संमेलन आणि वादाची ही परंपरा जपतो आम्ही...

    13-Sep-2017   
Total Views | 24
 

 
 
साहित्य संमेलन आणि वाद यांचे अगदी जवळचे नाते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तिथे बुलढाण्यामध्ये बहुप्रतिक्षित ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची घोषणा नुकतीच करण्यात आली आणि ज्या आश्रमामध्ये हे साहित्य संमेलन घेतले जाणार आहे, ते ठिकाण वादग्रस्त असल्याचे सांगत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नाराजी व्यक्त केली. अर्थात, साहित्य संमेलनाची घोषणा झाल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे उफाळून येणारे वाद, मतभेदांची परंपरा गेल्या काही वर्षांपासून अजूनही राखली जात आहे. त्यामुळे साहित्य संमेलनांमधून आपण काय शिकलो, कोणते नवीन विषय समजले, याची चर्चा होण्याऐवजी निर्माण होणार्‍या वादाची चर्चा गेल्या काही वर्षांपासून अधिक रंगू लागली. याआधी यंदाचे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे घ्यायचे यावरून मतभेद झाले होते. बुलढाणा, बडोदा आणि दिल्ली असे पर्याय समोर ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, साहित्य संमेलन कुठे घ्यायचे हे ठरविण्यासाठी यावर चर्चा केली जायची. यंदा मात्र निवडणूक घेऊन साहित्य संमेलनाची जागा ठरविण्यात आली आहे. आता बुलढाण्यामध्ये साहित्य संमेलन होणार यावर शिक्कामोर्तब होताच, ज्या ठिकाणी हे संमेलन भरविण्यात येणार आहे ते हिवरा आश्रमम्हणजे शुकदास महाराज या वादग्रस्त बाबांचा आश्रमअसल्याचे सांगत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वादात उडी घेतली आहे. तरीही हे वाद अगदीच किरकोळ आहेत. ज्या आश्रमाच्या स्वामींवर आरोप आहेत, त्या आश्रमाने हे संमेलन घेतलेलेच नाही. संमेलन भरवणार्‍या संस्था वेगळ्याच आहेत. या आश्रमाची जागा व्यापक आहे आणि तिथे चांगल्या सोयी होऊ शकतात म्हणून त्या आश्रमाची निवड संमेलन स्थळ म्हणून करण्यात आली आहे. अंनिस ही तर्कशुद्धपणे विचार करणारी संघटना आहे. तेव्हा त्यांनी असा आक्षेप घेणे गैर आहे. मुळातच आरोप कोणावरही आणि काहीही करता येतात. आपण केलेले आरोप हे पुराव्यांनी सिद्ध करून दाखवावे लागतात, तरच त्याला अपराधी मानता येते. तसंही गेल्या काही वर्षांपासून ज्या-ज्या ठिकाणी साहित्य संमेलने भरविण्यात आली आहेत, ती सहा शहरी भागांमध्ये भरविण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये साहित्य संमेलने घेतल्यास ग्रामीण भागात साहित्य पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे, ही बाब निश्चितपणे लक्षात घ्यायला हवी.
 
 
 
असा आहे इतिहास !
१९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर या त्या-त्या प्रदेशात कामकरणार्‍या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङ्‌मयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडविण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेतला. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ. महामंडळाच्या स्थापनेपर्यंत मराठीची जी साहित्य संमेलने भरत होती ती पुण्याच्या म.सा.प.च्यावतीने भरवली जात होती. या संमेलनांना ’महाराष्ट्र साहित्य संमेलन‘ असेच तोपर्यंत म्हटले जात होते. त्यानंतर साहित्य महामंडळाने कामसुरू झाल्यानंतर शक्यतो दरवर्षी एक साहित्य संमेलन भरवावे, असा निर्णय १९६४ मध्ये मडगांवमध्ये झालेल्या ४५व्या साहित्य संमेलनात घेतला आणि १९६५ मध्ये हैदराबाद येथे जे ४६ वे साहित्य संमेलन झाले, ते महामंडळाचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जन्मले आहे. प्रत्यक्षात ते महामंडळाचे पहिले साहित्य संमेलन असतानाही महाराष्ट्र साहित्य संमेलनाचेच ते नवे रूप असल्यामुळे क्रममात्र जुनाच चालू ठेवण्यात आला आणि पुढील संमेलनांना महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, असे नाव देण्यात आले. तेच आजवर सुरू आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांना १८७८ मध्ये पुण्यामध्ये पार पडलेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान मिळाला होता. त्यानंतर महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच लेखिका अध्यक्ष झालेल्या होत्या. तसेच महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या तीन लेखिका अध्यक्ष झालेल्या आहेत. तसेच शंकरराव खरात आणि केशव मेश्रामहे दोन दलित लेखक आणि यु.म. पठाण हे मुस्लीमलेखक अध्यक्ष झालेले आहेत. यंदाचे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी २०१८ मध्ये होणार आहे. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, रवींद्र शोभणे, रवींद्र गुर्जर, किशोर सानप व राजन खान यांची नावे यावर्षीच्या संमेलनासाठी चर्चेत आहेत. येत्या काळात यावरून वाद निर्माण होतील. त्यामुळे साहित्यप्रेमींनी याची मानसिक तयारी आतापासूनच करून ठेवायला पाहिजे.
 
- सोनाली रासकर

सोनाली रासकर

समाजशास्त्र, इतिहास घेऊन बी.ए. पत्रकारिता व मास कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा केला आहे. फिचर स्टोरी, तसेच  सामाजिक विषयावरील लिखाणाची आवड, गुन्हेगारीशी संबंधित मालिका बघण्यामध्ये रस. सध्या दै. ’मुंबई तरूणभारत’मध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121