#शक्तीपूजन - काश्मीरपुरवासिनी शारदा

    23-Sep-2017   
Total Views | 90

 

भारतात काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि आसाम पासून गुजरात पर्यंत सर्वत्र नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात नवरात्रीतील एक दिवस शारदा पूजन केले जाते. वही, पुस्तकांच्या पूजेने ज्ञानदायी सरस्वतीची पूजा केली जाते. पण प्रत्येक ठिकाणाची शारदा पूजा वेगळी, तिचा बाज वेगळा आणि थाट वेगळा. आज काश्मीर मधील शारदेची माहिती.

 

नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि
त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ॥

काश्मीर वासिनी शारदे देवी, मी तुला नमन करतो! मी नित्य तुझी प्रार्थना करतो! मला विद्येचे दान दे!

 

काश्मीरच्या खोऱ्यात, कृष्णगंगा व मधुमती नदीच्या संगमा जवळ शारदेचे प्राचीन मंदिर उभे आहे. प्राचीन काळी शांडिल्य ऋषींनी येथे तपश्चर्या केली होती. नंतरच्या काळात, आद्य शंकराचार्य दिग्विजय करण्याकरिता  भारत भर भ्रमण करत होते. तेंव्हा ते गुजरात, सिंधुदेश, गांधार, काबुल, पुरुषपुरा (आजचे पेशावर), काम्बोज करत करत काश्मीर मध्ये आले. त्यावेळी मंदिराच्या चार द्वारांवर असलेल्या पंडित समूहाशी शास्त्रार्थ करून त्यांचा पराभव केल्यावरच शारदा पीठात प्रवेश मिळत असे. शंकराचार्यांनी त्या ठिकाणी चारही मंडळांचा  पराभव केला. त्यावर पंडितांनी आचार्यांचा सन्मान करून त्यांच्यासाठी मंदिराची द्वारे उघडली. तेथील सर्वज्ञपीठावर आसनस्थ होण्याचा मान आचार्यांना मिळाला.

 

भारताची फाळणी होईपर्यंत शारदा मंदिराला तीर्थयात्रेसाठी व दर्शनासाठी लोक जात असत. १९४७ मधील दसऱ्याच्या जवळपास पश्तुनी टोळ्यांनी केलेल्या हल्ल्यात हे मंदिर उद्ध्वस्त झाले. आता हे मंदिर पाक व्याप्त जम्मू मध्ये असून, त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या मंदिरातील यात्रा पुनश्च सुरु व्हावी या करिता वाजपयी सरकारच्या काळात प्रयत्न सुरु झाले.


शारदा पीठ हे विद्येचे माहेरघर होते. ईस. पूर्व ३ ऱ्या शतकात, सम्राट अशोकाने या भागात एक विद्यापीठ स्थापन केले होते असे म्हणतात. शारदेच्या या मंदिरामुळे व येथील असंख्य शारदा भक्तांमुळे, काश्मीरला त्या काळात “शारदा देश” म्हणत असत.

 

लिहिण्यासाठी जी लिपी इथे विकास पावली तीचे नाव सुद्धा “शारदा लिपी” होते. ही लिपी प्राचीन ब्राह्मी लिपी मधून विकसित झाली होती. काश्मीर मधील सर्व संस्कृत साहित्य शारदा मधून लिहिले गेले.  

 

पेशावर (आता पाकिस्तान) जवळील बक्षाली या गावात, ईस. पूर्व २ ऱ्या किंवा ३ ऱ्या शतकात लिहिलेले एक ७० पानी हस्तलिखित मिळाले. हे “बक्षाली हस्तलिखित” म्हणून प्रसिद्ध आहे. हे हस्तलिखित आता ऑक्सफोर्ड येथील ग्रंथालयात आहे. शारदा लिपी मध्ये लिहिलेले ही संस्कृत संहिता गणित विषयक आहे. या संहितेत “शून्य” चा प्रथम लेखी पुरावा मिळतो. १०, १००, १००० अशा संख्या लिहिण्यासाठी शून्य वापरला आहे. ज्या शून्याची ओळख युरोपला १३ व्या शतकात झाली, तो किमान दीड हजार वर्ष आधी भारतात वापरला जात होता.


शारदा लिपी मधून लिहिलेले अथर्ववेदाचे एक दुर्मिळ हस्तलिखित काश्मीरच्या महाराजांकडे होते. जे आता जर्मनी मधील एका ग्रंथालयात आहे. तर, अटक (आता पाकिस्तान) इथे शारदा लिपी मधून लिहिलेला, ८ व्या शतकातील शिलालेख उपलब्ध आहे. नंतरच्या काळातील, पंजाबातील गुरुमुखी लिपी शारदा लिपी मधून विकसित झालेली आहे. यावरून शारदा लिपी फक्त काश्मीर मध्ये नाही तर पाकिस्तान, पंजाब मध्ये सुद्धा वापरत होती असे दिसते.

 

शारदा लिपी मधून अतिशय सुंदर साहित्य लिहिले गेले – कल्हाणची राजतरंगिणी, सोमदेवचे कथासरित्सागर, क्षेमेंद्राचे बृहतकथामंजिरी आणि कितीतरी. १० व्या शतकात आलेला अल-बरुनी म्हणतो की भारतात  शारदा मध्ये लिहिलेली हजारो पुस्तके आहेत! 

 

इस्लामी आक्रमणानंतर, १० व्या शतकापासून काश्मीरच्या संस्कृतीवर घाला पडला. हळूहळू शारदा शाळेतून आणि मग वापरातून गेली. आज अगदी मोजक्या काश्मिरी पंडितांना शारदा लिहिता – वाचता येते. शारदा लिपी पुनर्जीवीत करण्याचे प्रयत्न ९० च्या दशकापासून सुरु झाले आहेत. २०१६ मध्ये भारत सरकारने काश्मिरी भाषा व शारदा लिपी नष्ट होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु केले.  

 

शारदेचे भक्त असलेल्या या भागातील नदीचे नाव देखील शारदेचे होते - “सरस्वती नदी”. सरस्वती नदीच्या काठावर वेदांची निर्मिती झाली, म्हणून ही विद्येची देवता, वाग्देवता, वाचेची देवता आणि संगीताची देवता. ऋग्वेदात या नदीचे वर्णन – “अम्बितमे, देवीतमे, नदीतमे सरस्वती” असे केले आहे. सरस्वतीला सर्वोत्तम आई, सर्वोत्तम देवी आणि सर्वोत्तम नदी मानणारे लोक तिच्या काठावर राहत होते. तिची पूजा करणारे, तिची स्तुतीस्तोत्र गाणारे लोक तिच्या काठावर राहत होते. हिमालयापासून समुद्रापर्यंत वाहणारी, अनेक तलावांनी युक्त असलेल्या या नदीचे पात्र २ ते १० किमी रुंद होते. या नदीला मिळणाऱ्या यमुना आणि सतलज यांचा मार्ग बदलल्यावर, ईस. पूर्व १९०० मध्ये ही नदी लुप्त झाली. आता तिच्या विशाल कोरड्या पात्रातून केवळ पावसाचे पाणी वाहते. या पावसाळी नदीला भारतात “घग्गर” व पुढे पाकिस्तानात “हाकारा” या नावाने ओळखले जाते.

 

हडप्पा संस्कृतीची अनेक गावे या सरस्वतीच्या कोरड्या पात्राच्या काठावर सापडली आहेत. इथे सापडलेल्या मुद्रांवरची भाषा व लिपीचा अजून अर्थबोध झाला नाही पण, सरस्वतीच्य काठावर असल्याने या लिपीला “सरस्वती” लिपी किंवा “सिंधू – सरस्वती” लिपी म्हटले जाते. काही अभ्यासकांच्या मते सरस्वती लिपी मधून, नंतरच्या मौर्य काळात वापरली गेलेली ब्राह्मी लिपी विकसित झाली.



सरस्वती लुप्त झाल्यानंतर तिच्या काठावरील नगरातील लोकांनी स्थलांतर केले. त्यानंतर नदी म्हणून गंगेचे महत्व वाढू लागले. वेदोत्तर काळात गंगा नदी व तिच्या तीरावरील तीर्थस्थानांचे महात्म्य वाढले. 

 

२०१६ मध्ये हरयाणा शासनाने एक अभिनव उपक्रम केला. सरस्वती नदीच्या कोरड्या पात्रात पाणी सोडले. हे पाणी त्या पात्रातून कुरुक्षेत्र पर्यंत पोचेल अशी अपेक्षा होती. या पात्रात पाणी खेळवता आले तर राजस्थान मध्ये या वाहिनी द्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो.  


भारतामध्ये सरस्वतीची तुरळक मंदिरे आहेत. त्यापैकी एक आहे तेलंगणा मधील बासरचे ज्ञान सरस्वती मंदिर. या मंदिरात अक्षराभ्यासम् नावाचा विधी करतात. वडील लहान मुलाला / मुलीला मांडीवर बसवून, हाताला धरून पाटीवर “ॐ नम: शिवाय” हा मंत्र लिहितात. लहान मुले आपली पाटी सरस्वतीच्या चरणाला लावून नमस्कार करतात. त्या नंतर त्यांचे शालेय शिक्षण सुरु होते.

 

आणखी एक शारदा पीठ आहे पिलानी येथे. बिर्ला ट्रस्टच्या या सरस्वती मंदिराचे वैशिष्ठ्य असे की त्यावर शास्त्रज्ञांच्या प्रतिमा कोरल्या आहेत.

आता, काश्मीरपूरवासिनी शारदेला नमन करून, उद्या भारताबाहेरील शारदा पूजन पाहू.

नमस्ते शारदे देवी, सरस्वती मती:प्रदे |

वस्तवं मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव: ||

 

References - 

 १.  आचार्य शंकर – स्वामी अपूर्वानंद 

२. http://www.financialexpress.com/lifestyle/science/how-ancient-bakhshali-manuscript-of-india-revealed-real-age-of-zero-10-points/861738/

३.  Development of Sharda Script - Shailendra Aima

४.http://www.indiatimes.com/news/india/saraswati-river-was-lost-over-4-000-years-ago-but-now-haryana-government-is-reviving-it-100-cusecs-at-a-time-259568.html

  • दिपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121