नाद बागेश्री - कृष्णाची बाग

    03-Aug-2017   
Total Views | 39

 

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कृष्ण आपलासा वाटतो. अगदी लहान मूल असो, तरुण असो, प्रौढ, वृद्ध, स्त्री, पुरुष कुणीही असो, प्रत्येकाला तो आपला जीवाभावाचा सखा वाटतो. जीवनाचा प्रत्येक पैलू त्याने व्यापला आहे. तो युद्धात आहे, शांतीत आहे, योगात आहे, भोगात आहे, भक्तीत आहे, ज्ञानात आहे आणि कर्मातही आहे! आपल्या सारख्याच आवडी निवडी असलेला कृष्ण आपला मित्र वाटतो! तो शिल्पात आहे, चित्रात आहे, गाण्यात आहे, नृत्यात आहे, वादनात आहे, गोष्टीत आहे, फुगडीत आहे, टिपरीत आहे, लोण्यात आहे, गोठ्यात आहे, घरात आहे आणि अंगणातही तो आहेच!

मी जेंव्हा गॅलरीमध्ये झाडे लावायचे ठरवले, तेंव्हा पहिलं झाड कुठलं लावावं, हा प्रश्नच नव्हता! कारण त्याचं उत्तर “Obvisouly तुळस!” असंच होतं! कृष्णाच्या आवडीचे तुळशीचे रोप घरात आले. मग एका तुळशीच्या लग्नानिमित्त लहानसं वृंदावन आले. निळ्या – केशरी रंगाच्या वृंदावनाने माझ्या गॅलेरीचे ‘अंगण’ झाले! या वृंदावनात तुळशीची लहान कुंडी ठेवता येते. आणि समोरच्या कोनाड्यात एक छोटीसा मुरलीधर!

मी स्वत:ला हौशी माळी म्हणवून घेते, आणि माझ्यापेक्षा कितीतरी वेडे gardeners पाहिलेत, आणि त्याहून ठार वेडे वृक्ष प्रेमी पण पहिले, पण कृष्णाचे झाडांवरचे प्रेम काही औरच आहे! त्याचं प्रत्येक कर्म दिव्य आहे हेच खरे! कृष्णाचे तुळशीवर इतके प्रेम, की तुळशीला त्याने धर्मपत्नीचा मान दिला!

कार्तिकी एकादशीनंतर तुळशीच्या लग्नाचा मुहूर्त निघतो. मग हिरव्या बांगड्या घालून सजलेली तुळस आणि वृंदावनातल्या कृष्णाची जोडी दृष्ट लागण्यासारखी दिसते. गोरज मुहूर्तावर, मंगलाष्टकांच्या गजरात तुलसी विवाह संपन्न होते!

मी उगीचच कृष्णाचे नाव पुढे करून, वेगवेगळी तुळशीची रोपे जमवली. कृष्ण तुळस, राम तुळस, आणि कर्पूर तुळस. प्रत्येकीचे औषधी गुणधर्म वेगवेगळे. कृष्ण तुळस काढ्यासाठी, राम तुळस चहासाठी आणि कर्पूर तुळस त्वचेसाठी. नाव देवाचे द्यायचे आणि आपल्या कामाला घ्यायचे, असे! पण या सगळ्या प्रकारात कृष्णाची दूरदृष्टी दिसते. तुळस कुठेही उगवली तरी, रानटी रोप म्हणून उपटून टाकली जात नाही. तर घरोघरी आवर्जून लावली जाते. आपोआप प्रत्येकाच्या दारात एक औषधी सदैव उपलब्ध असते.

त्याच्या आवडीचे म्हणून मागे एकदा प्राजक्ताचे रोप आणले होते. त्याच्या म्हणजे, खरेतर सत्यभामेच्या आवडीचे. काय झाले? एकदा देव – दैत्यांनी समुद्र मंथन केले, तेंव्हा समुद्रातून चंद्र, ऐरावत, पारिजातक, लक्ष्मी, धनवंतरी, कौस्तुभमणी, अमृत इत्यादी प्रकट झाले. त्यापैकी कौस्तुभमणी विष्णूने घेतला. तर ऐरावत आणि पारिजातक इंद्राला मिळाले.

त्या परीजातकासाठी सत्यभामेने हट्ट धरला. समुद्र मंथनातून आलेलं पारिजातकाचे झाड मला हवे! काहीही करून ते झाड तुम्ही  इंद्राकडून घेऊन या! मग काय? कृष्णाने इंद्राकडून पारिजातकाचे एक रोप आणले. आणि आपल्या हातांनी ते सत्यभामेच्या दारात लावले. यथावकाश स्वर्गीय पारिजातकाचे झाड बहरले. पण त्याची फुले बरसली ती रुक्मिणीच्या दारात!

माझ्या कुंडीतल्या पारिजातकाची फुले मात्र वृंदावनातल्या कृष्णाच्या पायाशी बरसतात. कितीतरी वेळा सकाळी उठून पहिले तर कृष्णाच्या पायाशी प्राजक्ताची पंढरी - केशरी फुले नतमस्तक झालेली दिसतात.

कृष्णाशी नाते सांगणारा, खूप मोठा पसारा असणारा वृक्ष म्हणजे कृष्णवड. एकदा काय झालं? बाळगोपाळांना बरोबर घेऊन कृष्णाने किती एक गोपींच्या घरातून लोणी चोरून आणले! आता ते सगळ्यांना वाटायचे कसे? तेंव्हा कृष्णवडाच्या द्रोणासारख्या पानातून कृष्णाने सगळ्या बाळगोपाळांना लोणी वाटले! आजही उत्तरेत या झाडाला ‘माखन कटोरी’ म्हणतात!

गोपींकडून या ‘माखन चोरा’ ची गाऱ्हाणी ऐकून यशोदा पार थकून गेली. कृष्ण ताकीत देऊनही ऐकेना, तेंव्हा तिने  कृष्णाला उखळाला बांधले. यशोदेची पाठ वळताच, त्या बंधनातून सुटायला कृष्ण उखळासकट धावला ते अंगणातील दोन अर्जुन वृक्षांकडे! नारदांच्या शापाने नलकुबेर व मणीग्रीव हे दोन कुबेरपुत्र गोकुळात वृक्ष होऊन राहत होते. कृष्णाच्या स्पर्शाने हे वृक्ष पावन झाले व कुबेरपुत्रांना मुक्ती मिळाली.  

कृष्णाला आवडणारे अजून एक झाड म्हणजे बकुळीचे. मंद सुगंध असलेल्या नाजूक पांढरट फुलांचे हे उंच वाढणारे झाड. बकुळीच्या झाडाखाली कृष्ण बासरी वाजवीत असे म्हणे. बकुळीचा मंद दरवळ आणि कृष्णाच्या वेणूचा मधुर नाद वाऱ्यावर तरंगत गोपींना वृंदावनी येण्याचा निरोप देत असे. आजही देवळाच्या दारात बकुळ दिसतो तो याचेच कारणे!

तसाच तो यमुनेच्या काठचा कदंब! तो तर फार पुण्यवान असणार! त्या वृक्षाने कृष्णाला अंगाखांद्यावर खेळवले. धडपडणाऱ्या बाळकृष्णाला आपल्या फांद्यांवर झेलले. उन्हात त्याच्या वर सावली धरली. तर कधी दुपारी दमून भागून पायाशी मुटकुळ करून झोपला तेंव्हा त्याच्या अंगावर पाने पांघरली. कदंबाच्या फांदीला बांधलेल्या हिंदोळ्यावर, त्याने कृष्णाला झुलवले. आणि एकदा तर गोपींची लुगडी अडकवायला फांद्यांचे hanger सुद्धा दिले!

त्या कदंबाचे चित्र एकदा काढत होते, आणि पाहता पाहता तो कदंब कृष्णरंगात रंगला!


कदंबतरूतळी वाजवी पावा

भवरोगहर्ता श्रीरंग ||

भला थोरला, प्रौढ वृक्ष तो

सुरांनी जाहला धुंद ||

हरपले भान, डोलू लागला

हर्षे शहारले अंग ||

रोमांच उठले मोरपिसांचे

नाचे मयुरा संग || 

कृष्णाशी सख्य सांगणाऱ्या अनेक वृक्षात एक आहे पिंपळ. पिंपळाच्या पानावर डाव्या पायाचा अंगठा चोखत पहुडलेला बाळकृष्ण, पिंपळाला आपलासे करतो. निळ्या जांभळ्या रंगाच्या कृष्णकमळाच्या फुलात बासरी वाजवणारा कृष्ण दाखवला जातो. ती कृष्णकमळाची वेल फुलाफुलाच्या हृदयात एक एक कृष्ण जपते. वृन्दावनीचे वेळूचे बन तर कृष्णाच्या अति आवडीचे! या वेळूने कृष्णाला त्याचा वेणू दिला, त्याचा सुहृद दिला!

वैजयंती तुळशीच्या मंजीरींची ‘वैजयंती माला’ कृष्णाच्या गळ्यात शोभते. वनातील विविध फुलांच्या माला तो गळ्यात घालत असे म्हणून तो ‘वनमाली’. आणि वनाचा, बनाचा स्वामी म्हणून तो ‘बनवारी’!

गॅलेरीतल्या प्रत्येक झाडाकडे पाहता पाहता, ती बाग बनवारी कृष्णाची वाटायला लागते. एकदा का बाग कृष्णाची झाली की मग ती फुलली काय आणि नाही काय किंवा फळली काय आणि नाही काय; मी बागेची मालक न राहता, त्याची सेवक म्हणून उरते ...   

- दिपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस वक्फ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार!

काँग्रेस वक्फ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार!

Waqf Bill संसदेत नुकताच वक्फ सुधारित विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे काँग्रेसने ४ एप्रिल २०२५ रोजी शुक्रवारी म्हटले आहे. १३ तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर राज्यसभेने वक्फ विधेयकाला मान्यता दिली आहे. अशातच आता X वरील एका पोस्टमध्ये, एआयसीसी चे सरचिटणीस जयराम राजेश यांनी ट्विट केले आहे. ते त्यात म्हणाले की, काँग्रेस लवकरच वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२४ च्या घटनात्मकतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे नमूद केले. त्यामुळे आता राजकारणात याच मुद्द्याला धरून एक ट्विस्ट ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121