विष्णूच्या दहा अवतारांपैकी वराह अवतार हा तिसरा अवतार मानला जातो. पुराणातल्या गोष्टीनुसार जय व विजय ह्या श्रीविष्णूच्या द्वारपालांना ऋषी शाप देतात की, त्यांचा जन्म राक्षसकुळात होईल आणि श्रीविष्णूचे हस्ते त्यांचा वध झाला तरच त्यांना मोक्ष मिळेल. त्याप्रमाणे जय व विजय कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी दिती ह्यांच्या पोटी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू ह्या नावाने जन्म घेतात. हे दोघेही दैत्य बंधू अत्यंत शक्तिशाली असतात. हिरण्याक्ष कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवतो की, कुठलाही प्राणी किंवा मनुष्य त्याचा वध करू शकणार नाही. त्या वरच्या सामर्थ्याने उन्मत्त होऊन मग हिरण्याक्ष पृथ्वीचा छळ आरंभतो आणि पृथ्वीला म्हणजेच भूदेवीला पळवून एकार्णवात म्हणजे आदिम समुद्रात लपवून ठेवले. त्यामुळे भयभीत होऊन सर्व देवांनी श्रीविष्णूला साकडे घातले. श्रीविष्णूने मग वराहाचे रूप घेऊन समुद्रात मुसंडी मारून हिरण्याक्षाचा वध केला व भूदेवीचा उद्धार केला.
गुप्त राजांच्या काळात वराहोपासना जोरात होती. संकटात बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करणारा श्रीविष्णू हे रूपक त्या काळच्या गुप्त राजांना भावले असावे. फ्रेडरिक आशर ह्या गुप्त काळाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकाने असे म्हटले आहे की मध्यप्रदेश मधल्या विदिशाजवळच्या उदयगिरी गुंफांमधली ही महाकाय वराहमूर्ती म्हणजे गुप्त राजांनी तोपर्यँत राजकीय दृष्ट्या विस्कळीत असलेला उत्तर भारत एकसंध केला आणि आपल्या एकछत्री अंमलाखाली आणला त्या विजयाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे श्रीविष्णूनी वराहावतारात येऊन असहाय्य पृथ्वीचा उद्धार केला, त्याचप्रमाणे पराक्रमी गुप्त सम्राटांनी उत्तर भारताचा उद्धार केला, म्हणून हे शिल्प विशेष महत्वाचे आहे. इसवीसनाच्या पाचव्या शतकात कोरले गेलेले हे महाकाय शिल्प भारतात सापडलेल्या प्राचीनतम वराहमूर्तीं पैकी एक आहे. वराह हे राजचिन्ह म्हणून पुढे अनेक राजवंशानी वापरले. वातापीच्या चालुक्यांनी वराहाचे चित्र असलेली नाणी पाडली. पुढे अगदी विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत वराहा अवताराचा राजचिन्ह म्हणून उपयोग होत होता.
उदयगिरीच्या पांच नंबरच्या गुंफेत असलेले हे महाकाय भित्तीशिल्प बघून आपण अवाक होऊन जातो. हा वराह नृवराह आहे, म्हणजे त्याचे शरीर माणसाचे आणि तोंड तेव्हढे वराहाचे आहे. एक पाय जमिनीवर ठामपणे रोवलेला आणि दुसरा पाय उचलून एका शिळेवर ठेवलेला अश्या आवेशपूर्ण आलीढ मुद्रेत श्रीविष्णू उभे आहेत. वराहमूर्तीच्या पोटऱ्या, पाय आणि एकूणच शरीर अत्यंत सौष्ठवपूर्ण आणि प्रमाणबद्ध आहे.
त्या काळात मानवी शरीराला प्राण्याचे मुख बसवताना शिल्पकारांना गळ्याचे काय करायचे हे कळले नसावे, कारण ह्या मूर्तीला गळा दिसत नाही. पण भारतातली सिक्स पॅक ऍब्स असलेली ही कदाचित पहिली मूर्ती असावी. ह्या महावराहाच्या मस्तकावर मुकुट नाही. श्रीविष्णूच्या शिल्पांकनात पुढे प्रचलित झालेली चिन्हे म्हणजे शंख, चक्र, आणि गदा ही देखील ह्या शिल्पात दिसत नाहीत. मूर्ती द्विभुज आहे. मूर्तीच्या अंगावर आभूषणेही फारशी नाहीत. गुढघ्यापर्यंत येणारी वैजयंतीमाला तेव्हढी दिसते.
महावराहाच्या खांद्यावर भूदेवी आरूढ आहे. तिचे मस्तक आता तुटलेले आहे पण वराहमूर्तीच्या महाकाय आकारापुढे भूदेवी किती नाजूक दिसते बघा. भूदेवीची मूर्तीही अतिशय अनलंकृत अशीच आहे. मागे भिंतीवर गोलाकार कमलपुष्प उगवलेले आहे. वराहाच्या पायाशी हात जोडून नागदेवता आहे, एकार्णव समुद्राचे प्रतीक म्हणून आणि मागे भिंतीवर हिरण्याक्षाचा वध झाल्यामुळे आनंदी दिसणारे ऋषी-मुनी हात बांधून उभे आहेत.
ही मूर्ती बघताना ती मूर्ती कोरणाऱ्या शिल्पकारांची प्रतिभा आज इतकी शतके लोटली तरी आपले डोळे दिपवते. इतक्या सगळ्या लहानमोठ्या मूर्ती असूनदेखील संपूर्ण शिल्प कुठेही बेढब किंवा तोल सुटलेलं वाटत नाही. छोट्या छोट्या प्रतिमा देखील उत्तम साकारलेल्या आहेत. वराहाचा तो महाकाय आकार, त्याचा आवेश, वराहाच्या बलदंड शरीराच्या कणाकणातून जाणवणारं पुरुषी राकट सौंदर्य आणि सामर्थ्य आणि वराहाच्या खांद्यावर बसलेल्या भूदेवीचे नाजूक सौंदर्य एकमेकांना पूरक असेच आहे. आज उदयगिरीच्या ह्या गुंफा फार दुर्लक्षित अवस्थेत आहेत, पण गुप्तकाळात ह्या गुंफा कश्या दिसत असतील आणि त्या बघायला येणाऱ्या भाविकांची मने हे अद्भुत शिल्प बघून कशी भारावून जात असतील ह्याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. मुद्दाम जाऊन बघण्यासारखे हे उदयगिरीचे महवराहाचे शिल्प आहे.
- शेफाली वैद्य