
डोनाल्ड ट्रम्प, नवीन जिंदाल आणि राहुल बजाज यांच्यात साम्य काय? हे तिन्ही मूळचे उद्योजक असून यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविल्यानंतर ते यशस्वी राजकारणी ठरले. यातील डोनाल्ड ट्रम्प ’दी ट्रम्प ऑर्गनायझेशन’ नावाची कंपनी चालवतात आणि ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. नवीन जिंदाल हे ’जिंदाल ग्रुप’ या भारतातील सर्वांत मोठ्या उद्योगसमूहा पैकी एक असणार्या उद्योगसमूहाचे संचालक आहेत. ते खासदार होते. राहुल बजाज हे बजाज उद्योगसमूहाचे अध्यक्ष असून राज्यसभेचे खासदार आहेत. अशी अनेक उदाहरणे खरंतर आपणास पाहावयास मिळतील. दक्षिणेत जरा ट्रेंड वेगळा आहे. तिकडे चित्रपटातील अभिनेता-अभिनेत्री पुढे जाऊन यशस्वी राजकारणी बनतात. उद्योजक राजकारणी बनणे हे दक्षिणेत तुलनेने कमीच घडतं. अशाच अपवादापैकी एक आहेत एच. वसन्थकुमार. २२ रुपयांच्या भांडवलावर त्यांनी सुरू केलेला उद्योग आज ९०० कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. कन्याकुमारी जवळच्या ’अगस्थिस्वरम’ नावाच्या एका छोट्याशा खेड्यात वसन्थकुमार यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. शालेय शिक्षण तामिळ माध्यमातून ग्रामपंचायतीच्या शाळेत झाले. तामिळनाडूतील विवेकानंद महाविद्यालयातून पदवी संपादन केल्यावर वसन्थकुमार १९७१ साली चेन्नईला आले. त्याच वर्षी त्यांचा भाऊ चेन्नईमधून निवडणूक लढवत होता. वसन्थकुमार त्याच्या प्रचारात गुंतले. मात्र, दुर्दैवाने विजय काही मिळाला नाही. मात्र, याच पराभवाने त्यांचे पाय चेन्नईच्या जमिनीत घट्ट रोवले गेले. पुढे वसन्थकुमार यांच्या भावाने त्यांची ओळख व्ही. जी. पनीरदास फर्ममध्ये करून दिली. तिथे त्याला सेल्समनची नोकरी मिळाली. फक्त ७० रुपये महिना पगार होता त्याचा. ही कंपनी मर्फीचा रेडिओ ५० ते ७५ रुपयांना विकत असे. लोक हा रेडिओ ५ ते १० रुपये मासिक हप्ता देऊन विकत घेत असत. या लोकांचे मासिक हफ्ते गोळा करण्याचे काम वसन्थकुमार करत असे. आठवड्याला त्याला त्याकरिता ५ रुपये मिळत असत. त्यातील १ रुपया तो दुपारच्या जेवणासाठी खर्च करे. मात्र या एका रुपयांत पोटातली भूक भागत नव्हती. याचदरम्यान कुठेतरी वसन्थकुमारच्या उद्योगाची भूक जन्माला आली. कामातील त्याचा प्रामाणिकपणा पाहून कंपनीने त्याला कार्यालयीन कामासाठी घेतले.
सात वर्षे इमानेइतबारे नोकरी केल्यानंतर वसन्थला मॅनेजर म्हणून बढती मिळाली. आता पगार होता ३०० रुपये. कंपनी विस्तारत होती. मुंबईतसुद्धा कंपनीने काम सुरू केले होते. मुंबईच्या मोहिमेवर कंपनीने वसन्थला पाठविण्याचे ठरविले. वसन्थला मात्र मुंबईत यायचे नव्हते. बा, गड्या आपुला गाव बरा म्हणत तो चेन्नईतच थांबला. आता आपल्याला वेगळी वाट निवडायला हवी. आता आपण आपला व्यवसाय सुरू करायला पाहिजे हे त्याच्या मनाने पक्कं केलं आणि त्याने नोकरीचा राजीनामा दिला. यावेळी त्याने कमावलेला विश्वास कामी आला. पूर्वाश्रमीच्या कंपनीमुळे ओळख झालेल्या अनेक ग्राहकांनी वसन्थला मदत केली. यापैकी एक ग्राहक होता. त्याने आपलं दुकान वसन्थला विकलं. अट एकच होती ६ महिन्यांच्या आत ८ हजार रुपये द्यायचे. वसन्थने दुकानातील एका लाकडी बॉक्सच्या फळ्यांनी बनविलेला एक लाकडी बोर्ड तयार केला. त्यावर नाव लिहिले, वसन्थकुमार ऍण्ड कंपनी. व्ही. जी. पनीरदासमध्ये ग्राहकांसाठी एक योजना असायची. मासिक हप्त्याच्या स्वरूपात अर्धी रक्कम भरायची, वस्तू घ्यायची आणि उरलेली रक्कम मासिक हप्त्याने फेडायची. हीच योजना वसन्थने आपल्या दुकानातसुद्धा सुरू केली. या दुकानातून पहिली वस्तू विकली गेली ती म्हणजे जाळी असलेली लाकडी खुर्ची. किंमत होती २२ रुपये. हेच वसन्थचं पहिलं भांडवल ठरलं. ७० च्या दशकांत टीव्हीचा नुकताच उदय झाला होता. काही मोजक्याच घरांमध्ये टीव्ही असे. टीव्ही घरी असणे प्रतिष्ठेचे मानले जाई. वसन्थने टीव्ही मासिक हप्त्यावर विकण्यास सुरुवात केली. त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. याला व्यापक स्वरूप देण्यासाठी ’शक्ती फायनान्स’ आणि ’अशोक लेलॅण्ड’ सोबत वसन्थने हातमिळवणी केली. दरम्यान ८०च्या दशकाच्या आसपास आशियायी स्पर्धेचे भारताने आयोजन केले होते. याच दरम्यान रंगीत टीव्ही भारतात आला. अशोक लेलॅण्डचं ऑफिस ते घर असा अडीच तासांचा प्रवास तो दरदिवशी करायचा. सहा महिने असा व्यवसायासाठी प्रवास केल्यानंतर त्याला पहिली ९६० रंगीत टीव्हींची ऑर्डर मिळाली. हा फक्त तामिळनाडूच नव्हे, तर संपूर्ण भारतामधील विक्रम होता. आज वसन्थकुमार यांची ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि घरगुती वापराच्या वस्तू विकण्याच्या तब्बल ६४ शाखा आहेत. वसन्थकुमार यांनी पंखे, मिक्सर अशा वस्तू तयार करणारा कारखानासुद्धा काढला होता, मात्र त्यात यश मिळाले नाही. त्यांना लवकरच उमगले की, लोकांनी आपल्याला घाऊक विक्रेता म्हणून स्वीकारलेले आहे, उत्पादक म्हणून नव्हे. त्यांनी तो कारखाना बंद केला. त्यांच्या ६४ शाखांतून एक हजार कामगार काम करीत आहेत तर कंपनीची उलाढाल आहे तब्बल ९०० कोटी रुपये.
१० वर्षांपूर्वी ते कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभेवर निवडून गेले. असं जरी असलं तरी ते स्वत:ला उद्योजकच समजतात. ’’कल्पकता, चिकाटी, मेहनत यांचा त्रिवेणी संगम झाला की उद्योजक घडतो,’’ असे वसन्थकुमार म्हणतात. प्रत्येक तरुणाने हा त्रिवेणी संगम प्रत्यक्षात घडविला पाहिजे.
- प्रमोद सावंत