#शक्तीपूजन - जय माता दी!

    26-Sep-2017   
Total Views | 32

 

पुराश्मयुगात शैलाश्रायात, गुहेत व निसर्गात राहणाऱ्या मानवाला सहजच निसर्गाबद्दल अत्यंत कृतज्ञता वाटली असणार. त्या बरोबरच निसर्गाच्या रौद्रावाताराने त्या बद्दल आश्चर्ययुक्त भीती देखील वाटली असेल. निसर्गावर कोणत्याही प्रकारचा ताबा नसल्यामुळे तो निसर्गापुढे नतमस्तक झाला नसेल तरच नवल. या भावनांतून त्याने निसर्गातील पंचतत्त्वांची पूजा केली असावी. उन-पाऊस, वादळ-वारा, पृथ्वी, अग्नी, आकाश ही त्याची प्रथम दैवते असावीत. निसर्गाची सृजनता मातृ देवतेच्या रूपात त्याने पुजली असावी.

पुढील काळात ही पूजा अधिक क्लिष्ट होत गेली. देवता, देवतेचे रूप, तिची शक्ती, स्वभाव, विकसित झाले. देवतांच्या स्तुतीपर मंत्र रचले. भारतात विविध ठिकाणी केलेल्या उत्खननातून मातृ देवता, शक्ती देवता यांची पूजा केलेली दिसते. त्यापैकी काही -

१९८२ मध्ये, मध्यप्रदेशात बगोर येथे उत्खनन चालू होते. उत्खनन करत असतांना काहीतरी सापडले आणि ते पाहून तिथे काम करणारे कामगार पळून गेले! चौकशी करता असे कळले की त्यांना तिथे देवीचे स्थळ सापडले होते, आणि तिथे खणले तर देवीला त्रास होईल आणि ती कोपेल. इथे सापडला होता - एक गोलाकार दगडी चौथरा. त्या चौथऱ्यावर दगडी पात्यांच्या हत्यारांचा ढीग पडला होता. आणि मधोमध एक त्रिकोणी आकाराचा दगड होता. या दगडावर नैसर्गिकरित्या एकात एक असे तीन त्रिकोण कोरलेले होते.

पुरातत्त्व अधिकाऱ्यांनी तेथील जवळपासच्या आदिवासी भागाची पाहणी केली, त्यांची देवालये पहिली. तेंव्हा तेथील बैगा व कोल जमातीचे लोक अशा त्रिकोणी दगडी देवतेची – मातृदेवता / सृजनदेवता म्हणून पूजा करत असल्याचे आढळले. ‘कढाई – की – देवी’ या नावाने या देवतेची पूजा आजही केली जाते. या सगळ्यातून असा निष्कर्ष निघतो की साधारण २५,००० वर्षांपूर्वी पासून मातृदेवातेची पूजा चालू आहे.

येथून जवळच असलेल्या बेलन नदीच्या खोऱ्यात हाडापासून तयार केलेली एक मानवी आकृती सापडली आहे. तिचा काळ सुद्धा २५,००० वर्षांपूर्वीचा असावा, आणि ही देखील मातृदेवता असावी असे वाटते.

साधारण ५,००० वर्षांपूर्वीच्या सरस्वती – सिंधू खोऱ्यातील मोहेंजो दाडो, हरप्पा आदी ठिकाणी मातृदेवतेची पूजा दिसते. मातृदेवतेची अनेक शिल्पे जवळ जवळ प्रत्येक site मध्ये मिळाली आहेत. त्यावरून हरप्पाचे लोक शक्तीचे, देवीचे उपासक होते असे वाटते. मातृदेवता किंवा पृथ्वी – मातेची पूजा इथे सर्वत्र दिसते.


मोहेंजो दाडो येथील उभी असलेली मातृदेवता. ही मूर्ती भाजलेल्या मातीची असून तिच्या कानाजवळ दोन लहान तेलाचे दिवे लावायची सोय आहे. या मूर्तीला वरून एक लाल रंगाचा पातळ लेप लावला आहे. ज्यामुळे ती गुळगुळीत दिसते. ईस. पूर्व २७०० ते ईस. पूर्व २१०० या काळातली ही मूर्ती आहे.

हरप्पाच्या एका मुद्रेवर, वेणी घातलेली एक स्त्री दिसते. एकतर ती वाघावर बसली आहे, किंवा नरसिंहा प्रमाणे अर्धा वाघ आणि अर्धी स्त्री अशी ही देवता आहे. ही मुद्रा प्राचीन दुर्गा असावी असे म्हटले जाते.  काही मुद्रांवर सात देवींचे चित्र पाहायला मिळते. या सप्तमातृका म्हणून ओळखल्या जातात.



वाघावर आरूढ असलेली दुर्गामाता पुढील काळात दिसते. तर सप्तमातृका या देवता शक्तीची सात रूपे म्हणून ओळखल्या जातात. दुर्गा सप्तशती मध्ये या सात देवींची कथा येते. या देवींची नावे आहेत  – ब्राह्मी, वैष्णवी, महेश्वरी, कौमारी, वराही, इंद्राणी आणि चंडिका. भारतात अनेक ठिकाणी सप्तमातृका मंदिर आहे.


दुर्गेची अथवा मातृदेवातेची पूजा, मध्यप्रदेशातील भीमबेटका या प्राचीन शैलाश्रयात व गुहांमध्ये सुधा दिसते. इथे पुराश्मयुगापासून काढलेली चित्रे पाहायला मिळतात. यातील काही चित्रांमध्ये मातृदेवतेची चित्रे आढळतात. जवळपास राहणारे गोंड व कोरकू आदिवासी, आजही काही ठराविक सणांना इथे येऊन पूजा करतात. येथील एका गुहेत दुर्गामातेचे एक मंदिर आहे.

दुर्गा पूजेचे अत्युच्च रूप बंगाल मध्ये पाहायला मिळते. बंगाल मधील नवरात्र हा दुर्गा पूजेचा महोत्सव असतो. ९ दिवस महिषासुराशी लढून, त्याच्यावर विजय मिळवल्यावर १० वा दिवस विजयादशमी म्हणून साजरा होतो.


दुर्गेची कितीतरी रूपे पाहायला मिळतात - बंगालची - कालीमाता, महिषमर्दिनी, नंदिनी; मेघालय, आसामची – जयंती, कालिका, कामाख्या, त्रिपुरासुंदरी; उज्जैनची अवंती; महाराष्ट्राची – भद्रकाली, तुळजाभवानी; तामिळनाडूची कन्याकुमारी; हिमाचलची - सिद्धी, जयदुर्गा; जम्मूची वैष्णोदेवी; बांगलादेशची - अपर्णा, भवानी, सुगंधा; श्रीलंकेची भुवनेश्वरी; तिबेटची दक्षायनी; नेपाळची चंडी; पाकिस्तानची हिंग्लज माता ... आणि कितीतरी. नेपाळ, तिबेट, श्रीलंका, पाकिस्तान या देशांशिवाय कॅम्बोडिया, इंडोनेशिया आणि विएतनाम येथे सुद्धा दुर्गा पुजली जाते.

सिंहावर किंवा वाघावर आरूढ असलेली, आठ हातांमध्ये आठ शस्त्र धारण करणारी, महिषासुराचा वध करणारी, हिमालयाची कन्या, शिवाची पत्नी, गणपती व कार्तिकेयची माता! अशा दुर्गेची स्तुती आदि शंकराचार्य अतिशय सुंदर शब्दात करतात -

अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते
गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ||
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ||

 

References -

१. http://www.nationalmuseumindia.gov.in

२. An Upper Paleolithic Shrine in India? J. M. Kenoyer, et. al.

३. भारताची कुळकथा – डॉ. म. के. ढवळीकर

४. The Rock Art of the Bhimbetka Area in India – Meenakshi Dubey-Pathak

 

- दिपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
जेएनयूत निनादला परिवर्तनाचा शंखनाद; विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अभाविपने रचला इतिहास

जेएनयूत निनादला परिवर्तनाचा शंखनाद; विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अभाविपने रचला इतिहास

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत केंद्रीय पॅनेलच्या सहसचिव पदावर प्रचंड विजय मिळवला. अभाविपचे उमेदवार वैभव मीणा यांनी सहसचिव पदावर विजय मिळवत डाव्या संघटनांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्याचबरोबर १६ शाळा आणि विविध संयुक्त केंद्रांमध्ये एकूण ४२ पैकी २४ समुपदेशक पदांवर विजय मिळवून अभाविपने 'लाल किल्ल्यावर' भगवा फडकवला आणि अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या तथाकथित डाव्या विचारसरणीचा पाडाव केल्याचे दिसून आले. ABVP in JNU Election Result..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121