जो हरतो तो कलाकार कसला...

Total Views |
 

 
 
लाईट्‌स, कॅमेरा, ऍक्शन’ हे शब्द ऐकल्यावर एकच गोष्ट आठवते आणि ती म्हणजे रूपेरी पडदा आणि त्यामागची झगमगती दुनिया. पण या रूपेरी पडद्यावर ‘दिसणं’ आणि ‘भूमिका साकारणं’ हे सर्वांनाच जमत नाही. काही अभिनेते आपल्या छोटेखानी भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. अशीच एक छोटेखानी भूमिकाही मेहनतीने आणि अगदी प्रामाणिकपणे साकारणारा कलाकार म्हणजे अमेय हुनसवाडकर. अमेयचं बालपण मुंबईतील प्रभादेवीचं. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी या त्याच्या शेजारीच राहत असल्याने त्यांच्या घरी येणार्‍या कलाकारांना पाहतच अमेय लहानाचा मोठा झाला आणि यामुळे आपण या रूपेरी दुनियेमध्ये पदार्पण करावे, अशी इच्छा त्याच्या मनात घर करून गेली. तीच इच्छा आपल्या मनाशी बाळगत त्याने पुुढे या क्षेत्रातचं आपलं करिअर करण्याचा निर्धार केला.
 
सीमा कपूर यांच्या ’जिंदगीनामा’ या उर्दू मालिकेतून अमेयने आपल्या अभिनयक्षेत्राचा श्रीगणेशा केला आणि बघता बघता अनेक चित्रपट, शेकडो जाहिरातींवर त्याने आपली छाप सोडली. दिग्दर्शक महेश कोठारे यांचा ’पछाडलेला’ हा चित्रपट अमेयच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. यामध्ये त्याने साकारलेली वेड्या मुलाची भूमिका ’बाबा लगीन’ या नावानिशी आजही सर्वांच्या मनात आहे. त्यावर्षीचा तो सर्वात हिट चित्रपटही ठरला. अभिनयाची जाण, मुळातच असलेली विनोदी वृत्ती यामुळे त्याने सर्वांवरच आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ’तुझे मेरी कसम’ आणि ’अजब प्रेमकी गजब कहानी’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेलाही सर्वांची दाद मिळाली. या क्षेत्रात यायचं असेल, तर मेहनत आणि चिकाटी ही हवीच, हे अमेय आवर्जून सांगतो.

चित्रपटसृष्टी ही बाहेरून जशी दिसते तशी आतून नाही. चित्रपटसृष्टीत दिसण्यापेक्षा मेहनतीला जास्त वाव आहे. सर्वांच्याच जीवनात चढउतार हे नित्यानेच येत असतात.अशीच काही परिस्थिती अमेयच्या बाबतीतही आली. मध्यंतरी घरच्या जबाबदार्‍यांमुळे असो किंवा योग्य चित्रपट किंवा जाहिराती मिळत नसल्याने तो काही कालावधीसाठी यापासून दुरावला गेला. अनेकदा त्याच्या मनावर ‘पुढे काय’ याचे दडपणही आले. मात्र, त्यानंतरही न डगमगता त्याने नव्याने आणि जोमाने पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. ‘जो हरतो तो कलाकार कसला’ असं म्हणत अमेय पुन्हा रसिकांना हसवायला येत्या काळात रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अमेयला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
 
- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.