नवरात्र म्हणजे शक्तीची आराधना. दुष्टांचे निर्दालन आणि सुष्टांच्या विजयाचा उत्सव. यामुळे दुष्टांचे निर्दालन करणाऱ्या रामाचा पण हा विजयोत्सव आहे.
वर्षातून दोन वेळा, समान अंतराने, दोन नवरात्री येतात. एक शारदीय नवरात्र आणि दुसरे वासंतिक नवरात्र. एक शारदानवमी आणि दुसरी रामनवमी. भारतात सर्वत्र रामनवमीला रामायणाचे पठण केले जाते, व रामजन्माचा उत्सव साजरा केला जातो. पण, उत्तर भारतात शारदीय नवरात्रीला सुद्धा “रामलीला” चे प्रयोग सादर केले जातात.
रामलीलाचा प्रयोग सर्वसाधारणपणे १० दिवस चालतो. काशी मधील रामलीला ३१ दिवस चालते. तर अयोध्येमध्ये रोज रामलीलाचे सादरीकरण होत असते. २०१५ मध्ये अयोध्येतील रामलीला सरकारी देणगी अभावी बंद पडली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, योगी आदित्यनाथांनी ती पुन्हा सुरु केली.
रामालीलाचा प्रयोग मोठ्या खुल्या मैदानावर होतो. आधी अनेक दिवस प्रयोगाची तयारी चालते. आणि ठरलेल्या दिवशी, अनेक कलाकार मिळून रामायणातील प्रसंग एका पाठोपाठ एक सादर करतात. काही काही प्रसंगात, प्रेक्षक सुद्धा रामायणातील गाण्यांना कोरस देऊन सादरीकरणात सहभागी होतात. संपूर्ण गाव कैक दिवस राममय होते.
रामजन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग सदर केले जातात. प्रत्येक दिवसाच्या शेवटी, कलाकार आणि प्रेक्षक मिळून रामाची आरती करतात. “बोलो! राजा रामचंद्र की जय!” आणि “राम लक्षमन जानकी, जय बोलो हनुमान की!” च्या गजराने आसमंत दुमदुमून जातो.
रंगमंचावर वेगवेगळे भाग केले जातात – एकीकडे अयोध्या, एकीकडे अशोकवन, एकीकडे रावणाचा महाल, एकीकडे पंचवटी, एकीकडे युद्धभूमी. या सगळ्या सेटमधून कथा सदर होते. सुवर्णमृग, हनुमानाचे लंका-दहन, रामसेतूची बांधणी, कुंभकर्णाची झोप, हनुमानाची झेप, अशोकवनातील सीता, आणि राम - रावण युद्ध अशा प्रसंगातून रामायणाची कथा उमलत जाते. सोबत वाद्यवादन, प्रसंगानुरूप भजन व गायनाने या कार्यक्रमाला बहर येतो. लहानपासून थोरापर्यंत सर्वजण ही कथा पाहतांना, ऐकतांना त्यात तल्लीन होऊन जातात.
दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून रामलीला कार्यक्रमाची समाप्ती होते. भारतात अनेक ठिकाणी रामलीला जरी सादर झाली नाही तरी, दसऱ्याला रावण दहन मात्र होते. रावणाचा दहा तोंडाचा एक मोठा पुतळा तयार केला जातो. त्यामध्ये ज्वालाग्राही पदार्थ व फटाके भरले असतात. रामाचा काम करणारा नट, पेटता बाण रावणाला मारून पेटवतो. राम – रावण युद्धातला शेवटचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो!
रामकथा सादर करण्याची प्रथा फार प्राचीन आहे. सौती, कुशिलव, पुराणिक गावोगावी फिरून ही अवीट कथा ऐकवत असत. मात्र १६ व्या शतकापासून त्याचे स्वरूप अधिक गहरे झाले. त्याची गोष्ट अशी –
१६ व्या शतकात, तेंव्हा दिल्लीच्या तख्तावर अकबर विराजमान होता. त्यावेळी वाराणसी मध्ये गोस्वामी तुलसीदास “रामचरितमानस” लिहित होते. असे म्हणतात की भारतावर अकबरापेक्षा अधिक प्रभाव कुणाचा पडला असेल तर तो तुलसीदासांचा होता! गौतम बुद्ध आणि शंकराचार्य यांच्या सारखे तुलसीदासांचे काम होते.
लहानपणापासून रामनाम घेणारे तुलसीदास, लग्नानंतर रामाला विसरले. एका प्रसंगी त्यांची पत्नी रत्नावलीने त्यांना रामाची आठवण करून दिली. तेंव्हा तुलसीदासांनी गृहत्याग केला व वाराणसीला स्थाईक झाले. त्यांनी वाल्मिकींचे संस्कृत रामायण अवधी भाषेत ‘रामचरितमानस’ या नावाने लिहिले. तुलसीदास रामकथा तर सांगतच असत, पण रामायणातील प्रसंग नाटक रूपात देखील सादर करत. त्यांच्या पासून रामकथा सांगणे व ‘रामलीला’ सादर करण्याची परंपरा सुरु झाली. त्यांचा प्रभाव इतका होता की आज उत्तर प्रदेशमध्ये रामचरितमानस मधील कथा सांगणारा रामकथाकार आणि रामलीला सदर करणारा कलाकार असणे ही दोन उपजिविकेची साधने आहेत!
तुलसीदासांना वाल्मिकींचा अवतार म्हणत. त्यांनी केलेल्या रामाच्या, रामनामाच्या आणि हनुमानाच्या भक्तीच्या प्रचारामुळे अत्यंत कठीण काळात, उत्तर भारतात धर्माची पुन:स्थापना झाली!
तुलसीदासांनी जिथे रामचरितमानस लिहिले, त्या “तुलसी मानस” मंदिरात, २२ सप्टेंबर २०१७ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामायणा मधील प्रसंगांवर आधारित चित्रांच्या तिकिटांचे अनावरण केले. रामाला, वाल्मिकींना आणि तुलसीदासांना वाहिलेली ही आदरांजली आहे!
स्वातंत्र्यपूर्व काळात रामाचे चित्र असलेली नाणी काढली जात असत. शिवाय अनेक मंदिरातून रामायणातील प्रसंगांचे चित्र असलेली नाणी काढली जात असत. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात भारतात प्रथमच रामाचे चित्र दिसत आहे.
- दिपाली पाटवदकर