शिल्पकथा ह्या माझ्या नवीन सदरातील हा पहिला-वाहिला लेख. कुठल्याही शुभ कार्याची सुरवात नेहमी गणेश वंदनेने करायची असा आपल्या संस्कृतीत संकेत आहे. त्यामुळे ज्या शिल्पाबद्दल मी आज लिहिणार आहे ते आहे विघ्नहर्त्या गजाननाचं. विघ्नांचा नाश करून मांगल्याची, पावित्र्याची स्थापना करणारा देव म्हणून श्री गणेशाला हिंदू धर्मात अग्रपूजेचा मान आहे. म्हणूनच एखाद्या नवीन कार्याची सुरवात केली की आपण म्हणतो आपण त्या कार्याचा श्रीगणेशा केला. असा हा बुद्धीचा, मांगल्याचा देव, श्रीगणेश. पण भारतीय शिल्पकलेत श्रीगणेशाचा प्रतिमा तशा थोड्या उशिराने निर्माण व्हायला लागल्या. श्रीगणेशाच्या जन्माची लोकप्रिय कथा तर आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहेच. एक दिवस शिवपत्नी पार्वती आंघोळीला गेलेली असताना तिने आपल्या शरीराला लावलेल्या उटण्यापासून एक मुलगा बनवला आणि गंगेच्या पाण्याने त्या मुलाला जिवंत करून त्याला द्वारपाल म्हणून उभा केला व पार्वती स्नान करायला गेली. तेव्हढ्यात भगवान शंकर घरात शिरायला लागले आणि पार्वतीच्या द्वारपालाने त्यांचा विरोध केला. चिडून भगवान शंकरानी आपल्या त्रिशुळाने त्या मुलाचा शिरच्छेद केला. त्याचा देह मांडीवर घेऊन पार्वती शोक करू लागली. तेव्हा इतर देवांनी शोधाशोध करून एकदंत हत्तीचे मस्तक त्या द्वारपालाच्या धडावर बसवून त्याला जिवंत केले, व शंकरांनी त्याला आपल्या गणांचा अधिपती नेमले.
हत्तीचे मस्तक असल्यामुळे श्रीगणेशाच्या शिल्पांमध्ये त्याचे तुंदिलतनु पोट, हत्तीची सोंड, सुपासारखे कान आणि विशाल गंडस्थळ ही लक्षणे दिसून येतात. आज आपण जी मूर्ती बघणार आहोत ती मध्य प्रदेश मधल्या विदिशा शहराजवळच्या उदयगिरी गुंफांमध्ये कोरलेली आहे. ही बैठी श्री गजाननाची मूर्ती भारत सापडलेल्या प्राचीनतम मूर्तींपैकी एक आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकात गुप्त राजा चंद्रगुप्त दुसरा ह्याच्या कारकिर्दीत ह्या गुंफा खोदल्या गेल्या. गुप्त राजवंशाच्या राजवटीचा काळ हा प्राचीन भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. साहित्य, संगीत, नृत्य, शिल्प, मंदिरस्थापत्य ह्या सर्व अभिजात कलांना गुप्त काळात उदार राजाश्रय मिळाला. सतराशे वर्षांपूर्वी खोदलेल्या ह्या उदयगिरीच्या गुंफांमधली शिल्पे आजही आपल्याला स्तिमित करतात. इथली महाकाय वराह मूर्ती तर अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. त्यात गुंफांमधली ही सुबक, सुंदर अशी श्री गणेशाची मूर्ती. ह्या मूर्तीचे हत्तीचे मस्तक अनलंकृत आहे. त्यावर मुगुट किंवा अन्य अलंकार दिसत नाहीत. हा गणपती डाव्या सोंडेचा आहे आणि त्याच्या एका हातात मोदकपात्र आहे. त्याचे वाहन जो उंदीरमामा तोही ह्या शिल्पात दिसत नाही. मूर्तीला फक्त दोनच हात आहेत, चतुर्भुज गणेश कोरायला गुप्त काळानंतर सुरवात झाली असावी.
छोटीशीच, अगदी साधी आणि अनलंकृत असली तरी मूर्ती अतिशय गोंडस आणि प्रमाणबद्ध आहे. ह्या मूर्तीच्या हातात कसलेच आयुध नाही. शिल्पकाराने टोकाशी किंचित दुमडलेले हत्तीचे कान फार सुंदर रीतीने दाखवले आहेत. नंतरच्या काळात शिल्पांमधून श्री गणेश मूर्तींचे हात वाढले, हातात आयुधे आली, देहावर, मस्तकावर अनेक अलंकार आले, एकाहून जास्त मुखेही आली. श्री गणेशाचे अनेक विभ्रम, अनेक मुद्रा, अनेक अविष्कार आपल्या शिल्पकारांनी आपल्या कलेमधून समूर्त केले, पण मला ही मूर्ती आवडते ती तिच्या नैसर्गिक साधेपणामुळे.
-शेफाली वैद्य