आधुनिक मराठी नाट्यपरंपरेचे जनक म्हणून ओळखले जाणारे विष्णुदास भावे यांची आज पुण्यतिथी. विष्णुदास अमृतराव भावे हे मराठी नाटककार होते. त्यांचा जन्म सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणार्या अमृतराव भावे यांच्या घरी झाला. विष्णुदास भावे यांनी बुद्धिमान हस्तकला कारागीर म्हणून नावलौकिक मिळवला होता. अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकतील, अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदास भावे यांनी घडवल्या. सांगली संस्थानच्या राजवाड्यातील सांगलीचा नाट्यक्षेत्रात त्यांचा फार मोठा दबदबा होता. येथील नाट्यरसिकांनी नाट्यचळवळ जोपासली. मराठी रंगभूमीचे जन्मस्थान अशी सांगली शहराची ओळख. पेशवाईच्या अस्तानंतर थोरले श्रीमंत चिंतामणराव आप्पसाहेब पटवर्धन हे संस्थानाधिपती होते. त्यांच्या पदरी असणार्या अमृतराव भावे यांच्या विष्णू या बुध्दिवान पण उनाड मुलातील गुण या राजांनी हेरला होता. १८४३ साली राजांच्या पाठबळावर भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक उभारले. सांगली संस्थानच्या राजवाड्यातील ’दरबार हॉल’ मध्ये नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला.
१८५४ मध्ये विष्णुदासांनी ‘राजा गोपीचंद’ हे हिंदी नाटक साकारले आणि ते ’हिंदी रंगभूमीचे जनक’ म्हणूनच ओळखले जाऊ लागले. त्यांनी तब्बल ५२ नाटके लिहिली. त्यात प्रामुख्याने पौराणिक नाटके आहेत.
विष्णुदास भावेंनी स्वत:च नवीन पदांची रचना केली. ‘सीता स्वयंवर आणि अहिल्योद्घार‘ आख्यान श्रीमंतांपुढे सादर केले. हेच मराठीतील पहिले नाटक मानण्यात येते. इथेच मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. विष्णुदासांनी रामावतारी आख्यानेच सादर केली. १८४३ ते १८५१ या काळात विष्णुदासांना राजाश्रय लाभला. विष्णुदासांच्या कंपनीने मुंबईलाही नाटकाचे प्रयोग केले. तेथे प्रेक्षकांनी या नाटकांना अक्षरश: डोक्यावर घेतले. राजाश्रयानंतर लोकाश्रयाबरोबर ‘सांगलीकर नाटककार मंडळी’ फिरतीवर निघाली. १८४३ साली मुंबईच्या दौर्यापासून या सांगलीकर मंडळींनी तिकिटे लावून प्रयोग सादर केले. पैसे मोजून तिकिटे काढून नाटक पाहण्याची सवय लावली. राजाश्रयानंतर प्रशासकांनी विष्णुदासांच्या नाटकावर झालेल्या खर्चाची वसुली सुरू केली. त्याचा परिणाम विष्णुदासांनी सांगलीकर नाटक मंडळी स्थापन करून १८५१ ते १८६२ सालापर्यंत एकूण सात दौरे केले. त्यानंतर नाटकाच्या जाहिराती वृत्तपत्रामध्ये झळकू लागल्या. मुंबईच्या ग्रँट रोड थिएटरमध्ये मराठी नाटकाचा प्रयोग झाला. सांगलीचे नाव अखिल भारतात गाजले म्हणूनच असेल, सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाऊ लागली. सांगलीकर संगीत हिंदी नाटकमंडळी आणि नूतन सांगलीकर मंडळींनी विष्णुदास भावे यांच्या पद्धतीची नाटके १९१० सालापर्यंत सुरू होती. ९ ऑगस्ट १९०१ साली नाट्याचार्य विष्णुदास अमृत भावे यांचे निधन झाले. त्यांच्या नावाने ’भावे पुरस्कार’ ५ नोव्हेंबर रोजी ’रंगभूमीदिनी’ देण्यात येतो. त्यांच्याच नावे सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यमंदिर उभारण्यात आले आहे. त्यानंतर नाटक कंपनीने नाटक बसविले की, त्याचा पहिला प्रयोग हा नाट्यपंढरीच्या विष्णुदास भावे रंगमंचावर करायचा, हा जणू पायंडाच पडला. विष्णुदासांच्या व्यक्तिमत्त्वात विविध कलांचा संगम होता. सुरुवातीस ते मातीची चित्रे बनवत असत. ’सीता स्वयंवर’च्या सादरीकरणासाठी त्यांनी केलेला खटाटोप पाहिला तर त्यांच्या अनेक गुणांचे दर्शन घडते.
- सोनाली रासकर