
दोन दिवसांपासून एक श्वास रोखून धरणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. एक छोटं बाळ त्याच्या बहिणीपाठोपाठ घसरगुंडीवर चढण्याचा प्रयत्न करतंय.. हात-पाय नसलेलं ते बाळ काही वेळाने यशस्वी होतं आणि आपण सुटकेचा श्वास सोडतो. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिन्द्रा यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता. हा व्हिडिओ पाहून बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा भावूक झाले होते. महिन्द्रा यांनी ट्विट करताना लिहिले की, ’’या मुलाची जिद्द पाहून मला वेगळीच प्रेरणा मिळाली आहे. मी स्वत: कधीच प्रयत्नात कसूर करणार नाही.’’ प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश मिळणारच हे वास्तव आहे. या वास्तवाचं उत्तम उदाहरण म्हणजे सी. गणेसन. दक्षिण तामिळनाडूमध्ये नागरकोईल नावाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यापासून अंदाजे ९ किमीवर थलाकुडी नावाचं खेडं आहे. या खेडेगावात चनबगम गणेसनचा जन्म झाला. गणेसनला ८ भावंडे होती. त्यामध्ये त्याचा चौथा नंबर. वडिलांकडे अर्धा एकर जमिनीचा तुकडा होता. त्यातून महिन्याला १०० रुपये उत्पन्न मिळायचे. १९६० च्या आसपासचा हा काळ होता. आई, बाबा आणि ८ भावंडं असं हे दहाजणांचं कुटुंब होतं. दोन दिवसांतून एकदाच त्यांना पुरेसं जेवायला मिळायचं. इतकी हलाखीची परिस्थिती होती. तसं गावच्या शाळेतील शालेय शिक्षण मोफत होतं, मात्र गणेसन ते शिक्षण परिस्थितीअभावी पूर्ण करू शकला नाही. पाठ्यपुस्तक नाही. पाच विषयांसाठी एकच वही. यामुळे मास्तर दररोज मारायचे. वह्या-पुस्तकं खरेदी करण्याएवढे वडिलांकडे पैसेच नसायचे. शेवटी मास्तरांच्या माराला कंटाळून गणेसनने शिक्षणालाच रामराम ठोकला. १९७१ साली त्याने घर सोडलं आणि नागरकोईलला आला. नागरकोईलला आला त्यावेळेस त्याच्याकडे रुपयापेक्षा देखील कमी पैसे होते.
१६ वर्षांचा गणेसन एका गॅरेजमध्ये राहू लागला. त्याच गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करू लागला. सुखाची गोष्ट म्हणजे आता तो १२ रुपये कमवायला लागला होता. त्याच वयात त्याने ठरवलं की, भविष्यात आपण आपलं स्वत:चं गॅरेज सुरू करायचं. त्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी मात्र १९८६ साल उजाडलं. त्याने स्वत:चं गॅरेज सुरू केलं. त्याच्या गॅरेजचं बस्तान बसलेलं. याचा पुढचा आणखी एक टप्पा म्हणजे जुने ट्रक घेऊन तो ते दुरुस्त करायचा. त्याचा कायापालट करून एकदम नवीन ट्रक तो तयार करून विकू लागला. हा व्यवसायदेखील चांगलाच जोर धरू लागला. १९९० नंतर आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागले होते. बाजारपेठेत एक नवीन उत्साह संचारला होता. व्यवसाय उद्योगासाठी तो एक चांगला काळ होता. काळाची पावले ओळखून गणेसनने ट्रान्सपोर्टेशनमध्ये पाऊल ठेवले. ट्रान्सपोर्टेशनसाठी त्याने तब्बल २३ टक्के व्याजदराने कर्ज काढून ट्रक विकत घेतले. ‘गुरुवयूर माथवन लॉरी सर्व्हिस’ नावाची गणेसनची कंपनी सुरू झाली. २००४ पासून तर त्याने वर्षाला २ ट्रक घेण्याचा सपाटाच लावला. मात्र, २००८च्या जागतिक आर्थिक महामंदीने ट्रक घेण्याच्या वेगाला अल्पविराममिळाला. आज गणेसनकडे १५ ट्रक असून ५० कामगार कार्यरत आहेत. त्याने आपलं आणि आपल्या कुटुंबाची सगळी कर्जे फेडली. त्याची तिन्ही मुले आज उत्तम दर्जाचं शिक्षण घेत आहेत. नागरकोईल जिल्ह्यात जिथे आल्यावर त्याच्याकडे १०० पैसे देखील नव्हते तिथे आज त्याने २००० चौरस फुटाचे स्वत:चे घर बांधले आहे. दिमतीला ३ गाड्या देखील आहेत. तसं पाहिल्यास ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय हा धोकादायक व्यवसाय आहे. १० पैकी ९ माणसे यामध्ये अयशस्वी होतात मग ते हा व्यवसाय सोडून देतात. मात्र गणेसनच्या यशाचं रहस्य काहीसं वेगळं आहे. व्यवसायातून मिळालेला पैसा वायफळ खर्च न करता पुन्हा त्याच व्यवसायात त्याने गुंतविला. धंद्यावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्याच्या जीवावर हा व्यवसाय चालायचा त्या ट्रकची त्याने चांगलीच निगराणी ठेवली. वेळच्या वेळी त्याच्या डागडुजीकडे लक्ष दिलं. जास्तीत जास्त रिटर्न्स देणे हे मेकॅनिकच्या पेशानेच त्याला शिकवलं होतं. गणेसनने ते फक्त अंमलात आणलं. नेहमी परिस्थितीला दोष देणार्यांसाठी सी. गणेसनसारखे उद्योजक एक आदर्श आहेत.
- प्रमोद सावंत