नातं, मग ते कुठलं का असेना खूप खास असतं. मात्र तेव्हाच जेव्हा ते घट्ट प्रेमाच्या धाग्यांने विणलेलं असतं. आधीच्या काळात नाती जास्त टिकायची कारण 'मी' च्या आधी 'आपण' ला स्थान होते. मात्र आता तसे नाही. आजच्या 'सेल्फ सेंट्रिक' जगात नाती फारशी टिकत नाहीत. मात्र वय वाढल्यावर कदाचित या नात्यांची किंमत आपल्या लक्षात येते. दूरचा विचार करून आजच ही नाती सांभाळली, जपून ठेवली तर आयुष्य कित्ती सुंदर होईल नाही.
अशीच काहीशी कथा दाखवण्यात आली आहे, 'कथा' या लघुपटात. एक मुलगा आणि मुलगी रॅस्टोरंट मध्ये भेटतात. कारण म्हणजे त्यांचा ब्रेकअप. दोघेही दोन चिट्ठींमध्ये ब्रेकअपच्या कारणासाठी आपापले मुद्दे लिहून आणतात, आणि अगदी सहजपणे आपलं नातं मोडतात. जसे की दोघांनाही याने काही फरकच पडत नाही. तेव्हाच तिथे येतो एक आणखी माणूस त्यांना त्यांचे भविष्य दाखविण्यासाठी. तो असे काय दाखवतो, ज्यांने त्यांचे डोळे ताडकन उघडतात? ते पुन्हा एकत्र येतात का? पुढे काय होतं? हे जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्कीच बघा..
आजची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, की नातं तुटल्याचा त्रास तर दूरच साधा एक अश्रु देखील डोळ्यात येत नाही. आधी नातं तुटलं की आयुष्य उध्वस्त व्हायचं मात्र आता? आता खरंच तसं होतं का? अशीच काहीशी परिस्थिती या लघुपटात दाखविण्यात आली आहे. या लघुपटाला यूट्यूबवर ६ लाख ३० हजार व्ह्यूज आहेत. हर्ष चौधरी दिग्दर्शित आणि लकी, प्राची, विशाल, अंशुल आणि अमृता अभिनित हा लघुपट एकदा तरी नक्कीच बघा.
- निहारिका पोळ