तसं म्हणायला गेल्यास आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा ‘प्रवास’ हा एक अविभाज्य भाग. परंतु, याच प्रवासा दरम्यान बरेचदा अपघातांच्या दु:खद बातम्या येऊन धडकतात. क्षणार्धात होत्याचे नव्हते होऊन जाते. या अपघातांमध्ये काहींना आपला जीव गमवावा लागतो, तर काहींना आयुष्यभरासाठी शारीरिक अपंगत्वासह जीवन जगावे लागते. या अपंगत्वाचे ओझे आयुष्यभर खांद्यावर पेलताना मानसिकदृष्ट्या खचायला होते, परंतु अशा कठीण परिस्थितीलाही शरण न जाता आलेल्या संकटाला सामोरे जाऊन आयुष्यात निर्माण झालेला हा काळोख काही शूरवीर पुसून टाकतात. अशा धैर्यशील अवलियांपैकीच एक म्हणजे किरण कनोजिया. पेशाने आयटी इंजिनिअर असलेल्या ३० वर्षीय किरण कनोजिया या मूळच्या फरिदाबादच्या. इन्फोसिस कंपनीमध्ये मोठ्या हु्द्यावर काम करणार्या किरण या २०११ मध्ये कामाच्या निमित्ताने हैदराबादमध्ये स्थायिक झाल्या. किरण आपला वाढदिवस आई-वडिलांसोबत साजरा करण्यासाठी फरीदाबादला जाणार्या ट्रेनमध्ये बसल्या आणि त्यांचा हैदराबाद-फरीदाबाद प्रवास सुरू झाला. खरंतर कामाच्या रगाड्यातून वेळ काढून किरण सु्ट्टी घेऊन वरचेवर आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हैदराबाद-फरीदाबादचा प्रवास करीत होत्या, परंतु हा प्रवास आपल्या आयुष्याची कायमची दिशाच बदलून टाकेल, याची साधी कल्पनाही त्यांनी केली नसेल. या प्रवासादरम्यान दोन चोरटे चोरीच्या उद्देशाने ट्रेनमध्ये शिरले आणि त्यांनी किरण यांची बॅग उचलण्याचा प्रयत्न केला. किरण या दरवाज्याजवळ असलेल्या सीटवर बसल्याने चोरट्यांनी किरण यांना लक्ष्य केले. किरण यांनी चोरट्यांचा विरोध केला आणि त्यातच त्या ट्रेनच्या बाहेर फेकल्या गेल्या. या अपघातामध्ये त्यांच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी किरण यांना त्यांचा डाव पाय कापावा लागेल, असे सांगितले. डॉक्टरांनी सांगितलेल्या या पर्यायाने किरण पुरत्या खचून केल्या होत्या. त्या एका घटनेमुळे आपल्या आयुष्यात असंं काही भयानक होऊन जाईल, हा विचारही त्यांना बैचेन करत होता. यापुढे आपण आपल्या पायावर कधीच उभे राहू शकणार नाही, समाज आयुष्यभर आपल्याकडे केवळ आणि केवळ सहानुभूतीच्या नजरेने पाहात राहील, आपलं करिअर संपलं, असे एक ना अनेक विचार त्यांच्या मनाला बोचू लागले. एका क्षणाला त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा मावळल्या, पण दुसर्याच क्षणी अपघातातून आलेले अपंगत्वाचं मनावर ओझं न ठेवता त्यावर मात करून आपली वेगळी प्रतिमा तयार करायची, असं किरण यांनी मनोमन पक्कं केलं. या भयानक अपघातातून बचावल्यानंतर किरण यांनी पहिली ’ब्लेड रनर चॅम्पियन’ महिला म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. या अपघातानंतर त्यांना पुनर्वसनाकरिता हैदराबादमधील दक्षिण पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले. त्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला आणि एका नव्या उमेदीने जीवन जगण्याचा त्यांनी निश्चय केला.
या सर्व काळामध्ये डॉक्टरांनी किरण यांना ‘तुम्ही फक्त चालू शकता, पण पळू शकत नाही,’ असं स्पष्टपणे सांगितलं होतं.परंतु, अशक्यच शक्य असं करूनच दाखवायचं होतं. २०१४ मध्ये किरण यांनी हैदराबादमध्ये घेण्यात आलेल्या ’एअरटेल मॅरेथॉन’मध्ये प्रथमच भाग घेऊन १० किलोमीटरचे अंतर पार केले व त्यात त्यांनी पदक मिळवून दाखवले. यानंतर किरण यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी दिल्ली, मुंबईमध्ये घेण्यात आलेल्या ’हाफ मॅरेथॉन’च्या स्पर्धेतही दमदार कामगिरी बजावली. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, दृढनिश्चय आणि चिकाटीच्या जोरावर मोठ्या हिमतीने त्या उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम करायलाच हवा.
- सोनाली रासकर