#शक्तीपूजन - दास्यभक्ती

    23-Sep-2017   
Total Views | 43

 

एकनाथ महाराज, एका भारुडात त्यांची नवरात्र पूजा सांगतात –

नवविध भक्तीचे करीन नवरात्र
करोनी पोटी मागेन ज्ञान पुत्र
आईचा जोगवा, जोगवा मागेन ||

नाथ म्हणतात - नऊ दिवस मी तुझी नऊ प्रकारे भक्ती करीन. तुझ्यासमोर रोज भक्तीचा एक एक अविष्कार मांडीन. तू माझ्या भक्तीला पावून, मला ज्ञान दे! आत्मज्ञान दे!

मागे – श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन आणि वंदन भक्ती पाहिली. आता पुढे -



आज सातव्या प्रकारची भक्ती पाहत आहोत – दास्य भक्ती. आद्य दास्य भक्ती हनुमंताने केली. रामकाजासाठी प्राण वेचणारा, रामाज्ञे प्रमाणे वागणारा श्रेष्ठ भक्त हनुमान. सीतेच्या शोधार्थ समुद्र उल्लंघुन जावे लागणार होते. ते त्याच्या क्षमतेच्या पलीकडले आहे असे त्यास वाटत होते. पण रामाचे काम म्हटल्यावर त्याने स्वत:ला त्यासाठी झोकून दिले! त्याच्या भक्तीनेच त्याची क्षमता वाढली.
रामदास स्वामी स्वत:ला “रामाचा दास” म्हणवून घेतात. त्यांनी आपल्या नावातच “दास” लावले.

मीराबाई म्हणते -

मीरा के प्रभू, ब्रिज के वासी |
तुम मेरे ठाकूर, मै तेरी दासी ||
जो तुम तोडो पिया, मै नाही तोडू रे ||

 

तर कबीर रामाला म्हणतात –

मै गुलाम, मै गुलाम, मै गुलाम तेरा |
तू साहेब मेरा सच्चा, नाम लेउं तेरा ||

 

दासपणात काय आनंद आहे? विवेकानंद म्हणतात, दासपणात कसलेही अधिकार राहत नाहीत. अमुक हवे तमुक नको अशा इच्छा मनात उठत नाहीत. जे मिळते ती त्याची कृपा वाटते. त्याबद्दल कृतज्ञता वाटते. आपले प्रत्येक कर्म आपलं कर्तव्य वाटते आणि ते केल्याबद्दल कसल्याही प्रकारच्या कौतुकाची, मोबदल्याची अपेक्षा राहत नाही.


दास्याची पुढची अवस्था आहे सख्य भक्ती. भगवंताशी सख्य करायला – त्याला आवडेल असे वागावे. त्याला जे आवडेल ते ऐकावे. त्याला जे आवडते ते करावे. हळूहळू आपली इच्छा मावळून, केवळ भगवंताची इच्छा उरते. भगवंतावर आपले प्रेम जसे जसे स्थिर होते तसे तसे त्याचेही आपल्यावर प्रेम स्थिर होते.


एकदा काय झालं? नारदमुनी विष्णूला भेटायला गेले, तेंव्हा द्वारपालाने त्यांना बाहेर थांबवून सांगितले - भगवान पूजा करत आहेत. पूजा झाल्यावर भेटतील. नारदांना प्रश्न पडला, आम्ही एक देवाची पूजा करतो, देव कुणाच्या पूजेत गुंतला? 


विष्णु पूजा आटोपून आल्यावर नारदांनी आपला प्रश्न उपस्थित केला. तेंव्हा भगवान त्याला आत घेऊन गेले. भगवंताच्या देवघरात नारदांनी ध्रुव, प्रल्हाद, अर्जुन, नारद आदींच्या यांच्या मुर्ती पहिल्या! विष्णू म्हणाले - जसा भाव तसा देव! माझ्यावर जीव टाकून प्रेम करणाऱ्यावर मी पण निरंतर अलोट प्रेम करतो!


ज्ञानेश्वर म्हणतात –

एरहवी तरी पाही | जे जैसे माझ्या ठायी |
भजती तैसा मीही तयासी भजे || ४.६६ ||

अर्जुना! माझ्यावर माझा भक्त जसं प्रेम करतो, तसंच मीही त्याच्यावर प्रेम करतो.

 

आणि सर्वात शेवटची भक्ती म्हणजे – आत्मनिवेदन. ही सर्वात श्रेष्ठ प्रकारची भक्ती आहे. या मध्ये मी आणि भगवंत वेगळे नाहीच. एकच आहेत. “मी तो आहे, आणि तो मी आहे” अशी अवस्था. ज्ञानेश्वर एका ओवीत त्यांच्या या अवस्थेचे वर्णन करून जातात -

न मीचि जरी हो म्हणे | तरी श्रीरंगी दुजे हेची उणे |
म्हणौनि हे बोलणे | देवाचेची || १७.३८६ ||

“हे शब्द मी म्हणतो, भगवंत नाही!” असे जर मी म्हणालो, तर त्याला “माझ्यापेक्षा वेगळा” असे म्हणाल्यामुळे त्याला उणेपणा येईल. त्यामुळे मी जे बोलतोय ते देवाचेच शब्द आहेत! मी आणि भगवंत वेगळे नाहीच!

ईश्वराची भक्ती करण्यासाठी सुद्धा त्याची कृपा लागते. भक्ती करिता त्याच्याकडे याचना करावी लागते. या अभंगात संत सर्व प्रकारची भक्ती मागत आहेत – श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चना, दास्य इत्यादी.

सदा माझे डोळा दिसो तुझी मूर्ती | हीच माझी आरती गुरुराया ||
सदा माझे कानी तुझे गुणगान | नको त्याहुनी आन गुरुराया ||
सदा माझे मुखी वसो तुझे नाम | चालवावा नेम गुरुराया ||
सदा माझे हस्ते घडो तुझी पूजा | नको भाव दुजा गुरुराया ||
सदा माझे मन राहो तुझे ध्यानी | तूच माझा धनी गुरुराया ||
कलीमलदहना सत्यज्ञानानंता | कृपा करी आता गुरुराया ||

कुंभारकिड्याच्या अळी बद्दल असे सांगितले जाते की – ती अळी त्या किड्याला पाहते, सतत त्याचे स्मरण करते, हळूहळू तिला त्याचा ध्यास लागतो, आणि शेवटी ती अळी कुंभारकिडा होते! या नऊ भाक्तींचा प्रवास त्या अळी सारखा आहे. सुरुवात भगवंताबद्दल ऐकून होते, त्याचे स्मरण, त्याची सेवा करत करत शेवटी भक्त भगवंत होतो!


एकनाथांच्या भारुडा बरोबर आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी भक्तीचे नऊ प्रकार पहिले. त्या भारूडातील पुढची ओळ आहे – नवविधा भक्ती केल्यावर मला ज्ञान दे! भक्तीच्या पोटी ज्ञानाचा जन्म होतो असे संत म्हणतात, ते हेच. चराचरात ईश्वराचा साक्षात्कार होणे, हेच ज्ञान. एकनाथांच्या दुसऱ्या अभंगात हेच ज्ञान उचंबळून म्हणते –

काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल | नांदतो केवळ | पांडुरंग ||
देखिली पंढरी, देही जनी वनी | एकाजनार्दनी | वारी करी ||

 

- दिपाली पाटवदकर

 

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121