’अक्षर मानव’ या राजन खान यांच्या संस्थेच्या फलकाला धर्मांधांनी काल काळे फासले, त्यांच्या सिनेमाच्या पोस्टर्सवर शाई फेकण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव जोरजोरात घेऊन स्वत:चे पुरोगामित्व सिद्ध करण्याचा डाव मांडणार्यांच्या शहरात हे घडत आहे. पाखंडी पुरोगाम्यांचे याविषयीचे मौन समजण्यासारखे आहेच, कारण यावेळी विषय आहे ’तीन तलाक’चा. मात्र, स्वत:ला मुख्य माध्यमे म्हणविणार्या माध्यमांनीदेखील या विषयावर आवश्यक ते सडेतोड भाष्य केलेले नाही. अग्रलेख लिहिले गेलेले नाहीत. मुलाखती घेतल्या गेलेल्या नाहीत, वृत्तवाहिन्यांवर जोरजोराने केल्या जाणार्या चर्चा होताना दिसत नाहीत. एरव्ही ज्यांना विद्रोही कवितांचे पान्हे फुटतात ते कवी-कवयित्रीसुद्धा शहामृगाच्या वरताण निघाले आहेत.
महाराष्ट्रातील पुरोगामी विषयांवर भाष्य करणार्या भेदक कथा लिहिणारे कथाकार राजन खान यांची धिंड काढण्याची संधी काही लोक शोधताहेत. राजन खान यांचा दोष इतकाच की, त्यांनी ’हलाल’ नावाच्या सिनेमाची पटकथा लिहिली. इस्लाममधल्या ’तिहेरी तलाक’ या अमानवी प्रथेविरोधात भाष्य करणारा हा सिनेमा आहे. पटकथा फार जुनी आहे, पण तिचा सिनेमा आज झाल्याने व इस्लामच्या रक्षणाचा ठेका घेतलेल्यांना तो आज समजल्याने ते राजन खान यांच्या मागे लागले आहेत. ’अक्षर मानव’ या राजन खान यांच्या संस्थेच्या फलकाला धर्मांधांनी काल काळे फासले. त्यांच्या सिनेमाच्या पोस्टर्सवर शाई फेकण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव जोरजोरात घेऊन स्वत:चे पुरोगामित्व सिद्ध करण्याचा डाव मांडणार्यांच्या शहरात हे घडत आहे. पाखंडी पुरोगाम्यांचे याविषयीचे मौन समजण्यासारखे आहेच, कारण यावेळी विषय आहे ‘तिहेरी तलाक’चा. मात्र, स्वत:ला मुख्य माध्यमे म्हणून म्हणविणार्या माध्यमांनीदेखील या विषयावर आवश्यक ते सडेतोड भाष्य केलेले नाही. अग्रलेख लिहिले गेलेले नाहीत. मुलाखती घेतल्या गेलेल्या नाहीत, वृत्तवाहिन्यांवर जोरजोराने केल्या जाणार्या चर्चाही होताना दिसत नाहीत. एरव्ही ज्यांना विद्रोही कवितांचे पान्हे फुटतात, ते कवी-कवयित्रीसुद्धा शहामृगाच्या वरताण निघाले आहेत. किंबहुना, ते फक्त मोदीद्वेषासाठीच पाझरायला लागत असावेत. कायदा-सुव्यवस्था नीट राहायची असेल तर आम्हाला योग्य न वाटणारे दृश्यप्रसंग कापले पाहिजे, अशी सरळसरळ धमकीच दिली जात आहे. नाटक, सिनेमा, पुस्तके, लेख, पत्रकारिता ही सगळी कला शाखेचीच अंगे आहेत. कुणी कितीही काहीही म्हटले तरी कला शाखा ही सामाजिक व राजकीयच आहे. कलांमधली अभिव्यक्ती ही त्यावेळच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारीच असते. काही वेळा ती प्रत्यक्ष असते, तर काही वेळा अप्रत्यक्ष. भारतात लेणी साकारणार्या कलाकारांनी मानवी मूर्त्या साकारताना कमालीचे स्वातंत्र्य घेतल्याचे दिसते. हे स्वातंत्र्य त्यावेळच्या मोकळेपणाचेच प्रतीक आहे. ‘नग्नता’ म्हणून त्यावेळी गदारोळ माजविला गेला असता, तर आज जागतिक वारसा म्हणून भारताकडून मिरविली जाणारी शिल्पे जगाला दाखविता आलीच नसती.
कला व प्रचारतंत्र (प्रॉपगँडा) यांचा परस्परांशी संबंध काय? यावर पाश्चात्त्य जगतात वारंवार चर्चा घडत असते. एखाद्या व्यक्तीचा कलाविष्कार दुसर्या व्यक्तीच्या प्रचारतंत्रांचा भाग बनते. २०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीत लेखन, वृत्तवाहिन्यांवरील सादरीकरण, व्यंगचित्रे यांचा उपयोग मोदींच्या विरोधात पुरेपूर केला गेला. कॉंग्रेसप्रणित शासनात अशा प्रकारच्या कलांना आणि अभिव्यक्तीकारांना पुरेपूर मोकळीक दिली गेली. संस्था उभ्या केल्या गेल्या. निरनिराळ्या शिष्यवृत्त्या निर्माण केल्या गेल्या. दोन देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याच्या निमित्ताने अनेकांना अशा परदेशयात्राही घडल्या. यातून कलाजीवन समृद्ध झालेच, पण एका विशिष्ट राजकीय पक्षाची तळी उचलणार्या कलाकारांची फळीच निर्माण झाली. त्यांची विचारसरणी डावी असेल, मात्र राजकीय पर्याय म्हणून त्यांनी कॉंग्रेसलाच स्वीकारले. कॉंग्रेसनेही ‘सत्ता आमची, सांस्कृतिक व कलेची क्षेत्रं तुमची’ अशी फाळणी न बोलता करून टाकली होती. समाजावर पकड असणारी माध्यमे व कला क्षेत्रातली मंडळी देशात राजकीय बदलांची स्थिती आली किंवा तत्समपरिस्थिती उद्भवली की सरळ डावे-उजवे असा भेद करून उजव्यांना असहिष्णू ठरविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. रामजन्मभूमीचा मुद्दा धार्मिकतेपेक्षा मुस्लीमलांगूलचालनाचाच अधिक होता. वस्तुत: शाहबानो प्रकरणापासूनच त्याची सुरुवात झाली होती. राजाश्रयावर जगणार्या आपल्या कलाकारांनी आणि अभिव्यक्तीचा ठेका घेतलेल्यांनी त्यांच्या कळत नकळत हा मुद्दा ‘एक विरुद्ध दुसरा धर्म’ असाच केला. मुस्लीम लांगूलचालनाचा विरोध करणार्यांना पद्धतशीरपणे कलात्मकरित्या धर्मवेडे ठरविले गेले आणि इस्लाममधल्या धर्मांधांशी त्याची तुलना केली गेली. ‘एक विरुद्ध दुसरा’ असा रंगवायला सहजसोपा सामना इथे रंगविला गेला. ‘रामके नामपर’ सारख्या माहितीपटाचे ताबूत मग जगभर नाचविले गेले आणि त्यातून असहिष्णू भारताची प्रतिमा रंगविली गेली. कलात्मक आविष्कारातून प्रचारतंत्राचा अवलंब करण्याच्या पद्धतशीर मांडणीचा सर्वात मोठा बळी या देशातली हिंदुत्ववादी चळवळ ठरली आहे. त्याकाळच्या राजकीय मातब्बर मंडळींनी या पद्धतीचा पुरेपूर वापर करून घेतला आणि सत्तेच्या पायाचे खांब मजबूत करून घेतले.
आपल्याला न पटलेल्या गोष्टींवर बंदी घालण्याची मागणी करणारा गट उजव्यांमध्येही आहे. न पटलेल्या गोष्टी नष्ट करण्याची सेमेटीक विचार परंपरेची पद्धतच यशस्वी होऊ शकते, हे पाहिल्यावर अशांना चेव येतो. आद्य शंकराचार्यांनी ठिकठिकाणी केलेले शास्त्रार्थ आपल्या सहिष्णू परंपरेचे द्योतक आहेत. न पटलेल्या विचारांवर बंदी यावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत; या उलट कसदार तर्क सादर केले, ते विवेकाच्या ऐरणीवर कसून घेतले आणि त्यालाच वाद घालणारे शरण आले. शंकराचार्यांची विजयपताका ही अशाप्रकारे फडकली आहे. तिथे विरोधाला विरोध करून विजय मिळालेला नाही. आदिमते कृषी, कृषी ते औद्योगिक आणि औद्योगिक ते नागरी संस्कृतीचे वर्णन आधुनिक मानववंशशास्त्र करते, मात्र त्यात शंकराचार्यांसारखा अभिव्यक्तीकार कुठे बसवता येईल, हे सांगता येणे या शास्त्राला अवघड आहे. काळ बदलला तरी ही मूल्ये शाश्वतच आहेत. या मूल्यांमुळेच या देशाची एकसंघता विविधता असूनही अक्षुण्ण राहिली आहे. ‘युरोपियन रेनेसान्स’नंतर युरोपात जे काही घडले त्याने तिथल्या कला आणि अभिव्यक्ती जीवनावर मोठा परिणामघडवला. चर्चमधले पोप क्षमापत्रांची विक्री करायला लागले तेव्हा मार्टिन ल्यूथर, ’’परमेश्वराशी संबंध जोडायला मला अशा मध्यस्थांची गरज नाही,’’ हे रोखठोकपणे सांगायला लागला. अभिव्यक्ती, त्याचे संप्रेक्षण आणि सामाजिक वर्तन यांचा परस्पर संबंध हा असा आहे.
- किरण शेलार