“सरस्वती” म्हणल्यावर डोळ्यासमोर जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते हे -
हे चित्र अगदी अलीकडच्या काळात, म्हणजे १८९६ मध्ये, प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांनी काढले. पुराणात वर्णन केल्याप्रमाणे हे सरस्वतीचे चित्र आहे. भारतभर सरस्वतीचे वर्णन जसे होते, तसेच हे चित्र त्यांनी साकारले. शुभ्र वस्त्र परिधान केलेली चतुर्भुज सरस्वती, तिच्या एका हातात वेद, एका हातात जपमाळ आणि दोन हातात वीणा, मागे रम्य नदी, आणि जवळपास तिचे वाहन हंस किंवा मोर. हे चित्र आणि नंतर त्याच्या काढल्या गेलेल्या प्रिंट्स, इतके प्रसिद्ध झाले की, आज १२० वर्षांनंतर सुद्धा, “सरस्वती” म्हणल्यावर हेच चित्र डोळ्यासमोर उभी राहते!
या वर्णनाला मिळती जुळती सरस्वती पहायला मिळेल, अमेरिकेतील वाशिंगटनमध्ये. संगमरवरात घडवलेली ही हंसवाहिनी, चतुर्भुज सरस्वतीची मूर्ती अतिशय विलोभनीय आहे.
२०१३ मध्ये इंडोनेशियाने विद्यादेवतेची ही मूर्ती अमेरिकेला भेट दिली. या सरस्वतीच्या पायाशी, इंडोनेशिया मध्ये लहान असतांना शिकणारा बराक ओबामा आणि त्याच्या दोन वर्ग मैत्रिणी अभ्यास करतांना दिसत आहेत.
दक्षिण भारतातून गेलेल्या व्यापाऱ्यां मार्फत इंडोनेशियामध्ये हिंदु धर्म गेला. पहिल्या शतकापासून वेद, पुराणे, रामायण, महाभारत आदि ग्रंथ भांडार तिथे पोचू लागले होते. ९ व्या शतकातपासून बांधलेली काही सुंदर व भव्य मंदिरे इंडोनेशियामध्ये पहायला मिळतात.
इंडोनेशियाच्या देवतांपैकी अग्रगण्य देवता आहे सरस्वती, ही शिक्षणाची, विज्ञानाची, साहित्याची, वाचनालयाची आणि शाळेची देवता आहे. वर्षातून एक दिवस इथे सरस्वती पूजन होते. या दिवशी – हस्तलिखितांची, पुस्तकांची पूजा केली जाते. विद्यार्थी या दिवशी शाळेत, महाविद्यालयात नवीन कपडे घालून जातात. शाळेत सरस्वतीची पूजा करतात व प्रार्थना म्हणतात.
बौद्ध धर्म प्रचारातून, हिंदू देवता चीन मार्गे जपान मध्ये दाखल झाल्या. ६ व्या शतकात सरस्वतीची पूजा जपान मध्ये रुजायला सुरुवात झाली. बेंझेटेन या नावाने इथे सरस्वती ओळखली जाते. जपान मध्ये बेंझेटेन ही पाणी, शब्द, वाचा, संगीत आणि विद्येची देवता आहे. बेंझेटेनची अनेक मंदिरे जपान मध्ये पाहायला मिळतात. तिच्या हातात वीणेच्या ऐवजी बिवा नावाचे वाद्य दिसते.
“सुवर्णभाषा सूत्र” हे काही बौद्ध प्रवचनांद्वारे उत्तर भारतात सांगितले गेले. साधारण पहिल्या शतकात सांगितले असावे. त्या नंतर ते ग्रंथबद्ध झाले. या संस्कृत ग्रंथाचे चीन मध्ये भाषांतर झाले – Sutra of the Golden Light. या ग्रंथातील एक भाग सरस्वती देवीवर आहे. यामध्ये काही ठिकाणी सरस्वती ही महिषासुरमर्दिनी प्रमाणे अष्टभुजा रूपात वर्णिली आहे. या अष्टभुजा देवीच्या हातात शस्त्र असून ती राष्ट्राचे रक्षण करते असे मानले जाते. जपान मधील काही मंदिरातून बेंझेटेन महिषासुरमर्दिनी रूपात सुद्धा दिसते.
सरस्वतीची पूजा, इंडोनेशिया आणि जपान शिवाय इथल्या इतरही देशात दिसते. सरस्वती तिबेट मध्ये “तारा”, थायलंडमध्ये “सुरत्सवदी”, कॅम्बोडियामध्ये “वागेश्वरी” किंवा “भारती” या नावानी ओळखली जाते. या सर्व ठिकाणी सरस्वती ही विद्येची देवता आहे. विद्यार्थ्यांची देवता आहे.
भारताच्या पश्चिमेला सुद्धा सरस्वतीची पूजा केलेली दिसते. पर्शिया मध्ये, “स” चा “ह” होत असे. त्यामुळे “सिंधू” चे “हिंदू” झाले किंवा “सप्त” चे “हप्त” झाले. तसेच “सरस्वती” चे “हरह्वती” झाले. पर्शियामध्ये “हरह्वती” किंवा “हरैती” नावाची एक देवता होती.
पर्शियाच्या पलीकडे अरेबिया मध्ये सापडलेली ही एका देवतेची मूर्ती. ही हंसवाहिनी देवता सध्या ब्रिटीश संग्रहालयात आहे. ही देवता सरस्वती असावी असे अभ्यासकांचे मत आहे.
त्रिभुवनातील सरस्वतीचे दर्शन घेतल्यावर, आकाशातील सरस्वती पण नमूद करायला हवी. काही महिन्यांपूर्वी, IUCCA पुणे येथील शास्त्रज्ञांना आकाशात एक Galaxy Supercluster सापडला. या cluster ला “सरस्वती” चे नाव देण्यात आले.
References -
१. Sarasvati – Riverine Goddess of Knowledge. From Manuscript-carrying Veena-player to Weapon-weilding Defender of the Dharma
२. Saraswati statue in Saudi Arabia – S Swaminathan
३. Hindu deities in Japan - BENOY K. BEHL
- दिपाली पाटवदकर