आज अनेक क्षेत्रांत मराठी माणसाची घोडदौड कायमआहे. त्याला हिंदी चित्रपटसृष्टी आणि जाहिरात क्षेत्रही अपवाद नाही. होर्डिंग्ज असो किंवा टीव्हीवरील जाहिराती असो त्यातही आज मराठी कलाकार चमकताना दिसतात. असाच एक सर्वांचा ओळखीचा मराठमोळा चेहरा म्हणजे शाममाशाळकर. कोणीही त्याला पहिल्यांदा भेटलं तर तो पारशी किंवा गुजराथी असल्याचे सर्वांना वाटते, असे तो हसत हसत सांगतो.
शामचं बालपण गेलं ते सोलापुरात. नंतर कामानिमित्त त्याने १७ वर्षांपूर्वी मायानगरी मुंबई गाठली. चित्रपटसृष्टी म्हटलं तर अनेक पालक नाकं मुरडतात. पण शामला साथ लाभली ती त्याचे आई-वडील आणि मोठा भाऊ मुकुंद याची. त्याच्या प्रत्येक निर्णयात त्याच्या आई-वडिलांनी आणि भावाने त्याला साथ दिली. सुरुवातीला शामएका दिग्दर्शकाला ‘असिस्ट’ करण्यासाठी रूजू झाला आणि हीच त्याची चित्रपटसृष्टीतील पहिली पायरी ठरली. मेहनत आणि जिद्दीशिवाय काहीच साध्य होत नाही, हे मनाशी ठरवत सुरुवातीच्या काळात अनेकदा त्याने कांदिवली ते गोरेगाव असा पायी प्रवासदेखील केला. आपली जबाबदारी ओळखत त्याने पै न् पै जोडायला सुरुवात केली. दिग्दर्शकालाही कलेची जाण असावी लागते. अगदी हेच कलाकाराचे गुण त्याच्या अंगी असल्याचेे ओळखत एका दिग्दर्शकाने त्याला अभिनय करण्याचा सल्ला दिला आणि त्यानेही तो आपल्या मेहनतीच्या जोरावर सार्थ ठरवला. आज आपल्या मेहनतीच्या जोरावर तो एक विनोदी कलाकार म्हणून सर्वांना कायमहसवण्याचा प्रयत्न करतो.
शामने आजवर २०० पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जाहिरातींमध्ये, अनेक मालिका आणि मोठ्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडली आहे. ’अजब प्रेमकी गजब कहानी’ आणि ’लालबाग परळ’सारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका सर्वांच्याच मनात घर करून गेल्या. हे दोन्ही चित्रपट त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरले. त्यानंतर त्याच्याकडे जाहिरात आणि चित्रपटांची रांगच लागली. स्ट्रगल असेल तरच आपण मिळवलेल्या गोष्टीची आपल्याला किंमत असते, तसेच संयमआणि मेहनत ही क्षेत्रात यशस्वी होण्याची किल्ली असल्याचेही तो सांगतो. मूक चित्रपटात भूमिका साकारण्याची आपली इच्छा असल्याचे त्याने दै. ’मुंबई तरुण भारत’ शी बोलताना सांगितले. पुढील महिन्यात तो एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे, त्याच्या पुढील वाटचालीबद्दल दै. ’मुंबई तरुण भारत’ कडून मन:पूर्वक शुभेच्छा!
- जयदीप दाभोळकर