आता तरी सुधारा!!!

    09-Aug-2017   
Total Views |

 
मालाडच्या एका नामांकित शाळेमधल्या एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडल्याची बातमी झळकू लागली आणि पुन्हा एकदा आपल्या लेकी सुरक्षित नाही याची जाणीव प्रकर्षाने झाली. दर दिवशी राज्याच्या कानाकोपर्‍यात घडणार्‍या या घटनांमुळे मन विचलित होऊन गेलं. एक माणूस म्हणून जन्म घेतलेल्या या विकृत मनोवृत्तीच्या नराधमांना अशी लाजिरवाणी कृत्यं करताना काहीच कसे वाटत नाही? हे उमजत नाही. मालाडच्या प्रकरणातील पीडित मुलींच्या आई-वडिलांची आज झालेली अवस्था शब्दांत व्यक्त करता येण्यासारखी नाही. आज मालाडमध्ये ज्या शाळेमध्ये ही घटना घडली आहे ती म्हणे एक नामांकित शाळा म्हणून गणली जाते. याच शाळेमध्ये काम करणार्‍या शिपायाने हे कृत्य केले आहे. आज शिक्षणाच्या बाजारात शिशुवर्गापासून उच्च शिक्षणापर्यंत लाखोंच्या घरात पैसे मोजावे लागतात. त्यातच दुसरीकडे ’मुलगी शिकली प्रगती झाली’, ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देत मुलींचा जन्मदर वाढविण्यावर सरकार भर देत आहे. एक ठराविक वर्ग सोडला, तर मुलगी झाल्याचा संकोच न करता मुलीच्या जन्माचे स्वागतच होते. आपल्या सोनुलींच्या सर्व हौस-मौज पुरवत तिच्या उच्च शिक्षणासाठी आजचे पालक जीवाचे रान करतात. आपल्या आर्थिक कुवतीनुसार त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. आपली मुलगी डोळ्यासमोर असताना तिच्या सुरक्षेसाठी खंबीरपणे तिचा ’बाबा’ उभा असतो, पण या ’बाबा’ची ’परी’ घराच्या बाहेर पडली की, अनेक शंका-कुशंका मनाला चिंतीत करतात.
 
आज एक-दोन वर्षांच्या चिमुरडीपासून ते अगदी साठी ओलांडलेल्या वृद्ध स्त्रियांवरही बलात्कार केले जातात. स्त्री कुठली का असो नोकरदार असो वा गृहिणी, तिच्या भोवतीचे वातावरण सुरक्षित असायला हवे. आज महिलांनी यशाची एकेक शिखरे पादाक्रांत करीत सर्व क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवला असला, तरी त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी अद्याप बदललेली नाही, हेच अशा घटनांमधून पुन्हा-पुन्हा सिद्ध होत आहे. त्यामुळे अशा गोष्टी रोखण्यासाठी कठोर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याबरोबरच समाजातील अशी विकृत व बुरसटलेली मानसिकता मुळापासून उखडायला हवी. त्यासाठी मुलांनाही केवळ संस्काराचे डोस न देता, त्यांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा, याचे पालकांनी प्रयत्न करावे आणि शिक्षा अधिकाधिक कठोर केल्याशिवाय हे सगळे भयाण प्रकार थांबणे नाही...
 
 
हॉटेल उद्योगाला ‘अच्छे दिन’
 
आज ऑफिसमधून यायला उशीर होईल, आज घरचं जेवण नको, बाहेरून ऑर्डर करूया, हे संवाद हल्ली सर्वसामान्य घरांमध्ये ’कॉमन’ झाले आहेत. थोडक्यात काय हॉटेल उद्योगाला एकूणात ’अच्छे दिन’ आले आहेत, असं म्हणायचं. २८ टक्के मुंबईकरांची पेटपूजा ही हॉटेलमध्येच होत असल्याचे एका सर्व्हेतून नुकतेच समोर आले. अर्थात, हा टक्का २८ टक्क्यांपर्यंत पोहोचण्यामागे अनेक कारणे आहेत. घडाळ्याच्या काट्यावर पळणार्‍या या शहरातील बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असल्या तरी हॉटेलप्रेमींची संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. त्यात रुळावर धावणार्‍या मुंबईनगरीची गोष्टच निराळी... सगळ्यांना सामावून घेण्याचे मुख्य वैशिष्ट्य असलेल्या या मुंबईचे अनेक चाहते आहे. शिक्षण, नोकरी तसेच इतर अनेक कारणांमुळे देशाच्या कानाकोपर्‍यातून अनेक मंडळी या स्वप्ननगरीमध्ये पाऊल ठेवतात. त्यामुळे २८ टक्के मुंबईकर नाश्ता आणि दोन्ही वेळचे जेवणही हॉटेलमध्ये घेणे पसंत करतात, असे हे सर्वेक्षण सांगते. यामध्ये एकटे राहणारे, अविवाहित, वसतिगृहामध्ये राहणारे, नोकरदार, नोकरीच्या, व्यवसायाच्या शिक्षणाच्या निमित्ताने आलेल्या ग्राहकांचा यात सर्वाधिक समावेश आहे. आज मुंबईच्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये छोटी-मोठी हॉटेल्स उभी राहिली आहेत. सर्वसामान्यांपासून ते थेट उच्चभ्रूंना डोळ्यासमोर ठेवून हॉटेल्सचे मेन्यू आणि किंमती ठरत आहेत. त्यात जीएसटीनेही भर घातली आहे. त्यातच मुंबई महापालिकेने हॉटेल व्यावसायिकांना परवाने देण्यासाठी पूर्वी लागत असलेले कागदपत्रांचे जंजाळ दूर करून ‘एक खिडकी योजना’ सुरू केली आहे. त्यामुळे हॉटेल्स उघडण्याची प्रक्रियाही काहीशी सोपी झाली आहे. किमती वाढविण्यापेक्षा दर कमी ठेवून अधिक ग्राहकांना सेवा देत नफा मिळवण्याचे व्यावसायिक सूत्र या छोट्या हॉटेल्सनी अंमलात आणले आहे. ग्राहकांना नक्की काय हवे हे गणित ओळखून त्यांना मेन्यूमध्ये अनेक प्रयोग करून वेगवेगळे पदार्थ बनविण्यावर भर दिला जात आहे. आज मुंबईत नोकरीच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपर्‍यातून अनेक नोकरदार दाखल होतात. त्यामुळे त्यांच्या प्रांतातील रोजच्या आहारातले पदार्थ काही हॉटेल्सवाले पुरवू लागले आहेत. त्यामुळे माफक दरात मिळणार्‍या चवदार पदार्थांना मुंबईकरांनी पसंती दिल्याचे हे सर्वेक्षण सांगते.
 
- सोनाली रासकर

सोनाली रासकर

समाजशास्त्र, इतिहास घेऊन बी.ए. पत्रकारिता व मास कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा केला आहे. फिचर स्टोरी, तसेच  सामाजिक विषयावरील लिखाणाची आवड, गुन्हेगारीशी संबंधित मालिका बघण्यामध्ये रस. सध्या दै. ’मुंबई तरूणभारत’मध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत.