नवरात्र हा सण जितका तेजाचा, शौर्याचा, युद्धाचा, विजयाचा आणि शक्तीचा आहे, तितकाच हा सण अतिशय कोमल आणि रंजक आहे. कोमल रूपातली नवरात्र लहान मुलींची, कुमारिकांची पूजा करते. तर रंजक रूपातील नवरात्र गाण्याने व नृत्याने देवीची पूजा करते.
नवरात्रात ९ कुमारिकांचे पूजन करायची पद्धत आहे. शेजार - पाजारच्या लहान मुलींना बोलावले जाते. त्यांना चौरंगावर बसवून, त्यांचे पाय धुतात. डोक्यावर अक्षता टाकून, ओवाळतात. लहानसा गजरा केसात माळतात. नवीन कापड देतात. गोड-धोड जेऊ घालतात. आणि कुमारिकेला नमस्कार करून आशीर्वाद मागतात. अशी पूजा घेऊन आलेल्या मुली इतक्या मजेत घरी येतात! आपण देवीचे रूप आहोत, हे बीज त्यांच्या मनात नक्की कुठेतरी रोवले जात असेल.
महाराष्ट्रात या ९ दिवसात मुली एकमेकींकडे भोंडल्यासाठी जातात. मला आठवते, लहानपणी भोंडल्याला आम्ही मैत्रिणी रोज एकेकीकडे जात असू. फेर धरून गाणी म्हणण्यात भारी मौज वाटे. आणि नंतर खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम! आपली खिरापत ओळखता येऊ नये यासाठी दिवसभर आईच्या मागे भुणभुण केलेली असे. खिरापती पण साध्या असत - पेरूच्या फोडी, श्रीखंडाच्या गोळ्या, फोडणीची पोळी असा लहानसा खाऊ मजेत खाऊन मग मोर्चा घरी. नवरात्रीचे नऊ दिवस रोज असाच कार्यक्रम चाले.
शाळेत पण भोंडला असे. १ ली ते १० वी च्या सगळ्या मुली शेवटच्या तासाला ग्राउंडवर जमत असू. त्या दिवशी 'civil dress' असल्यामुळे लहान मुली छान छान परकर-पोलकं घालून येत असत. १० वी मधल्या मुली मात्र हमखास साडी नेसून यायच्या! शाळेची ती जणू परंपराच होती.
चांगली ७-८ गाणी म्हणून, हसत खेळत हा कार्यक्रम चाले. आणि मग सगळ्याजणी मिळून शाळेची खिरापत ओळखत असू. त्या गोंगाटात आमच्या teachers ना कोण काय बोलतय कसं कळत होतं देवच जाणे! खिरापत ओळखली ओळखली असं कळेपर्यंत मुली अजून कितीतरी नावे सांगत असत! १० वी च्या मुली साडी सांभाळण्यात दंग असल्यामुळे, खिरापत वाटायची जबाबदारी ९ वी च्या मुलींकडे असे.
या भोंडल्यामध्ये खूप मुली असल्यामुळे एक फेर धरता येत नसे. सगळ्याजणी मिळून चार पाच फेर धरत असू. मध्ये एक सुबक लाकडी हत्ती ठेवून त्याला फुले वाहून सुरवात होत असे. त्याच्या भोवती सगळ्यात आतला लहान फेर, पहिलीतल्या छोट्या मुलींचा. आणि बाहेर अजून दोन फेर वरच्या वर्गातल्या मुलींचे. प्रत्येक फेर रंगीबेरंगी मुलींनी सजलेलं! भिरभिर भिरणाऱ्या छोट्या छोट्या परींचं! बागडणाऱ्या फुलपाखरांचं!
आणखी मागच्या काळात, लहान वयात लग्न झालेल्या मुली, भोंडल्याच्या निमित्ताने मनसोक्त सासरला नावे ठेवणारी गाणी म्हणत असत! त्या काळात मन हलकं करायला ते एक outlet होत. आता परिस्तिथी बदललेली असल्याने नवनवी गाणी म्हटली पाहिजेत.
गुजरातमध्ये या नऊ दिवसात गरबा नृत्य रंगते. रोज संध्याकाळी वेगवेगळ्या रूपातील देवीची पूजा केली जाते. मग फेर धरून गरबा नृत्य केले जाते. ४-५ जण असले तरी, किंवा शेकडो लोकं असले तरी हा नाच फार छान रंगतो. एकमेकांना टाळ्या देत, किंवा हातात टिपऱ्या घेऊन केलेल्या सामुहिक नाचात, नवरात्रात रंगते!
राजस्थानमध्ये हेच नृत्य हातात दिवे धेऊन किंवा मशाली घेऊन किंवा डोक्यावर घागरी घेऊन रंगते. काही ठिकाणी हे शक्तीचे नृत्य हातात लाठ्या नाहीतर तलवारी घेऊन रंगते.
दक्षिण भारतात नवरात्री मध्ये मंदिरातून नृत्य केले जाते. काही मंदिरांमध्ये यासाठी मुद्दाम बांधलेले मंडप असतात. भरतनाट्यम, मोहिनीअट्टम् आदि नृत्यांचे प्रकार सादर केले जातात.
कर्नाटकात गारुडी गोम्बे नावाचे नृत्य दसऱ्याला केले जाते. यामध्ये बाहुलीचा वेश परिधान करून देवीला संतुष्ट करायला नृत्य केले जाते. हा पेहेराव जड असल्याने फक्त पुरुष हे नृत्य करतात.
बंगालमध्ये दोन्ही हातात धूपदाणी धरून धुनाची नावाचा नाच सादर केला जातो. संध्याकाळी देवीची आरती झाल्यावर हे नृत्य केले जाते. जोशपूर्ण, चैतन्यपूर्ण, द्रुत तालात, देवीचे गुणगान करत देहभान हरपून रंगलेले नृत्य हा भक्तीचा सोहोळा आहे.
- दिपाली पाटवदकर