विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ३१

    01-Sep-2017   
Total Views | 119

 


अवंती : मेधाकाकू, काल गौरी आणि गणपतीचे थाटात विसर्जन झाले आणि आम्ही काय मस्त धमाल केली. अगं काल पाऊस होता ना म्हणून आम्ही कापडाची खास छत्री तयार केली दोन तासात आणि त्यामुळे आम्ही सगळे पावसात भिजलो तरीही गौरीच्या दोन्ही आणि गणपतीची मूर्ती मात्र अजिबात भिजली नाही. आपल्या विभागात स्वच्छ शहर अभियान तर्फे एका मैदानात गणेश मूर्ती विसर्जनाची सोय मोठे तलाव बांधून केल्ये ना तिथेच गेलो होतो आम्ही. निर्माल्य जमा करून त्यापासून खत बनवायचे काम सुद्धा सुरू आहे तिथे.      

 

मेधाकाकू : अरे व्वा अवंती, हे मस्तच आहे की, सतत नवीनतेचा शोध. आता या शोधाच्या आधीच्या अभ्यासात आपण कुसळ-मुसळ या जोडीची गम्मत पहिली. ही जोडी सुद्धा प्रतिकात्मक आहे हे लक्षात घे...! घरात जसे एक कुटुंब रहाते तसेच त्यांच्या वापरातील वस्तु सुद्धा घरात आल्याच. जसा व्यक्ती आणि समाजाच्या गुणवत्ता आणि स्वभाव वैशिष्ठ्य यांचा वापर म्हणी आणि वाकप्रचारात झाला तसाच या वस्तूंच्या उपयोगाचा, त्यांच्या वापराच्या पद्धतीचा आणि गुणवत्तेचा संदर्भ घेऊन अनेक म्हणींची निर्मिती झाली. या सगळ्या वस्तु प्रत्येक कुटुंबाला फार प्रिय असतात आणि त्यातूनच व्यक्ती आणि समाजातिल विविध प्रवृत्ती आणि गुणवत्तेची तुलना केली गेली. आता उखळ आणि घरातली सोशिक गृहिणी यांची तुलना कशी केली गेली ते बघ.

 

 

उखळात घातली तर सात घाव चुकवेल

धान्य आणि मसाले कुटण्यासाठी उखळीत घातलेल्या लाल मिरच्या, हळकुंड अशा  वस्तु मुसळाने कुटल्या जातात आणि त्याची बारीक पिठी-पूड-भुगटी बनते, अशा कुटण्यातून उखळीत काही शिल्लक रहात नाही. मात्र या वैशिष्ट्याची घरातल्या गृहिणीशी तुलना करताना, अशा मुसळाच्या कुटण्याचे घाव चुकवत मुसळापासून उखळीत सुरक्षित राहणारी एखादी मिरची किंवा हळकुंड जसे शिल्लक रहाते तशीच संसारातील अडचणी आणि सासरच्या मंडळींच्या कडक शिस्तीला पुरून उरणारी नवपरिणीत वधू आपल्याला या म्हणीतून परिचित होते. अडचणींचा सामना करायचे त्या तरुण विवाहितेच्या कौशल्याचे हे रूपक-प्रतीक.

 

अवंती : मेधाकाकू, आता मीसुद्धा आपल्या अशा रोजच्या वापरातल्या वस्तूंच्या वैशिष्ट्याचा अभ्यास करून त्याचे उदाहरण निबंधात कुठे वापरता येईल त्याचा विचार करते आहे.

 

मेधाकाकू : एकदम सही, अवंती. आता गंम्मत बघ, वर उल्लेख केलेला उखळ-मुसळ जोडीच्या वापराचा संदर्भच या म्हणीत, थोड्याशा उपहासाने, वेगळ्या अर्थाने वापरला आहे.

 

 

उखळामुसळाशी गांठ

उखळात घालून मुसळाने कुटणे व म्हणजे प्रत्यक्षात त्या वस्तु किंवा पदार्थाचे स्वरूप पुर्णपणे बदलून टाकणे. उदाहरणार्थ लाल मिरच्यांची अथवा हळकुंडाची बारीक पूड करणे. हेच रूपक उखळामुसळाशी गांठ या म्हणीत वापरले आहे. केलेल्या कृत्यांमुळे एखाद्याला कधीतरी अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागते जिथे उखळासारखे परिस्थितीत अडकायला झालेले असते. दुसर्‍या बाजूला मुसळाचे घाव म्हणजे कायदा आणि न्यायव्यस्थेच्या निर्णयामुळे मिळालेली शिक्षा भोगाविच लागते. अथवा एखाद्याला, मिळालेल्या योग्य सल्यामुळे वागणुकीत बदल स्वीकारावा लागतो. उखळ-मुसळ एकत्र वापराने कुटण्याचा मोठा आवाज होतो, हेच रूपक मोठयाने होणारे वाद-भांडण अशा अर्थीसुद्धा वापरले जाते.

 

अवंती : कमाल वाटते मला या मराठी शब्द-साहित्य खजिन्याची, जेवढे वाचू तितके कमीच आहे असे वाटते. 

 

मेधाकाकू : अवंती, आता या म्हणीत म्हटलय तसे आपणही म्हणायला हरकत नाही, या अभ्यासाने आपले...

   

 

उखळ पांढरे झाले

 

अवंती : अरेच्या मेधाकाकू, एकदम हे उखळ पांढरे कसे झाले... ?

 

मेधाकाकू : हां तीच तर गम्मत आहे आपल्या मराठी भाषेची. आता पुन्हा हे उखळीचे रूपकच पूर्ण चिन्हसंकेत स्वरुपात वापरले आहे या म्हणीत मात्र याचा सूक्ष्मार्थ किंवा गुढार्थ पाहणे आवश्यक आहे. अचानक धनलाभ होणे अथवा अनपेक्षित मनासारखे काही चांगले घडणे, या अर्थी उखळ पांढरे झाले असा उल्लेख केला जातो. पांढरे होणे याचा रूढ अथवा शब्दार्थ वृद्धी होणे, वाढ होणे असा असल्याने ही म्हण प्रचारात आली असावी असा तर्क करायला हरकत नाही. आता उखळ हे संपन्न घराचे रूपक आहे असे गृहीत धरूया कारण याचा संबंध कुटुंबाच्या स्वयंपाकघराशीच आहे जिथे आदर्श गृहिणीचा सतत वावर असतो.

 

मी वर उल्लेख केला की उखळ हे संपन्न घराचे रूपक आहे असे आपण गृहीत धरूया. याचे कारण असे की चिन्ह (Symbol) आणि चिन्ह संकेतांचा, रूपकांचा आणि त्याच्या अन्योक्तीचा (Allegory) अभ्यास करून काढलेले निष्कर्ष तात्विक किंवा सैद्धांतिक (Speculative) स्वरूपाचेच असतात. अवंती असे बघ की, म्हणी आणि वाकप्रचारांसारख्या लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी किंवा तुला समजावताना मी काढलेले निष्कर्ष कोणीही नाकारू शकते आणि नव्या अभ्यासाने नवे अर्थ-सिद्धांत मांडू शकते. आपल्या अभ्यासाच्या या टप्प्यावर, तू हे योग्यरीतीने समजून घेणे आवश्यक आहे. खरे म्हणजे अशा अभ्यासातील हा कळीचा मुद्दा आहे कारण अशा निष्कर्षाला कुठलाही लेखी पुरावा देता येत नसतो.

 

अवंती : सही है मेधाकाकू... आज एकदम वरच्या वर्गात गेल्यासारखे वाटतय मला. मगाशी मी तुला म्हटले की मी घरातल्या वस्तूंचा अभ्यास करते आहे. तिथूनच धागा पकडून बहुतेक तू हे सगळे स्पष्ट केलेले दिसतय मला. मेधाकाकू तुझे शिकवणे यासाठीच फार आवडते आम्हा मुलांना...!!

 

- अरुण फडके

                 

 

 

 

अरूण फडके

गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचे विशेषज्ञ, नाट्यक्षेत्रातील नामवंत विश्वस्तनिधींचे विश्वस्त, मोठ्या उत्सवी कार्यक्रमांचे अनुभवी संघटक (Event designer),  फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक आणि एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बूक प्रकाशित, (सिंबॉल–सिंबॉलिझम--अॅलिगरी) चिन्ह-चिन्हसंकेत-चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121