सध्या देशभरात शारदीय नवरात्र सुरु आहे. ह्या दिवसात देवीची शक्तिरूपात मोठ्या थाटाने आराधना केली जाते. भारतात शक्तीच्या उपासनेला फार मोठी परंपरा आहे. खरं तर पूर्वी जगातल्या बहुतेक अनेकेश्वरवादी उपासना पद्धतींमध्ये स्त्रीदेवतांची उपासना केली जायची. ईजिप्शियन, मायन, रोमन आणि ग्रीक ह्या सर्व संस्कृतींमधून देवीची आराधना व्हायची. पण एकेश्वरवादी उपासना पद्धतींचा प्रभाव जगात वाढला आणि 'ईश्वर हा फक्त पुरुषच आहे' हे तत्व जगभर बोकाळले. भारत हा एकच देश असा आहे आणि हिंदूधर्म हा असा एकच धर्म आहे ज्यामध्ये आजही स्त्रीची आदिशक्ती ह्या स्वरूपात उपासना होते. महाभारताच्या काही पर्वांमध्ये शक्तीचे स्तवन आढळून येते. पाणिनीच्या अष्टाध्यायी ह्या ग्रंथातही भवानी, शर्वाणी आणि रुद्राणी ह्या देवींचे उल्लेख आढळतात.
निरनिराळी रूपे घेऊन आदिशक्तीने चंड, मुंड, शुंभ, निशुंभ वगैरे राक्षसांचा संहार केला. महिषासुर ह्या प्रबळ राक्षसाचा संहार करण्यासाठी देवीला जे रूप घ्यावे लागले ते म्हणजे महिषासुरमर्दिनी दुर्गेचे. महिषासुर हा रंभ नावाच्या राक्षसाचा एका म्हशीपासून झालेला मुलगा. अमरत्व मिळावे म्हणून त्याने घोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. पण जे जन्मते त्याचा नाश अटळ आहे असे सांगून ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व नाकारले. तेव्हा महिषासुराने 'मी कुठल्याही पुरुषाच्या हातून मरणार नाही' असा वर ब्रह्मदेवाकडून मागून घेतला. एखाद्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या स्त्रीच्या हातून आपला मृत्यू होईल ही शक्यताच महिषासुराला वाटत नव्हती. ह्या वराने उन्मत्त झालेला महिषासुर पृथ्वीला छळायला लागला. देवानांही त्याने हुसकावून लावले. शेवटी सर्व देव शंकराकडे गेले. शंकरांनी आपले तेज पार्वतीला देऊन एक महाशक्ती निर्माण केली. तिला इतर सर्व देवांनी आपापली शक्ती दिली. श्रीशंकरानी आपला त्रिशूल दिला, इंद्राने वज्र दिले, श्रीविष्णूनी आपले चक्र दिले. बाण, धनुष्य, पाश, अंकुश, परशु, खङग इत्यादी सर्व शस्त्रांनी देवी सज्ज झाली. देवीचे वाहन जो सिंह तो तिला तिच्या वडिलांनी, म्हणजे हिमालयाने दिला. अशी ही शस्त्रसज्ज आदिशक्ती महिषासुराच्या संहाराला चालून गेली. नऊ दिवस तुंबळ युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी म्हणजे विजयदशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध करून विजय मिळवला आणि पृथ्वीला भयमुक्त केले. ही गोष्ट भारतात जवळजवळ सगळ्यानांच ज्ञात असेल.
महिषासुरमर्दिनी हे शक्तीचे, शौर्याचे, सामर्थ्याचे प्रतीक आहे, साहजिकच प्राचीन भारतीय सम्राटांना महिषासुरमर्दिनीची मूर्ती उपास्य वाटत होती. अगदी शुंग, कुषाणकालापासून महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आपण आज जी मूर्ती पाहणार आहोत ती मूर्ती 'नगरेषु कांची' म्हणून कालिदासाने गौरवलेल्या कांचीपुरम शहरातल्या कैलासनाथाच्या मंदिरातली आहे. हे मंदिर सातव्या शतकात पल्लव राजा राजसिंह नरसिंहवर्मन दुसरा ह्याने बांधवून घेतले. त्याच्या मृत्यूनंतर ह्या मंदिराचे काम पुढे त्याचा मुलगा महेंद्रवर्मन ह्याने पूर्ण केले. पूर्ण द्रविड शैलीतल्या वालुकाश्मात बांधलेल्या ह्या मंदिराच्या प्राकारात एकाहून एक सरस शिल्पपट्ट आहेत. त्यातले हे महिषासुरमर्दिनीचे शिल्प मला खूप आवडते.
देवी अष्टभुजा आहे. तिच्या पायाशी डावीकडे एका कोपऱ्यात हरलेला महिषासुर आहे. साधारण सातव्या शतकापर्यंत महिषासूर हा रेड्याच्या स्वरूपात दाखवला जायचा. पुढे त्याचे मानवीकरण झाले. देवीच्या पायांकडे जबडा उघडलेला रौद्र असा सिंह बसलेला आहे आणि सिंहाच्या पाठीवर पाय ठेवून आलीढ मुद्रेत देवी उभी आहे. तिच्या चेहेऱ्यावर विजयाचे स्मित आहे. देवीच्या सहा हातात वर उल्लेखलेली शस्त्रे आहेत, एक हात कमरेवर ठेवलेला आहे आणि दुसरा हात दुसऱ्या मांडीवर टेकलेला आहे. देवीच्या संपूर्ण देहबोलीत कमालीचा आत्मविश्वास दाखवण्यात शिल्पकार यशस्वी झालेला आहे. देवीच्या मस्तकावर उंच शंकूसारखा मुकुट आहे आणि अंगावर अगदी मोजकेच दागिने आहेत. नऊ दिवस चाललेले युद्ध आता संपलेले आहे. आदिशक्ती जिंकलेली आहे. तिच्या मुखावर आश्वासक असे स्मित आहे.
हे शिल्प बघताना माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता, अत्यंत कमी अवकाशात शिल्पकाराने देवीची जी आक्रमक तरीही आश्वासक अशी देहबोली साकारलेली आहे त्याला खरोखरच तोड नाही. हे कोण अनामिक शिल्पकार होते त्यांची नावेही आता आपल्याला माहित नाहीत, पण त्यांच्या कलेचा अविष्कार मात्र आज तेराशे वर्षांनंतर देखील आपली नजर खिळवून ठेवतो.
- शेफाली वैद्य