्येची राजकन्या होती. त्यामुळे येथील अनेक लोक स्वत:ला अयोध्येच्या रामाचे वंशज समजतात. दर वर्षी हजारो कोरियन अयोध्येमधील राणी सुरोच्या स्मारकाला भेट द्यायला येतात.
तामिळनाडू मधील व्यापारी या सर्व देशांशी व्यापार करत असत. त्यांच्या बरोबर भारतीय संस्कृती इथे आली आणि रुजली. यातील काही देशात बौद्ध धर्माचा प्रचार झाला, त्यांच्या बरोबर सुद्धा भारतीय देवता इथे पोचल्या. साधारण पहिल्या शतकात इथे भारतीय देवता पोचल्या होत्या. या देशांमध्ये वैदिक शाळा होत्या, आणि फार मोठी आणि सुंदर मंदिरे बांधली गेली. कॅम्बोडीयाचे सर्वात मोठे हिंदू मंदिर “अंकोर वट”, हे येथील शेकडो मंदिरांपैकी एक.
या देशातील लोकांचे रामावरचे प्रेम त्यांच्या मंदिरातून, शिल्पातून, रामलीलेमधून आणि टपाल तिकीटा मधूनही दिसते. आपल्याकडे रामाची तिकिटे आत्ता आली, पण या देशांमध्ये रामाचे चित्र असलेली तिकिटे ४० – ५० वर्षांपूर्वीपासून दिसतात! त्यामध्ये राम, सीता, राम - लक्ष्मण, लव - कुश, हनुमान, जटायू, राम - सुवर्णमृग आदि दिसतात.
थायलंड, मॉरिशस्, कॅम्बोडिया, लाओस, इंडोनेशिया, फिजी, म्यानमार, विएतनाम या सर्व देशांमध्ये रामकथा अथवा रामलीला सादर केली जाते. याला “रामायण बॅले” देखील म्हणतात. या बॅले मधून – रामजन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत रामकथा सादर केली जाते. अतिशय भव्य देखावे, सुंदर समूह नृत्य, देखणे पोशाख, हृदयस्पर्शी अभिनय, यामधून राम कथा फुलत जाते. लंका दहन, राम सेतू बांधणी, राम रावण युद्ध सारखे प्रचंड देखावे अतिशय कल्पकपणे रंगमंचावर उभे केले जातात.
भारताच्या पश्चिमेला सुद्धा रामायणाचा प्रभाव दिसतो. मात्र पूर्वेच्या लोकांनी जसा त्यांचा ठेवा जपला, तसा इथे दिसत नाही. इथे फक्त रामभक्तीच्या खुणा दिसतात.
गांधार प्रांतात – भरताचा पुत्र पुष्करने पुष्कलावती (पेशावर) आणि तक्षने तक्षशीला (Taxila) या नगरी वसवल्या होत्या, तर रामपुत्र लवने – लवपूर (लाहोर) वसवले होते असे मानले जाते.
इराणच्या पलीकडे कुर्दिस्तान (उत्तर इराक) मध्ये एक राम आणि हनुमानाचे पहाडात कोरलेले चित्र सापडले आहे. यथील प्राचीन सुमेरियन राजांची नावे – रिमसिन, वरदसिन अशी दिसतात. “सिन” म्हणजे चंद्र असल्याने, ही नावे – रामचंद्र, भरतचंद्र अशी वाचता येतात.
इराणच्या पलीकडे रोम मध्ये इस. पूर्व पहिल्या – दुसऱ्या शतकातील रामायणातील चित्रे वाटावीत अशी अनेक चित्रे घरातील भिंतींवर आढळली आहेत. एका चित्रात राम, सीता, लक्षमण अरण्यात जात आहेत, एका चित्रात राम यज्ञीय अग्नी मध्ये काही आहुती देत आहे, एका चित्रात दशरथाच्या तीन भार्या दिसत आहेत, आणि एका चित्रात राम सीतेला पुष्पक विमानातून म्हणजे पंख लावून उडत घेऊन येत आहे असे वाटते.
रोमचे रामाशी आणखी एक नाते सांगितले जाते ते असे आहे की - रोम शहर हे दोन भावांनी – रोमस् (राम?) आणि रोम्युलस (धाकटा राम?) यांनी २१ एप्रिल ७१२ BCE मध्ये वसवले. त्यावेळी वापरत असलेल्या इजिप्तच्या चांद्र कॅलेंडर प्रमाणे हा दिवस होता – फारामौथी महिन्यातील अमावास्येनंतरचा ९ वा दिवस. (चैत्र नवमी? १९८३ मध्ये २१ एप्रिलला रामनवमी आली होती, त्यामुळे २१ एप्रिल ला रामनवमी असणे शक्य आहे.) येथील चित्रांचा तसेच रोमच्या प्राचीन इतिहासाचा रामायणाच्या दृष्टीने संशोधन आवश्यक आहे.
जगभर पसरलेल्या रामकथेला एकत्र आणण्यासाठी २०१६ मध्ये, जबलपूर येथे World Ramayana Conference आयोजित करण्यात आली होती. पुढची Conference बंगळूरू मध्ये २७ - २९ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या conference साठी देशोदेशीचे रामायण अभ्यासक यणार आहेत. Conference चा उद्देश – रामायणाचा कौटुंबिक जीवनावरील परिणाम, रामायणातील मानवी मुल्ये, रामायणामधून समाजाचे प्रबोधन, रामायण आधारित साहित्य व कला, रामायण टुरिझम साठी प्रोत्साहन आदि विषयांच्या अभ्यासाचा समावेश आहे.
ज्यांनी ज्यांनी रामाचा ध्यास घेतला, रामाचे ध्यान केले, त्यांना राम मिळाला! मग ते इंडोनेशिया मधले रामभक्त असोत किंवा कॅम्बोडिया मधले! युरोप पासून जपान पर्यंत वसणाऱ्या सर्व राम प्रेमींना, दसऱ्याच्या अनेक अनेक शुभेच्छा!
- दिपाली पाटवदकर