रंगभूमीवरचा अजरामर तारा

Total Views |

 
 
 
गोमू संगतीनं, माझ्या तू येशील काय...
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय...
 
’हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील या गीताने सर्वच रसिकांना अगदी मंत्रमुग्ध केले होते. त्या काळी या गाण्याचे शब्द अगदी पावसाच्या थेंबाप्रमाणे सर्वांच्या ओठांवरून ओघळत होते. हे गाणं म्हणजे आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनात घर करणारे आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे कलाकार आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या चित्रटातले. आज, दि. १४ सप्टेंबर ही डॉ. काशिनाथ घाणेकर यांची जयंती.
 
 
डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३२ साली झाला. ते मूळचे चिपळूणचे. लहानपणी अगदी खोडकर स्वभावाचे असलेले घाणेकर आपल्या गावातून रामोशांची घोडी घेऊन गावातून पळवत असत. डॉ. घाणेकर पेशाने दंत शल्यचिकित्सक होते. मात्र, ६० च्या दशकात त्यांनी चित्रपट क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. कलंदर व्यक्तिमत्वाचा मनस्वी कलावंत अशी घाणेकर यांची ओळख. आपल्या मनमोहक रूपाने आणि तितक्याच ताकदीच्या अभिनयावर स्वत:ला झोकून देत त्यांनी सादर केलेल्या भूमिकांनी कलारसिकांना मोहिनी घातली होती. 
 
 
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला डॉ.काशिनाथ घाणेकर यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. वसंत कानेटकरांच्या ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात त्यांनी साकारलेली छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका अजरामर आहे. या नाटकातील छत्रपती संभाजीराजे यांची त्या तोडीची भूमिका दुसरं कोणीही साकारू शकणार नाही, हे त्यांची भूमिका पाहिलेले रसिक आजही सांगतात. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अभिनय आणि भारदस्त आवाजाच्या जोरावर डॉ. घाणेकरांनी संभाजीराजांच्या भूमिकेतून सर्वांच्याच मनात घर केले होते. राजदत्त यांचे दिग्दर्शन असलेल्या, तसेच डॉ. घाणेकर आणि अभिनेत्री उमा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’मधुचंद्र’ या चित्रपटातील गाणीही अतिशय गाजली, तर ’अभिलाषा’ या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिकाही सर्वांच्या मनात घर करून गेली. 
 
 
’इशे ओशाळला मृत्यू, ’अश्रूंची झाली फुले’, ’गारंबीचा बापू’, ’आनंदी गोपाळ’, ’शीतू’, ’तुझे आहे तुजपाशी’, ’सुंदर मी होणार’ आणि ’मधुमंजिरी’ सारख्या नाटकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर छाप सोडली, तर ’धरमपत्नी’, ’पाठलाग’, ’मराठा तितुका मेळवावा’, ’दादी मा’, ’मधुचंद्र’, ’एकटी’, ’प्रीत शिकवा मला’, ’अभिलाषा’, ’देव माणूस’, ’अजब तुझे सरकार’, ’झेप’ आणि ’हा खेळ सावल्यांचा’ सारख्या चित्रपटातही त्यांचा अभिनय सर्वांच्या पसंतीस पडला आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पाहिले तर त्यांचा आणि त्यांच्या पहिल्या पत्नी इरावती भिडे यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांची कन्या कांचन यांच्याशी विवाह केला. कांचन घाणेकर यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या ’नाथ हा माझा’ या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. २ मार्च १९८६ रोजी घाणेकर कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या नटाचं अमरावतीमध्ये नाट्यप्रयोगाच्या दौर्‍यावर असताना झोपेतच निधन झालं. त्यांच्यासारख्या अष्टपैलू कलाकाराची रंगभूमीवरील कला आजच्या पिढीला पाहायला न मिळणं हे या पिढीचं दुर्भाग्य म्हणावं लागेल. 
 
 
- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.