तथाकथित विवेकवाद्यांचा अविवेक

    14-Sep-2017   
Total Views | 1
 

 
 
गौरी लंकेश पंतप्रधानांना सॅनिटरी नॅपकिन पाठविण्याच्या तयारीत असलेल्या महिला कार्यकर्तीला सल्ला देतात की ’’वापरलेले का देऊ नये ?’’ गौरी लंकेशची हीच मते असतील तर ती मान्य असो किंवा नसो, ती ऐकली किंवा पाहिली पाहिजेतच. डाव्यांना अशी व्यक्ती निष्पक्ष व विचारवंत वाटत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. असेच विचारवंत जर त्यांना वैचारिक मार्गदर्शन करणारे वाटत असतील, तर लोकशाहीत ते किमान ऐकून तरी घेतले पाहिजे. मात्र, अशांना निष्पक्ष व विचारवंत म्हणून संपूर्ण समाजावर थोपणे नक्कीच निषेधार्ह आहे.
 
 
 
 
गौरी लंकेश यांच्या दुर्दैवी हत्येनंतर देशात एकाएकी विवेकाचा पूर आला. संघ परिवाराला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे जबरदस्त प्रयत्न झाले. जिवंत असताना जिच्या अस्तित्वाची कल्पनाही नव्हती, त्या गौरी लंकेशच्या मृत्यूनंतर राहुल गांधी वगैरेंनी आसवे गाळली. गांधीजींच्या बाबतचे विधान त्यांनी पुन्हा केले नाही, कारण भिवंडीच्या कोर्टात मारायला लागलेल्या त्यांच्या फेर्‍या अजूनही काहीशा ताज्या आहेेत. राजकारण्यांचे सोडा, त्यांच्या वागणुकीत सदैव नजीकचा टप्पाच असतो. काही लोकांना यानिमित्त हिंदुत्ववाद्यांवर लाथा झाडण्याचे गाढवचाळे करायची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. मात्र, ज्यांनी विवेकाचा गजर करायचा ठेका घेतला आहे, अशांनीही या चाळ्यांमध्ये जोरदार सहभाग घेतला. कुणाही डाव्या विचारवंताची हत्या झाली की हिंदुत्ववाद्यांना त्यात ओढण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. आता काळ सरला आणि गांधीहत्येचे बालंट संघावर थोपणार्‍यांना स्वयंसेवकांनी न्यायालयातच न्यायला सुरुवात केल्याने अलीकडे ती पोपटपंची करणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. मात्र, विवेकाचा गजर करीत अविवेकाचे वर्तन बजावणार्‍यांची समाजातील संख्या किती मोठी आहे, याचा परिचय गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर आला. ‘लोकमान्यते’चा दावा करणार्‍या मराठी दैनिकाने गौरी लंकेश यांची हत्या भाजप समर्थकांनी केली, असे स्पष्टपणे आपल्या संपादकीय पानावर प्रकाशित झालेल्या लेखात लिहिले आहे. 
 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दि. ६ सप्टेंबरला ‘भारत की कम्युनिस्ट पार्टी’ (माओवादी) यांनी एक परिपत्रक जाहीर केले आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘ब्राह्मणीय हिंदुत्ववादी फासीवादी संघ परिवार की गुंडा ताकतो जिन्हे केंद्र मे सत्तारूढ भाजप सरकार का संपूर्ण समर्थन व संरक्षण प्राप्त है, द्वारा ५ दिसंबर की रात ८.३० बजे को बंगलूरू मे लंकेश साप्ताहिक पत्रिका की संपादक, प्रगतिशील जनवादी व वामपंथी विचारधारा की सामाजिक कार्यकर्ता ५५ साल की गौरी लंकेश की गोली मारकर हत्या की गई|’ वरील ओळी आणि माध्यमात गौरी लंकेश यांच्या हत्येच्या विरोधात सूर आळविणार्‍या डाव्यांच्या हितचिंतकांच्या लेखामध्ये इतके साम्य का आहे? या प्रश्नाचे उत्तर कधीतरी विवेकाचा डंका पिटणार्‍या तथाकथित विचारवंतांना द्यावे लागेल. गौरी लंकेश आणि ज्या इतर डाव्या विचारवंतांच्या हत्या झाल्या, त्या सगळ्याच निंदनीय आहेत. खून करून विचार संपत नसतात, उलट खून झाल्याने विचार मांडणारी व्यक्ती अजरामर होऊन जाते. जितेपणी तिला कुणीही विचारत नाही, मात्र मृत्यूनंतर तिचे ताबूत नाचविले जातात आणि राहुल गांधीसारखे लोक अशा उरूसात नाचायची आपली हौस भागवून घेतात. अनेकांसाठी माध्यमांवर ‘निष्पक्ष’ म्हणून झळकण्याची ही संधी असते. केरळमध्ये झालेल्या हत्यांच्या संदर्भात इथे विषय काढला की त्या विषयाला फाटे फोडले जातात. मात्र, तीच हत्या कुणा डाव्याची झाली की, सगळे एकजात रडायला हजर होतात. ज्या डाव्या विचारवंतांच्या हत्या झाल्या, त्यात काही प्रमाणात दाभोलकर वगळता उरलेल्या सगळ्यांनी आयुष्यभर उजव्याच्या नावाखाली संघपरिवाराला दूषणे देण्यातच धन्यता मानली होती. 
 
गौरी लंकेशही त्यात तसूभरही मागे नव्हत्या. कधी काळी डाव्यांसाठी कॉंग्रेस ही ‘फासीवादी’ ताकद होती आणि नंतर हळूहळू संघ त्यांच्यासाठी ‘ब्राह्मणीय हिंदुत्ववादी फासीवादी’ झाला. पुढे जाण्यासाठी कुठलाही अजेंडा यांच्याकडे नाही. महत्त्वाचे म्हणजे ज्यांचे स्वत:चे हात हजारो निष्पाप लोकांच्या हत्येने बरबटले आहेत त्यांनी इतरांच्या हत्येचे निषेध करावे, हे जरा अजबच झाले. हे झाले माओवाद्यांचे. आपल्याकडच्या तथाकथित विचारवंतांचे काय? गौरी लंकेश यांच्या ट्विटर अकाऊंटवर जाऊन त्यांनी केलेले ट्विट आजही जरूर पाहावे. सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी कर वाढला, त्यावेळी अनेक महिला संघटनांनी त्याविरोधात आवाज उठवला. नंतर सरकारने तो कमी केला. गौरी लंकेश पंतप्रधानांना सॅनिटरी नॅपकिन पाठविण्याच्या तयारीत असलेल्या महिला कार्यकर्तीला सल्ला देतात की, ’’वापरलेले का देऊ नये?’’ एका परदेशी पंतप्रधानांसोबतचा मोदींचा फोटो गौरी लंकेश यांना समलैंगिक विवाहाचा फोटो वाटतो. लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा हक्क आहे. गौरी लंकेशची हीच मते असतील तर ती मान्य असो किंवा नसो, ती ऐकली किंवा पाहिली पाहिजेतच. डाव्यांना अशी व्यक्ती निष्पक्ष व विचारवंत वाटत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. असेच विचारवंत जर त्यांना वैचारिक मार्गदर्शन करणारे वाटत असतील, तर लोकशाहीत ते किमान ऐकून तरी घेतले पाहिजे. संघपरिवाराचा द्वेष करण्यात कोण किती पुढे जाऊ शकतो आणि किती गलिच्छ लिहू शकतो, यावर यापुढच्या काळात डाव्यांमधील नेतृत्वाचे निकष ठरणार आहेत. मात्र, अशांना निष्पक्ष व विचारवंत म्हणून संपूर्ण समाजावर थोपणे नक्कीच निषेधार्ह आहे. 
 
गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करावा तितका कमीच, परंतु विचारांना विरोध करणार्‍या किंवा आपल्या विरोधी विचार बाळगणार्‍यांची हत्या करण्याची रीत आपल्याकडे कुठून आली आणि तिचा स्त्रोत काय याचा विचार केला पाहिजे. ही परंपरा सेमेटिक धर्मांमधून आली आहे. इस्लामआणि ख्रिश्र्चन अशा दोघांनीही या पद्धतीचा उपयोग धर्मप्रचारासाठी पुरेपूर करून घेतला. कट्टरवादी इस्लामिक दहशतवादावर बोलावे तितके कमीच आहे आणि गोव्यात ख्रिस्ती धर्म न स्वीकारणार्‍यांना शिक्षा देण्याचा छळस्तंभ आजही उभा आहेच. सगळ्याच धर्मात असे माथेफिरू असतात. मात्र, हिंदू धर्मात काही तुरळक अपवाद वगळता विचारांची लढाई विचारांनीच करण्याची परंपरा आहे. अगदी शंकराचार्यांनाही आपली विद्वत्ता सिद्ध करण्यासाठी अनेक वादविवाद जिंकावे लागले होते. हत्येला हत्येचाच जबाब देणार्‍या या सगळ्यांचा निषेध करावा तितका कमीच आहे, मात्र आपल्या विचारविश्र्वात शिरलेले हे अविवेकी अतिरेकी कसे रोखायचे? हा समाजापुढचा खरा प्रश्न असेल. 
 
 
- किरण शेलार
 

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121