विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २८

    03-Aug-2017   
Total Views | 17


अवंती : मेधाकाकू आज मी काही बोलणार नाहीये तुझ्याशी. तुझ्याशी आज कट्टी. काल नागपंचमीला, आजीने केलेली खांडवी आग्रहाने तुझ्यासाठी डब्यात भरून पाठवली आणि तू केलेली दिंड संपली असे सांगत्येस. तुला मात्र माझी साधी आठवण सुद्धा नाही आली...!!

 

मेधाकाकू : अग्ग बाई रागावली का माझी पोर... उगी उगी... मी तुझा भाऊ आदित्यला चांगला दम भरलाय आणि खास तुझ्यासाठी या रविवारी मी परत दिंड बनवणार आहे. अगं, त्यानेच एकट्याने संपवली, तुझ्यासाठी म्हणून झाकून ठेवलेली दिंड. आता तुझा राग काढण्यासाठी, असाच एक समर्पक वाकप्रचार. तुला नक्की हसू फुटेल, बघं...!!

 

चाखलें नाही पण देखलें तर असेल.

मी दिंड बनवत असताना तु पाहिलेस मात्र तुला दिंड चवीला सुद्धा मिळाली नाही. वरकरणी तुझ्या या परिस्थितीला समर्पक वाटणारा हा वाकप्रचार प्रत्यक्षात अगदी वेगळे काही सांगतोय. अवंती, काल शाळेजवळं हनुमान रोडवरच्या सिग्नलपाशी मी अनुभवलेला प्रसंग... आपल्या शेजारच्या रोहनला ट्रॅफिक पोलिसांनी अडवले कारण तो हेलमेट न घालता मोटरसायकलवर प्रवास करत होता. त्यावेळी तो पोलिसांशी हुज्जत घालत होता, हे माझ्या लक्षात आले. रोहनचे म्हणणे होते “मी इथून रोज जातो, या नाक्यावर मला आजपर्यन्त कधीही, कोणीही, डोक्यावर हेलमेट नाही म्हणून अडवलेले नाही आणि म्हणून  तुम्हीही मला आज अडवू शकत नाही”. अशावेळी हा वाकप्रचार त्या पोलिसांनी रोहानला ऐकवला असेल हे नक्की. काही नियम बंधनकारक आहेत याची जाणीव असूनसुद्धा, पूर्वी कोणी अडवले नाही असे म्हणत नियमभंग करणार्‍यां कांगावखोर मंडळींसाठी अगदी समर्पक सल्ला. हा, अर्थ विश्लेषणाच्या तर्कन्यायमुलत्व पद्धतीतिल अनुमान, अशा प्रकारचा अनोखा वाकप्रचार आहे. अनुमान ज्यावर आधारलेले असते ते साधन आणि ज्याच्यासंबंधी अनुमान केले जाते ते साध्य. अनुमान या अलंकारात असे साधन (चाखले नाही) आणि साध्य (पण देखले) यांचे विधान असते. 

 

अवंती : सही यार मेधाकाकू. त्या रोहानला चांगला धडा मिळाला हे नक्कीच. पण रोहनचे बाबा त्याला नेहमी सांगत असतात, मोटरसायकल चालवता आली म्हणजे सगळे समजले, अशा भ्रमात राहू नकोस. रहदारीचे नियम, वाहनाची देखभाल आणि रस्त्याने चालणार्‍यांसह स्वतःची सुरक्षा, हे सुद्धा महत्वाचे आहे, हे लक्षात घे.!! पण तुझे अलंकार विश्लेषण आता..निश्चितपणे जास्त स्पष्ट होते आहे... फार महत्वाचे आहे हे...!!      

 

मेधाकाकू : तुझी नाराजी संपली... माला फार बरे वाटले... अवंती... गुणी पोर ती माझी.. हो. मी सुद्धा ऐकत असते रोहनच्या बाबांचे सांगणे... अगदी या वाकप्रचारासारखे...!!      

 

थोडे खाणे लजतीचे फार खाणे फजितीचे. 

ही तरुण मुले फार हटवादीपणा करतात कधीकधी अर्थात ते वयच आहे तसे ज्यावेळी बंडखोर वृत्ती नसनसांत उसळत असते. अशा मुलांना, रोहनच्या बाबांसारखे खंबीर तरीही समजूतदार, साक्षर पालकच सांभाळू शकतात. अशा वेळी, उपनगरात, आतल्या बाजूच्या शांत परिसरातील रस्त्याने फिरताना आणि सतत रहदारी आणि गर्दी असलेल्या शहरातील रस्त्यांवर फिरताना एकाच पद्धतीने वाहन चालवणे अयोग्य आणि धोक्याचे असते. थोडेसेच खावे ज्यामुळे पदार्थाच्या स्वाद+चवीची लज्जत घेता येते, मात्र फार आवडते म्हणून अती खाण्याने फजिती वाट्याला येते असा महत्वाचा सल्ला इथे मिळतोय. वाक्यन्यायमूलक पद्धतीतिल  'यथासंख्य' या अलंकारात सजलेला हा सूचक वाकप्रचार.  वाक्यातील शब्दांचा आणि अर्थाचा विशिष्ट क्रम किंवा सूचक वाक्यार्थ, हे या वाकप्रचाराचे वैशिष्ठ्य...!!  

 

अवंती : मेधाकाकू... माझी नाराजी पळाली त्याचे कारण... तुझे वाकप्रचारांच्या अर्थाचे विश्लेषण. सहा महिन्यात तु इतक्या सहजपणे मला या विषयात गुंतवून ठेवले आहेस की मी तुझ्यावर नाराज होऊच शकत नाही...!!

 

मेधाकाकू : वा... अवंती एकदम मस्त मूड आलाय आता आणि त्यासाठी छानशी म्हण सुद्धा आहे माझ्यापाशी.

 

तांदूळ जिवसे पाहूणा जीवसा. 

आपल्या म्हणीतली गृहिणी ही शेतकर्‍याची गृहलक्ष्मी आहे आणि आगत्यशील गृहिणी आहे. तिच्या शेतात पिकलेला तांदूळ तिचा लाडका आहे आणि मग सासर किंवा माहेरच्या पाहुण्यांचे आगत-स्वागत, पाहुणचार ती फार प्रेमाने करत असते. ह्या म्हणीत, महाराष्ट्रातील गावागावातील अशा आगत्यशील शेतीप्रधान समाजाचे आणि कुटुंबाचे वर्णन केले आहे. ’तांदूळ जीवसे’ या दोन शब्दा पेरणी-लावणी पासून घरधन्यासह शेतात खांद्याला खांदा लाऊन काम करणारी आणि पुढच्या दोन शब्दात विस्तारीत कुटुंबावर जीव लावणारी गृहिणी दिसते आहे. ही म्हण म्हणजे  गूढार्थप्रतीतीमुळे तयार होणारे ‘सूक्ष्म’ पण स्पष्ट अर्थ, असा ‘सूक्ष्म’ अलंकार आहे. सर्वसामान्यांना कळणार नाही असा गूढार्थ किंवा सूक्ष्मार्थ चातुर्याने सूचित करण्याने हा अलंकार ओळखला जातो...!!               

 

अवंती : मेधाकाकू महाराष्ट्रातील अशा विलक्षण समाजात असे विलक्षण नागरिक होते, अशा प्रेमळ गृहिणी होत्या आणि आजही आहेत. माझी आजी आई+बाबा, तु आणि रोहनचे वडील सुद्धा असेच चतुर आणि प्रेमळ...!!

 

- अरुण फडके

अरूण फडके

गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचे विशेषज्ञ, नाट्यक्षेत्रातील नामवंत विश्वस्तनिधींचे विश्वस्त, मोठ्या उत्सवी कार्यक्रमांचे अनुभवी संघटक (Event designer),  फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक आणि एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बूक प्रकाशित, (सिंबॉल–सिंबॉलिझम--अॅलिगरी) चिन्ह-चिन्हसंकेत-चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121