लहान मुलं देवाचं रूप असतात असं म्हटलं जातं, त्याचं कारण म्हणजे त्यांची निरागसता. त्यांना सगळं जग हे त्यांच्या सारखच कोमल आणि निरागस वाटतं. पण खरंच जग तसं असतं का? आता तर असे अनेक प्रश्न पडले आहेत. कारण देखील तसेच आहे. विचार करा त्या आईचे काय झाले असेल जिने सकाळी शाळेत जाताना लाडाने तिच्या चिमुकल्याला 'अच्छा' केलं असेल, त्याच्या घरी येण्याची ती वाट बघत असेल, तो आल्यानंतर काय खाईल याची तिच्या डोक्यात तयारी सुरु असेल, आणि थोड्याच वेळात तिच्यासमोर तिच्या त्या चिमुकल्याचे गळा चिरलेले, रक्ताने माखलेले मृतदह समोर आले असेल?.... भीषण... मन सुन्न करणारी घटना..
ही धक्का दायक घटना हरियाणा येथील गुरुग्रामच्या रायन आंतरराष्ट्रीय शाळेत घडली. ८ सप्टेंबर रोजी इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकुर या ७ वर्षीय मुलाचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात आढळल्याने शाळेत एकच खळबळ माजली. या प्रकरणी शाळेच्या बसचा वाहक अशोक याला अटक करण्यात आली. प्रद्युम्नच्या वडीलांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी प्रद्युम्नला सकाळी ७.३०च्या दरम्यान शाळेत सोडले त्यानंतर सकाळी सुमारे ८.३० वाजता शाळेतील माळ्याला प्रद्युम्नचा रक्ताने माखलेला मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात आढळला. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात नेण्याच्या आधीच त्याचा मृत्यु झालेला होता.
बसच्या वाहकाने मुलावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला थांबवण्याचा प्रयत्न मुलाने केला असता त्याची हत्या करण्यात आली असे पोलिसांनी म्हटले आहे. शाळेच्या सुरक्षा एजन्सीवर कारवाई केली जाणार असून त्यासाठी विशेष समिती नेमण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले आहे. या घटनेनंतर शाळेच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी सकाळी कमिशनर ऑफिसमध्ये जाऊन शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या घटनेने शाळा प्रशानावर आणि अधिकाऱ्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
पहिला प्रश्न : तो बस वाहक लहान मुलांच्या स्वच्छतागृहात काय करत होता?
दुसरा प्रश्न : इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय शाळेत, पालकांकडून इतकी फी आकारून सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे का बसवण्यात आले नाही?
तीसरा प्रश्न : पालकांना शाळा प्रशासनातर्फे त्वरित हत्येची माहिती का देण्यात आली नाही?
माध्यमांशी बोलताना प्रद्युम्नची आई ज्योती ठाकुर हिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. प्रद्युम्नच्या हत्येनंतर त्याच्या दप्तर आणि पाण्याच्या बाटलीला रक्त लागले होते, पोलिसांचा पंचनामा होण्याअगोदरच ते रक्त दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगून स्वच्छ का करण्यात आले? असा प्रश्न प्रद्युम्नच्या आईने उपस्थित केला आहे. याशिवाय मुख्याध्यापिकांनी याविषयी अद्याप अवाक्षर सुद्धा काढलेले नाही, इतक्या मोठ्या शाळेच्या मुख्याध्यापिका असताना, त्यांच्या शाळेत इतकी मोठी घटना घडते आणि त्या शांत का बसल्या आहेत? हा एक प्रश्न देखील इथे उपस्थित होतो.
प्रद्युम्न ची आई ज्योती ठाकुर
माध्यमांनी गु्न्हेगार अशोकसोबत देखील संवाद साधला, त्या नराधमाला हे सांगतानाही शरम आली नाही की, "माझी मती भ्रष्ट झाली होती, मला त्या लहानमुलासोबत 'चुकीचे काम' करायचे होते, मात्र त्याने आरडा ओरड करायला सुरुवात केली, मी घाबरलो आणि मग मी त्या मुलाला चाकू मारला." राष्ट्रीय माध्यमांवर त्याने या निघृण कृत्याचा कबुलीजबाब दिला आहे. याहून भीषण असेल ते काय? त्या चिमुलकल्याचे वडील रडत आपल्या मृतमुलासाठी न्याय मागतायेत, त्याची आई अर्धमेल्या अवस्थेत आहे, आणि तो नराधम नि:संकोच आपल्या घाणेरड्या कृत्यांचा कबुलीजबाब देतो...
नराधम : अशोक
या शाळेत घडलेली ही काही पहिली घटना नाही, दिल्लीच्या वसंतकुंज येथील रायन आंतरराष्ट्रीय शाळेत दोन वर्षांआधी अचानक एक मुलाचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. याच शाळेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोप केला आहे की, शाळा परिसरात बस चालक आणि वाहक जुगार खेळतात, अनेक लहान मुलांनी याविषयी आपल्या पालकांना सांगितले आहे. मात्र शाळा प्रशासनाने अनेकदा सांगूनही याविषयी काहीच केले नाही.. याचे कारण काय?
दिव्यांश : रायन आंतरराष्ट्रीय शाळा वसंतकुंजचा विद्यार्थी ज्याचा दोन वर्षांआधी संशयास्पद मृत्यु झाला.
प्रद्युम्नच्या आई वडीलांनी या प्रकरणाची तपासणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थांत ‘सीबीआय’कडून करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
नॅशनल क्राइम रिकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालानुसार २०१५ पर्यंत एकूण ८८०० बाल लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, यामध्ये ८३४१ गुन्ह्यांमध्ये लहान मुले त्या व्यक्तीला ओळखणारी असतात. यापैकी किमान १०% गुन्हे शाळांमध्ये किंवा शाळेशी संबंधित लोकांद्वारे करण्यात आले आहेत. हे आकडे धक्कादायक आहे, त्याहून धक्कादायक ही बाब आहे की, गेल्या २ वर्षात या आकड्यांमध्ये नक्कीच वाढ झालेली आहे. लहान मुलांचे आई वडील खूप विश्वासाने त्यांना शाळेत पाठवतात, असे असताना आपलं मूल शाळेतही सुरक्षित नाही म्हटल्यावर त्यांनी करायचे काय?
या सर्व प्रकरणाने आपल्या देशातील चिमुरड्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह अपस्थित केलं आहे. आजही भारतातील ३ पैकी १ लहान मूल शाळेत सुरक्षित नाही. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच गांधीनगरच्या एका शाळेत ५ वर्षीय चिमुकल्या लहान मुलीसोबत शाळा परिसरात अतिप्रसंग झाल्याची बातमी आली, तर हैदराबाद इथं ७ वर्षीय मुलाला प्राध्यापकांनी बेदम मारहाण केल्याचं वृ्त्त मिळालं.
पालक कमावतात, काटकसरीने मुलांच्या शाळेच्या लाखोरुपयांच्या फी भरतात, त्यांच्या भविष्यासाठी झटतात, आणि शेवटी हाती लागतो तो चिमुकल्यांचा मृतदेह.. त्यांचं तर आयुष्य संपतं.. पण पुढे का? असे आणखी किती बळी जाणार?
या सर्व घटनांवरुन आज भारतीय पालकांच्या मनात एकच प्रश्न आहे.. आपलं मूल शाळेत खरंच सुरक्षित आहे का?
- निहारिका पोळ