
एकदा एका अमराठी उद्योजकांच्या संघटनेच्या कार्यालयात जाण्याचा योग आला. त्या संघटनेचे एक पदाधिकारी सांगत होते की, ’’आमच्या समाजात उद्योगाची बीजं लहानपणापासून रोवली जातात. कितीही संकटे आली तरी व्यवसाय चिकाटीने करायचा. कितीही मोठ्या पगाराची नोकरी मिळत असेल आणि कमी मिळकत असेल तरीसुद्धा व्यवसायच करायचा. कारण व्यवसायात तुम्ही स्वत: स्वत:चे मालक असता.’’ पण, आपल्या मराठी माणसांचं जरा उलटं आहे. आपण व्यवसायाची संधी असताना देखील नोकरीच्या मागे धावत असतो. आता मात्र चित्र हळूहळू बदलतंय. विशेषत: मराठी तरुण व्यवसायाकडे वळतोय. पूर्वीच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. मात्र यातील बहुसंख्याक हे सेवा उद्योगक्षेत्राकडेच जात आहेत. उत्पादन क्षेत्राकडे कल असणारे तसे कमीच आहेत. कारण सेवा क्षेत्रापेक्षा उत्पादन क्षेत्रात भांडवल जास्त लागते. उत्पादन तयार होण्यापासून ते अगदी विकण्यापर्यंत मोठी प्रक्रिया असते. यादरम्यान पैसे गुंतून राहतात. खर्या अर्थाने उत्पादन क्षेत्रात मानसिक आणि आर्थिक कस लागतो. भले-भले पुरुष उद्योगक्षेत्राकडे वळत नाही, स्त्रियांचं तर सोडूनच द्या. असं असूनदेखील एक तरुणी नोकरी सोडून स्वत:चा उद्योग उभारते, निव्वळ उभारत नाही तर कोटींची उलाढालसुद्धा करते. ही कथा आहे अशाच एका जिगरबाज तरुणीची. ही कथा आहे माऊली असोसिएट्सच्या उज्ज्वला बाबर-गायकवाड यांची....
सांगली जिल्ह्यातील जत तालुका. एक दुष्काळी भाग म्हणून परिचित आहे. याच तालुक्यामध्ये औंढी या गावी बाबर दाम्पत्याच्या पोटी उज्ज्वलाचा जन्म झाला. उज्ज्वलाचे बाबा रावसाहेब बाबर हे मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीस होते. चौथीपर्यंत ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकल्यानंतर उज्ज्वला मुंबईला आली. भांडुपच्या अहिल्यादेवी विद्यालयात दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं तर अकरावी, बारावीचे शिक्षण भांडुपच्याच व्ही. के. कृष्णा मेनन महाविद्यालयात झाले. कुटुंब मोठे असल्याने परिस्थिती बेताची होती. त्यामुळे दूरशिक्षण पद्धतीने पदवीचं शिक्षण घेणं आवश्यक होतं. कॉलेजमध्ये असताना तिने एका छोट्याशा दवाखान्यात कंपांऊंडरची पार्ट टाईम नोकरी करण्यास सुरुवात केली. पुढे बारावी पूर्ण झाल्यानंतर ती मोहम्मद अली रोडला एका बॉल बेअरिंग्ज तयार करणार्या कंपनीत नोकरीला लागली. मात्र, तेथील वातावरणाशी जुळवून न घेता आल्याने तिने ती नोकरी सोडली. १९९८ मध्ये तिला माटुंग्यामध्ये एका औषधी कंपनीत ऑफिस असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली. तब्बल १२ वर्षे ती त्या औषधी कंपनीत नोकरीला होती. खर्या अर्थाने एखादं ऑफिसचं काम कसं चालतं ? याचे धडे तिने तिथे गिरविले. दरम्यान तिला पॅकेजिंग करणार्या कंपनीमध्ये नोकरीची ऑफर आली. काहीतरी नवीन शिकायला मिळेल म्हणून तिने पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलं. २००१ ते २०१० अशी जवळपास १० वर्षे तिने तिथे नोकरी केली. या ठिकाणी तिला कामाचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. याच दरम्यान उज्ज्वलाने इंडियन मर्चंट चेंबर्समधून एका वर्षाचा इम्पोर्ट ऍण्ड एक्सपोर्टचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. या अभ्यासक्रमामुळे ती आत्मविश्वासाने परदेशी क्लायंटस्ना हाताळू लागली. केनियामध्ये एक अनिवासी भारतीय उद्योजक होता. त्याला काही वस्तूंची आवश्यकता होती. उज्ज्वलाने ग्राहक हा देवासारखा असतो, हे वाक्य लक्षात ठेवले होते. अत्यंत मेहनत करून तिने त्या ग्राहकाची निकड भागविली. त्याला आवश्यक असणारे उत्पादन मिळवून दिले. त्यामुळे त्या अनिवासी भारतीयाचा उज्ज्वलावरील विश्वास वाढला. दरम्यान इतर ग्राहकांनी देखील तशाच उत्पादनांची मागणी नोंदवली. कंपनी मात्र तसे उत्पादन तयार करण्यास राजी नव्हती. ग्राहकांनी उज्ज्वलाला, ’’तू स्वत:च ही उत्पादने तयार करून दे,’’ अशी मागणी केली. मात्र, सदर कंपनीमध्ये राहून अशा प्रकारे व्यवसाय करणे उज्ज्वलाच्या नैतिकतेत बसत नव्हते. शेवटी उज्ज्वलाच्या स्वाभिमानी वृत्तीचा विजय झाला आणि उज्ज्वलाने स्वत:ची उत्पादन तयार करणारी कंपनी सुरू केली, कंपनीचं नाव ठरलं ’माऊली असोसिएट्स.’ ’माऊली असोसिएटस्’ सुरुवातीला फक्त पॅकेजिंग सील उत्पादनांचा व्यापार करत होती. कंपनी सुरू करताना एका ग्राहकाने आगाऊ पैसे दिले होते. हेच होतं ‘माऊली असोसिएट्स’चं भांडवल. २०१२ दरम्यान उज्ज्वलाला १२ लाख रुपयांचा प्रचंड फटका बसला. एखादा दुसरा कोणी असता तर कदाचित त्याने कंपनी बंद केली असती. मात्र, उज्ज्वलाला हरण्याची भीती वाटत नसे. सतत दोन वर्षे चिकाटीने पाठपुरावा केल्यानंतर काही अंशी पैसे परत मिळाले. दरम्यान ती प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन तयार करण्याची छोटी कामे करतच होती. २०१४ साली तिने उत्पादन क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र तिने वळून पाहिलेच नाही. खाद्यतेल, यंत्रासाठी वापरले जाणारे तेल, मद्याच्या बाटल्या यामध्ये ज्या पॅकेजिंग सीलची गरज असते ते तयार करण्याचे काम ‘माऊली असोसिएट्स’ करते. ‘माऊली असोसिएट्स’चे नाहूर आणि विरारला उत्पादन तयार करणारे गाळे आहेत. या गाळ्यांत १७ कामगार काम करतात. मध्य-पूर्व आफ्रिका, युरोपसारख्या परदेशात प्रामुख्याने ‘माऊली’ची उत्पादने निर्यात होतात. अत्यंत खडतर आणि हलाखीच्या परिस्थितीतून येऊन सतत संघर्ष करून कोटींची उलाढाल असलेला व्यवसाय उज्ज्वला बाबर-गायकवाड या समर्थपणे हाताळत आहेत. त्यांच्या या संघर्षात पती उमेश गायकवाड यांची व सासर आणि माहेरच्या मंडळींची साथ देखील मिळत आहे. कधीही, कशाविषयी भीती वाटली नाही. चिकाटी सोडली नाही. परिस्थितीसमोर हार मानली नाही, हेच आपल्या यशाचे गमक आहे, असे उज्ज्वला बाबर-गायकवाड यांना वाटते.
’मेरी झांसी नही दूंगी,’ असं म्हणत इंग्रजांवर तुटून पडणारी झाशीची राणी असो वा विमानातील प्रवाशांना अतिरेक्यांपासून वाचवताना गोळ्या झेलणारी नीरजा भानोत असो, संघर्ष हा स्त्रीचा स्थायीभाव राहिला आहे. हाच स्थायीभाव प्रत्यक्ष उद्योगात वापरून उज्ज्वला यांनी स्वत:ला उद्योगक्षेत्रात सिद्ध केले आहे. खर्या अर्थाने उज्ज्वला बाबर-गायकवाड या उद्योजिका होऊ पाहणार्या तरुणींसाठी एक आदर्श आहेत. किंबहुना, आर्थिकदृष्ट्या सुदृढ समाज घडविण्यासाठी उज्ज्वलासारख्या तरुण उद्योजिकांची देशाला गरज आहे.
- प्रमोद सावंत