
पूर्वीचा ब्रह्मदेश किंवा आजच्या म्यानमार देशातून रोहिंग्या मुस्लिमांची जी होरपळ चालू आहे, ती कुठल्याही माणसाच्या मनाला चिंतीत करणारी गोष्ट आहे. पण तशी वेळ त्यांच्यावर का आली वा कोणी आणली, याकडेही डोळसपणे बघण्याची गरज आहे. रिकामेपणी वेळ जात नव्हता म्हणून म्यानमारच्या लष्कर व पोलिसांनी उठून या मुस्लीम परिसरात धुमाकूळ घातला व रोहिंग्यांना पळवून लावलेले नाही. ही दीर्घकाळची समस्या आहे. अगदी भारत-पाकिस्तान होण्यापूर्वीची समस्या आहे. अर्थात, त्यात म्यानमारचा समावेश नव्हता. पण भारताची फाळणी होणार म्हटल्यावर म्यानमारच्या राखाईन प्रांतातील मुस्लिमांच्या नेत्यांनी पूर्व पाकिस्तानात आपला समावेश व्हावा म्हणून उद्योग सुरू केलेले होते. त्यासाठी त्यांनी अखंड हिंदुस्तानचे मुस्लीम नेते किंवा पाकिस्तानचे जनक मानल्या जाणार्या महंमद अली जिना यांचीही भेट घेतली होती. पण जिना यांना ही कटकट नको होती. म्हणूनच त्यांनी या रोहिंग्या नेत्यांना पिटाळून लावले होते. मग त्यातल्या राजकीय उचापती करणार्या मौलवी व धर्मांध नेत्यांनी काश्मीरप्रमाणे म्यानमारमध्ये सार्वमत मागण्याचा खेळ सुरू केला. आपण उर्वरित म्यानमारी समाजापेक्षा वेगळे आहोत, म्हणून आपल्याला वेगळे मुस्लीम राष्ट्र मिळावे किंवा स्वायत्त प्रांत मान्य व्हावा अशी मागणी पुढे आली. तिथून मग म्यानमारच्या सरकारला कठोर पावले उचलणे भाग पडले. कारण, ‘रोहिंग्या’ म्हणवून घेणार्यांनी हळुहळू वेगळ्या मुस्लीम राष्ट्राचा पाया घालण्याचा पवित्रा घेतला होता. त्यातल्या अशा उचापतखोर नेत्यांना मुस्लीम लोकसंख्येने खड्यासारखे बाजूला केले असते, तर त्यांच्यावर आज ही पाळी आली नसती. पण शहाणपणाने वागेल त्याला मुस्लीम नेता होता येत नाही, हीच आजची वस्तुस्थिती झालेली आहे. म्हणून हा प्रश्न समजून घेण्याची गरज आहे.
रोहिंग्या हे म्यानमारच्या पश्चिम सीमेलगत वसलेल्या अकरान प्रांतातील लोक आहेत. त्यात बहुतांश मुस्लीम असले तरी त्याच वंशाचे किरकोळ हिंदू वा बौद्धधर्मीयसुद्धा आहेत. साहजिकच हा वंशाशी संबंधित वाद नसून त्यातील मुस्लीम लोकसंख्येचा विषय आहे. एकूण लोकसंख्येत नगण्य असलेल्या रोहिंग्यांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी केल्याने व त्यासाठी हत्यार उपसल्याने ही पाळी आलेली आहे. ब्रिटिश सत्ता संपुष्टात आल्यावर आलेली लोकशाही तिथे फारकाळ टिकली नाही. लवकरच तिथे लष्कराने सत्ता काबीज केली आणि त्याच्या पोलादी टाचेखाली सगळीच लोकसंख्या भरडली गेली होती. लष्करी सत्ता भावनांची कदर करत नाही. अशा सत्तेला रोहिंग्या आव्हान देऊ लागल्यावर तिथल्या बौद्ध बहुसंख्येच्या मनात शंका येणे स्वाभाविक होते. शिवाय, मागल्या दोन-तीन दशकात जगभर जिहादी अतिरेकाने थैमान घातले आहे, त्यानेही तिथल्या बौद्धधर्मीय लोकसंख्येला सावध केले. मुठभर अतिरेकी मुस्लीम अवघ्या देशाला ओलिस ठेवू शकतात, हा जगाचा अनुभव आहे. म्हणूनच तसे रोहिंग्या शिरजोर होण्यापूर्वीच त्यांना संपवण्याची धारणा मुळात बौद्ध धर्माचे पालन करणार्यांमध्ये निर्माण झाली. जगाला शांततेचा संदेश देणार्या धर्माच्या लोकांना इतक्या टोकाला जाण्याची वेळ कशाला आली, त्याचे उत्तर या इतिहासात सामावलेले आहे. झालेली तसेच. या हिंसेचे नेतृत्वच मुळात बौद्ध उपदेशकांनी केले. पुरेशी लोकसंख्या वाढली व रोहिंग्या सबळ झाले, तर म्यानमारमध्ये बौद्धधर्मीय सुखरूप जगू शकणार नाहीत, असा प्रचार मुळात बौद्ध धर्मोपदेशांनीच सुरू केला. मग त्याला म्यानमारच्या लष्करी सत्तेने साथ दिली. कुठेही किरकोळ घातपाताची घटना घडली, तर सरसकट मुस्लीम रोहिंग्या वस्त्यांवर प्रतिहल्ले सुरू झाले. वस्त्यांच्या वस्त्या पेटवून देण्याचे राक्षसी पाऊल उचलले गेले. त्यातून मग निर्वासितांची समस्या निर्माण झाली आहे.
तसे बघायला गेल्यास शतकानुशतके रोहिंग्या मुस्लीम म्यानमारचे रहिवासी आहेत. पण, ब्रिटिशपासून तो देश स्वतंत्र होत असतानाच्या काळात तिथल्या मुस्लीम नेते व मौलवींनी जी जिहादी व विभाजनवादी भूमिका घेतली, तिथून त्यांची साडेसाती सुरू झाली. पहिल्याच फटक्यात त्यांना ‘वेगळे’ मानून त्यांना साधे नागरिकत्व देण्याचे टाळले गेले. म्हणून हे काही लाख रोहिंग्या अजून आपल्याच देशात निर्वासित बनून राहिले आहेत. १९३७ सालात भारतामध्ये आलेला तिथला एक मौलवी म्यानमारला इस्लामी देश बनवू बघत असल्याची आठवण प्रसिद्ध मौलवी वहिउद्दीन यांनीच एक स्वतंत्र लेख लिहून सांगितली आहे. जगभर मुस्लिमांची तीच खरीखुरी समस्या आहे. बहुसांस्कृतिक व बहुवंशीय देशात मिळून मिसळून वागण्याची मुस्लिमांची तयारी नसल्याने असे प्रश्न निर्माण होतात, असे वहिउद्दीन यांनी वारंवार सांगितलेले आहे. म्यामनार असो किंवा काश्मीर असो, इथेही आपण ‘वेगळे’ असल्याच्या धारणेतूनच काश्मीर अजून जळत राहिलेला आहे. जो काही उद्योग व हिंसाचार ‘काश्मिरीयत’ या नावाखाली चालत असतो, तोच प्रकार म्यानमारमध्ये सुरू होता. त्याला कंटाळूनच तिथे इतक्या टोकाची प्रतिक्रिया उमटलेली आहे. पण ती फक्त त्या एकाच देशात सीमित राहिलेली नाही. आपल्या देशाच्या दक्षिणेला असलेल्या श्रीलंकेचा उत्तर भाग असाच तामिळी वंशाच्या लोकांनी वसलेला आहे. तिथे वेगळे होण्याचा लढा दीर्घकाळ चालला. अखेरीस त्यांचा पूर्ण बिमोड झाल्यावरच तो विषय निकालात निघालेला आहे. श्रीलंकेतील तामिळी वाघ आणि म्यानमारचे रोहिंग्यांची कहाणी वेगळी अजिबात नाही. कदाचित म्हणून असेल, म्यानमारच्या लष्कराने श्रीलंकेचा धडा गिरवून हा विषय निकालात काढण्याची पावले उचललेली असावीत. ज्यांना शांततेने वास्तव्य करायचे आहे, त्यांना सुरक्षा आणि उरलेलेल्या बंडखोरांना जन्नतमध्ये धाडण्यातून हा निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
म्यानमारच्या बौद्धांनी एक आक्रमक पाऊल उचलले आहे आणि मध्यंतरी श्रीलंकेतील बौद्धांनीही तिथल्या मुस्लीम वस्त्यांवर हल्ले चढवलेले होते. या दोन गोष्टी एकत्र लक्षात घेतल्या, तर नवेच समीकरण आकार घेताना दिसू शकेल. दीर्घकाळ जगभर सोकावलेल्या इस्लामी जिहादी दहशतवादाला अंगावर घेण्यास आजचे पुढारलेले देश तयार झालेले नाहीत, तर ते आव्हान शिंगावर घेण्यास बौद्धधर्मीय राष्ट्रे पुढे येत आहेत काय? या प्रश्नाचा साकल्याने व गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. कारण, म्यानमार ही सुरूवात आहे आणि बारकाईने जगाचा नकाशा अभ्यासला तर भारताभोवती प्रामुख्याने बौद्धधर्मीय लोकवस्ती असलेले देश पसरले आहेत. अगदी इस्लामचे आक्रमण येण्यापूर्वी अफगाणिस्तानची बौद्ध लोकसंख्याच होती आणि चीन, कोरिया, व्हिएतनाम वा जपानपर्यंत सर्वत्र बौद्ध धर्माचेच प्राबल्य होते. अशा शांतीप्रिय धर्माचे लोक आता आपल्या धर्माच्या सुरक्षेसाठी हिंसेचा आधार घ्यायचा विचार करू लागले आहेत काय? शांतता ही हिंसेशी सामना करू शकत नाही आणि हिंसेला प्रवृत्त झालेल्यांना शांतीचे डोस पाजून शांतता प्रस्थापित होत नाही, हे या बौद्ध लोकसंख्येला जाणवलेले आहे काय? चिनी कम्युनिस्ट क्रांतीपूर्वी तिथेही बौद्ध धर्माचेच वर्चस्व होते. पश्चिमेकडील इस्लामचे आक्रमण रोखण्याचे काम आता या बुद्धधर्मीय लोकसंख्येने हाती घेतले आहे काय? मागल्या काही वर्षांत पराकोटीच्या हिंसाचाराची वेळ म्यानमारवर आली, त्यातून तशी चिन्हे दिसू लागली आहेत. तशी टोकाची वेळ आली तर चीनच्याही बुद्धसंस्कारी लोकसंख्येला त्यापासून अलिप्त राहाता येणार नाही. म्हणूनच रोहिंग्यांचा विषय भारतापुरता किंवा म्यानमारच्या निर्वासितांपुरता मर्यादित समजण्याची चूक करून चालणार नाही. नजीकच्या काळात हे सर्वच प्रकरण कुठल्या दिशेने व कोणत्या जुळवाजुळवीच्या वाटेने जाते, याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.